वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीर

हणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील चिदानंद धडके यांनी ऑस्ट्रेलियन जातीच्या संकरित पपई वाणाची शेती यशस्वी केली आहे. त्यातून वर्षभर उत्पन्न व बाजारभाव मिळत राहावा हा उद्देश त्यांनी जपला.
धडके यांच्याकडील पपईची दर्जेदार बाग
धडके यांच्याकडील पपईची दर्जेदार बाग

हणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील चिदानंद धडके यांनी ऑस्ट्रेलियन जातीच्या संकरित पपई वाणाची शेती यशस्वी केली आहे. त्यातून वर्षभर उत्पन्न व बाजारभाव मिळत राहावा हा उद्देश त्यांनी जपला.   सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी परिसरात हणमंगाव आहे. भाजीपाला, कांदा या पिकांत या भागाने ओळख तयार केली आहे. सोलापूरची बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असल्याने भाजीपाला शेतीवर या परिसराने अधिक भर दिला आहे. शेतीची वाट धरली गावातील चिदानंद धडके आपले मोठे बंधू विठ्ठल यांच्यासह एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. त्यांचे वडील मुरारी हे बैलांचा व्यापार आणि मजुरी करत. त्यांनी दोन्ही मुलांना मोठ्या कष्टाने शिकवले. दोघेही ‘एम.ए. बीएड’ आहेत. विठ्ठल सोलापुरात खासगी महाविद्यालयात शिक्षक आहेत. चिदानंद पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस होते. त्या बळावरच थोडी-थोडी करीत वीस वर्षांत तब्बल ४२ एकर शेती त्यांनी घेतली. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॅाकडाउन सुरू झाला आणि चिदानंद यांनी नोकरीचा राजीनामा देत थेट शेतीची वाट धरली. शेतीतील प्रयोग चिदानंद यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे नोकरीत असतानाच ते शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत होते. त्यातूनच २०१२ मध्ये त्यांनी केळीची लागवड