दुर्दम्य इच्छाशक्ती, अविरत परिश्रमांतून त्याने जिंकले संकटांना

महेश पाटील यांचा देशी गायींचा गोठा.
महेश पाटील यांचा देशी गायींचा गोठा.

अलकुड (एम) (जि. सांगली) येथील महेश पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व संकटे समोर असतानाही आपले निश्‍चित केलेले ध्येय दुर्दम्य इच्छाशक्ती व अविरत परिश्रमांतून साध्य केले आहे. देशी गोसंगोपन व्यवसायाचा विस्तार करून देशी दुधाला थेट शहरी ग्राहक मार्केट देण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. ‘यळकोट’ हा त्यांचा ब्रँड यशस्वी झाला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका. म्हैसाळ योजनेचे पाणी जरी पोचले तरी आजही पाणीटंचाई कमी झालेली नाही. तालुक्यातील अलकुड (एम) हे सांगली-पंढरपूर रस्त्यावर दंडोबा जंगलापासून हाकेच्या अंतरावर वसलेलं गाव आहे. याच गावात महेश पाटील राहतात. वडिलोपार्जित १२ एकर शेती; पण पाण्याअभावी हंगामी पिकं घेतली जायची. वडील अप्पासाहेब शेतीत कष्ट करायचे. आई सुमन अंगणवाडीमध्ये शिक्षिका होत्या. या उत्पन्नावरच प्रपंच चालायचा. आईची आई शांताबाई त्यांच्याकडेच असतात. महेश यांच्या पत्नी सौ. पूजा पुण्यात नोकरी करतात. माही आणि सुर्यान्शू ही मुले पुण्यातच शिक्षण घेतात. संकटरूपी वाटा आर्थिक परिस्थिती बेताचीच. गावापासून शिरढोणला जाण्यासाठी तिकिटाचेदेखील पैसे नसायचे, तरीही मुलांना शिक्षित करायचा वडिलांचा ध्यास होता. महेश यांना आर्मी किंवा एअरफोर्समध्ये जायचे होते. तसा ‘फिटनेस’ही होता. घरची कामे करत ते शेतातही राबायचे. बारावीत असताना भरधाव कारने उडवले. मनगट, कंबर आणि शरीराच्या अन्य भागांना प्रचंड मार बसला. एक नव्हे दोन नव्हे तब्बल ११ ते १२ शस्त्रक्रिया झाल्या. लष्करातलं स्वप्न भंगलं. संयमशक्तीची परिसीमा झाली; पण लढण्याची जिद्द कायम असल्याने हार मानली नाही हे सांगताना महेश यांचे डोळे पाणावले. शिक्षण आणि नोकरी जिद्दी महेश यांनी बीएस्सी (केमिस्ट्री), मग ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ सेफ्टी एन्व्हॉयर्न्मेंट’ व त्यानंतर एमबीए पूर्ण केलं. पैसे नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. घरची शेती आणि त्यातही दुग्धव्यवसाय आकारास आणायचा होता; पण कर्जाचा डोंगर झाला होता. अशातच ओमान देशात नोकरी मिळाली. तीन वर्षे तेथे मन लावून काम केलं. पैसे मिळवले. कर्ज फिटण्यास सुरुवात झाली. आता महेश गावी परतले. गोसंगोपनातील अनुभव सन २०१७ चा काळ होता. देशी दुधाचे महत्त्व व त्यास असलेली बाजारपेठ पाहून देशी गायींचे संगोपन करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. गुजरात आणि हरियानातून आठ ते दहा गायी खरेदी केल्या. दुग्ध व्यवसायात मजूरबळ भरपूर लागते. मजुरांवर विश्‍वास ठेवला. त्यांनी लिलया कामही केले. पण पूर्वकल्पना न देता ते अचानक काम सोडून गेले. मोठे आर्थिक नुकसान झाले. मग गावातून महेश यांचे कुटुंब फार्ममध्येच राहण्यास आले. धक्क्यातून सावरत यांत्रिकीकरणाकडे महेश वळले. पुण्यातील प्रसिद्ध कंपनीतून देशी गायींसाठी एक लाख रुपये खर्चून मिल्किंग मशिन आणले. मजुरांची गरज कमी केली. मार्केट तयार केले सुरुवातीला २० लिटरपर्यंत दूध मिळायचे. देशी दुधाला छोट्या भागात मार्केट मिळवणे सोपे नव्हते. मग सांगली आणि मिरज शहर गाठले. शैक्षणिक व आर्थिक स्तर उच्च असलेला ग्राहक टार्गेट केला. विश्रामबाग भागातील उद्याने, मॉर्निंग वॉकिंग एरिया या ठिकाणच्या ग्राहकांना भेटायला सुरुवात केली. दूध मोफत देऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यासाठी बैठका घेतल्या. हळूहळू ग्राहक जोडले जाऊ लागले. मग पाऊच पॅकिंगमधून दूध घरपोच देण्याचा निर्णय घेतला, त्यात यश येऊ लागले. अन्य उत्पादनेदेखील हळूहळू ताक, दही, लोणी, तूप आदी उत्पादनांची निर्मिती व विक्री करण्याचाही आत्मविश्वास आला. ग्राहकांकडून या उत्पादनांना मागणी येऊ लागली. घरचा सेंद्रिय भाजीपालादेखील त्याबरोबर विक्री होऊ लागला. टेरेस गार्डनसाठी ग्राहक तसेच शेतकरी गोमूत्र आणि शेणाची मागणी करू लागले. आज महेश यांनी आपल्या व्यवसायात भक्कम पाय रोवले आहेत. आज दिवसातील १२ ते १६ तास ते कामांत व्यग्र असतात. महेश यांचा व्यवसाय

  • सध्या गायींची संख्या-
  • गीर - १८
  • सहिवाल - १४
  • राठी - ०४
  • एकूण - ३६
  • लहान - १५
  • दोन्ही वेळचे दररोजचे दूध संकलन - ८० ते कमाल १२५ लिटर, सरासरी १०० लि.
  • ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विश्रामबाग (सांगली) येथे विक्री केंद्र. त्याची जबाबदारी महेश यांची बहीण सांभाळते.
  • उत्पादनांचा यळकोट ब्रँड तयार केला. होम डिलिव्हरीमुळे ग्राहकांचा फीडबॅकदेखील घेता येतो.
  • दर
  • दूध - ७० ते ८० रुपये प्रतिलिटर
  • पुढील उत्पादने मागणीनुसार
  • दही - १०० रुपये प्रतिकिलो
  • ताक - ३० रुपये प्रतिलिटर
  • लोणी - २००० रुपये प्रतिकिलो
  • तूप - २६०० रुपये लिटर
  • - तुपाची विक्री- पुणे, सांगली, मुंबई
  • गोमूत्र - १५ रुपये प्रतिलिटर
  • शेण - १० रुपये प्रतिकिलो
  •  महेश पाटील - ७७५७०५२८५५, ८४५९६३१३६३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com