डागरहित, चमकदार, ‘ए’ ग्रेडचे वजनी पेरू

कोंडी (ता.उत्तर सोलापूर) येथील अमोल पाटील यांनी मोठ्या आकाराचा वजनी व तैवान पिंक अशा दोन प्रकारच्या पेरूंची शेती आधुनिक तंत्राद्वारे सुरू केली आहे. क्रॉप कव्हर, फोमनेट व प्लॅस्टिक बॅग आदींचा वापर तसेच फिल्टरद्वारे जीवामृत स्लरी व एकूणच व्यवस्थापनाद्वारे डागरहित चमकदार पेरू उत्पादित करून त्यांनी बाजारपेठेत त्यास मागणीही मिळवली आहे.
दर्जेदार पेरू व बागेला  नेट अंथरून केलेले आच्छादन.
दर्जेदार पेरू व बागेला नेट अंथरून केलेले आच्छादन.

कोंडी (ता.उत्तर सोलापूर) येथील अमोल पाटील यांनी मोठ्या आकाराचा वजनी व तैवान पिंक अशा दोन प्रकारच्या पेरूंची शेती आधुनिक तंत्राद्वारे सुरू केली आहे. क्रॉप कव्हर, फोमनेट व प्लॅस्टिक बॅग आदींचा वापर तसेच फिल्टरद्वारे जीवामृत स्लरी व एकूणच व्यवस्थापनाद्वारे डागरहित चमकदार पेरू उत्पादित करून त्यांनी बाजारपेठेत त्यास मागणीही मिळवली आहे.   सोलापूर- पुणे महामार्गावर सोलापूरपासून सुमारे १०-१२ किलोमीटरवर कोंडी गाव आहे. या महामार्गालगतच अमोल पाटील यांची दहा एकर शेती आहे. वडील निवृत्ती पाटील हे पहिल्यापासून शेतीच करीत. पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर अमोल यांच्यावर घरची जबाबदारी आली. ‘क्रेन सर्व्हिस’चा व्यवसाय सांभाळून त्यांनी शेतीकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्यास सुरवात केली. निरीक्षणशक्ती, जिद्द, धडपड, एखादे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेणे या गुणांच्या आधारे त्यांनी शेती विकसित करण्यास सुरवात केली. दरम्यान छोटा भाऊ नितीन ‘सिव्हिल इंजिनिअर होऊन शेती पाहू लागले. आई गजराबाई, बहीण तेजस्वी, काकू सुदामती यांची भक्कम साथ व वासुदेव बोबडे यांची मदत मिळाली. त्यातून अलीकडील वर्षांत शेती आणि व्यवसाय हे दोन्ही व्याप सांभाळत ऊस आणि केळीत काही प्रयोग केले. बंगळुरुचा दौरा ठरला ‘टर्निंग पॅाईंट’ पाच वर्षांपूर्वी बंगळुरु येथे राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या भागात पेरूच्या काही बागा पाहता आल्या. त्यांचे वाण, त्यातील तंत्र, बाजारपेठ यांची माहिती झाली. गावी परतल्यावर मग पेरू उत्पादकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यातून कन्हेरगाव येथील रवींद्र शिंदे यांची बाग पाहिली. अखेर हे पीक करायचे नक्की झाले. दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड येथील मधून मोठ्या आकाराच्या वाणाची (प्रति रोप १६० रुपये) तर विशाखापट्टणम येथून तैवान पिंक वाणाची रोपे (प्रति रोप ६० रू.) आणली. म्हणजेच बंगळुरूचा दोरा ‘टर्निंग पॅाईंट’ ठरला. अशी आहे पेरूची शेती एकूण सुमारे आठ एकर शेती आहे. पैकी दोन एकर १५ गुंठ्यात मोठ्या आकाराचा तर साडेपाच एकरांत तैवान पिंक पेरू आहे. मोठ्या आकाराच्या वाणाची आठ बाय आठ फूट अंतरावर तर तैवान पिंक वाणाची १० बाय नऊ फूट अंतरावर लागवड केली आहे. डबल लॅटरल ठिबकचा वापर केला आहे. मार्च २०२० च्या दरम्यान लागवड केल्यानंतर पुढील जानेवारीत छाटणी केली. त्यानंतर जून, जुलैमध्ये उत्पादन मिळाले. त्यानंतर ऑगस्टमध्ये छाटणी केली. त्यानंतर सध्याच्या काळात उत्पादन सुरू झाले आहे. उत्पादन पहिल्या उत्पादनात एकूण क्षेत्रातून मोठ्या पेरूवाणाचे ४३ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. दुसऱ्या टप्प्यात यंदा २४ टन उत्पादन मिळाले असून अजून १० ते १४ टन उत्पादनाची अपेक्षा आहे. तैवान पिंक बाबत बोलायचे झाल्यास मागील वर्षी लॉकडाऊन काळात फटका बसून ५० टक्के मालाचे नुकसान झाले. एकूण क्षेत्रातून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा दुसऱ्या टप्प्यात आत्तापर्यंत ३० ते ३२ टन मालाचे उत्पादन झाले आहे. तर अजून १५ टन उत्पादनाची अपेक्षा आहे. दर व विक्री. मोठ्या पेरूवाणास प्रति किलो ४०, ५५ ते ६०, ६५ रुपयांपर्यंत व तैवान वाणास ४०, ४२ ते ४५, ५० रुपयांपर्यंत. केरळ, बंगळुरु, चेन्नई आणि नागपूर भागातून या पेरुवाणांना मोठी मागणी आहे. काही व्यापारी थेट थेट शेतावर येऊन खरेदी करतात. त्याशिवाय स्वतः अमोलही या बाजारपेठांना माल पाठवतात. पेरूचे वजन वापरलेले सर्व तंत्रज्ञान व व्यवस्थापनातून पेरू चांगला पोसला गेला. त्याच्या वजनात व गुणवत्तेत वाढ झाली. वाणनिहाय तीनशे, चारशे ग्रॅमपासून ते सातशे ग्रॅम, एक किलोपर्यंत पेरूचे वजन मिळाले आहे. फळ डागरहित असून त्याची चकाकी चांगली आहे. मागील वर्षी सर्वाधिक सव्वादोन किलोपर्यंत काही पेरू मिळाले. पेरूच्या गुणवत्तेसाठी बागेची छाटणी केल्यापासून ९५ ते ११० दिवसांच्या कालावधीत विविध संरक्षक आच्छादनांचा वापर केला. यात उष्णतेपासून संरक्षण (सनबर्निंग) मिळण्यासाठी बागेवर क्रॉप कव्हर वा नेटचा वापर केला. पेरूची काढणी करताना एकमेकांना घासले जाऊन ते काळे पडतात. वाहतुकीतही त्यांना डाग वा ओरखडे येतात. त्यासाठी फोमनेट लावले. शिवाय फळमाशी वा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फळांचा प्लॅस्टिक बॅगेचे आच्छादन केले. फोमनेट व बॅगेचे कव्हर व मजुरी मिळून प्रति फळ तीन रुपयांपर्यंत तर बागेवरील नेटसाठी एकरी ४० हजार रुपये खर्च आला. अशा पद्धतीने तिहेरी संरक्षण होऊन पेरुबाग हवामान व किडीपासून संरक्षित झाली. शिवाय त्यास गुणवत्ता, आकारमान आणि चकाकी प्राप्त झाली. कीडनाशकांवरील खर्चातही २० ते ३० टक्के बचत झाली. शेणस्लरीचा वापर प्रत्येकी एकहजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या उभारून जीवामृत स्लरी तयार केली जाते. ती फिल्टर केली जाते व ठिबकद्वारे बागेला दिली जाते. आठवड्यातून एकदा तीनशे लिटर प्रति एकर प्रमाणात बागेला दिली जाते. सेंद्रिय मल्चिंग म्हणून झाडाच्या बुडात पाचटकुट्टी वापरण्यात येते. संपर्क- अमोल पाटील- ९८२२५९४०५१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com