दूध प्रक्रिया उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे

साडेतीन एकर शेतीतून फारसे हाती लागत नव्हते. अशावेळी २० लाखांचे कर्ज घेऊनकुंभेफळ (जि. औरंगाबाद) येथील अनिल शेळके यांनी गोपालन सुरू केले. सातत्य ठेवूननफ्यातून भांडवलवृद्धी केली. दूधसंकलन, प्रक्रिया पदार्थांच्या उत्पादनाद्वारे व्यवसायवृद्धी केली. आज महिन्याला पाच लाखांची उलाढाल करून घर व शेतीत त्यांनी आर्थिक सक्षमता आणली आहे.
गायींचा गोठा व तूपनिर्मिती.
गायींचा गोठा व तूपनिर्मिती.

साडेतीन एकर शेतीतून फारसे हाती लागत नव्हते. अशावेळी २० लाखांचे कर्ज घेऊन कुंभेफळ (जि. औरंगाबाद) येथील अनिल शेळके यांनी गोपालन सुरू केले. सातत्य ठेवून नफ्यातून भांडवलवृद्धी केली. दूधसंकलन, प्रक्रिया पदार्थांच्या उत्पादनाद्वारे व्यवसायवृद्धी केली. आज महिन्याला पाच लाखांची उलाढाल करून घर व शेतीत त्यांनी आर्थिक सक्षमता आणली आहे.   कुंभेफळ (जि. औरंगाबाद) येथील अनिल तुळशीराम शेळके हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांची दोन ठिकाणी मिळून सुमारे साडेतीन एकर शेती आहे. आई पद्‌माबाई. वडील तुळशीराम. पत्नी रेणुका, पाचवीत शिकणारी मुलगी सृष्टी, तिसरीत शिकणारा यशराज असं त्यांचं कुटुंब आहे. अर्धा एकर शेडनेट असून, कुंभेफळ शिवारातील जवळपास आठ एकर शेती ते ठोक्‍याने करतात. वळले दुग्ध व्यवसायाकडे अल्प शेतीमुळे कुटुंबाची आर्थिक गरज पूर्ण होत नसल्याने अनिल खासगी कंपनीत नोकरी करायचे. स्वत:चा व्यवसाय असावा असे त्यांना सतत वाटायचे. या दरम्यान मित्र रियाज पटेल यांनी मुक्त गोठा व संकरित गोपालनाचा सल्ला दिला. अभ्यास व विचारांती तो अमलात आणण्याचे ठरवले. त्यापूर्वी बारामती येथील सावंत डेअरी फार्म येथे भेट दिली. कुंभेफळचे सरपंच सुधीर मुळे, कृष्णा गावंडे यांनाही मदतीला घेतले. पाच दिवसांच्या प्रशिक्षणातून बरीच माहिती झाली. सुरुवातीला भांडवल काहीच नव्हते. सुमारे २० लाख रुपयांचे कर्ज बॅंक ऑफ इंडियाकडून घेत मुक्त गोठा व शेड उभारले. दिवसाला १० ते १२ लिटर दूध देऊ शकणाऱ्या नऊ एचएफ गायी खरेदी केल्या. स्थानिक संघाला दूध पुरवठा सुरू केला. खरेदी व गोठ्यात पैदास अशी टप्प्याटप्प्याने गायींची एकूण संख्या ३० वर पोहोचली. यातील निम्मी संख्या ही गोठ्यातील पैदाशीची आहे. जनावरांचे नेटके व्यवस्थापन अनिल यांनी जनावरांसाठी १०० बाय ६० फूट आकाराचा गोठा परिसर उभारला आहे. मुक्‍त गोठ्यात गायींना बसण्यासाठी मॅटचा वापर होतो. ओला व सुका चारा यांच्याबरोबर वर्षाला १०० बॅग्ज प्रमाणात मुरघासही तयार केला जातो. लसीकरण व आरोग्याबाबत पशुवैद्यक डॉ. गणेश सुरे यांचे मार्गदर्शन मिळते. मक्त्याने केल्या जाणाऱ्या शेतीत पाच एकरांत मका, एक एकरात लसूण घास, एक एकरात सुपर नेपिअर गवत व एक एकरात ज्वारी घेण्यात येते. संकटाने दाखविला प्रक्रियेचा मार्ग दुग्ध व्यवसायात जम बसतो आहे असे वाटत असतानाच कोरोनाचं संकट समोर आलं.शिल्लक राहणाऱ्या दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला. पण संकट हीच संधी मानून प्रक्रियेचा पर्यायही समोर उभा राहिला. त्यातून पनीर, दही, तूप आदी पदार्थ तयार करून त्यास विक्री केंद्रांचे पर्यायदेखील शोधले. आज घरचे किमान १५० लिटर व त्याहून जास्त तसेच शेतकऱ्यांकडील दूध मिळून सुमारे एक हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते. त्यातील निम्या दुधाचा प्रक्रियादार व अन्य व्यावसायिकांना पुरवठा होतो. तर उर्वरित दुधावर प्रक्रिया केली जाते. अनिल यांना पनीरसारख्या उत्पादननिर्मितीविषयी माहिती नव्हती. मग यू-ट्यूब चॅनेल व अन्य स्रोतांद्वारे माहिती घेतली. अनेकदा निर्मितीत पदरी अपयश आले. पण चिकाटी व सातत्यातून अखेर उत्पादनातील तंत्र अवगत होऊ लागले. व्यवसाय वृद्धी जालना-औरंगाबाद महामार्गावरील जवळपास १५ ते २० होटेल्स, मिठाईची तीन दुकाने, डेअरी व अन्य दुकाने आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अनिल यांनी आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. ‘श्री विघ्ननहर्ता डेअरी’ हे स्वतःचे विक्री केंद्रही सुरू केले. त्याचबरोबर मित्राकडील एका विक्री केंद्रातही उत्पादनांची विक्री सुरू झाली. यातून सुरुवातीला महिन्याला दोन ते तीन किलोपर्यंत विकले जाणारे पनीर आता ४० ते ५० किलोंपर्यंत विकले जाते. तूप, खवा व दही ही उत्पादने दिवसाला पाच ते सहा किलोपर्यंत विकली जातात. अन्य शेतकऱ्यांना गायी खरेदी करण्यात मदत केली. त्यामुळे त्यांच्याकडील दुधाचा पुरवठा होऊन दूध संकलन वाढण्यास मदत झाली. व्यवसायातून प्रगती अनिल सांगतात, की व्यवसाय शून्यातून सुरू केला. पुढे मिळत जाणाऱ्या नफ्यातून भांडवलवृद्धी करीत गेलो. त्यातून दूध काढण्यासाठी तसेच चारा कापण्यासाठी कुट्टी यंत्र, प्रक्रिया पदार्थांसाठी बॉयलर, क्रीम सेपरेटर, ट्रॅक्टर आदी सामग्री घेणे शक्य झाले. बॅंकेचे कर्जही बहुतांश प्रमाणात फेडले आहे. महिन्याला एकूण पाच लाख रुपयांपर्यंत उलाढाल करणे शक्य झाले आहे. पाच ते सहा जणांना रोजगार दिला आहे. एका कंपनीच्या पशुखाद्याची अन्य शेतकऱ्यांना विक्री केली जाते. त्यातूनही नफा मिळवीत उत्पन्नस्रोत वाढविला आहे. सर्वांचे योगदान ठरले महत्त्वाचे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेडनेट व शेततळ्याचा लाभ मिळाला. कृषी विभागाचे रंगनाथ पिसाळ यांचे सहकार्य लाभले. पुतण्या नवनाथ शेळके व भाचा बळिराम कुबेर यांची शेतीत तर पत्नी रेणुका यांची प्रक्रिया व्यवसायात मदत होते. पुतण्या ऋषिकेश विक्री व वितरण तर वडील तुळशीराम डेअरीची जबाबदारी सांभाळतात. अनिल यांनी दुग्ध व्यवसायाकडे लक्ष देताना शेतीकडेही चांगले लक्ष दिले आहे. डाळिंब, गुलाब, ढोबळी मिरची, काकडी अशी पिके त्यांनी घेतली आहेत.   संपर्क- अनिल शेळके, ९८९०८४८५७४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com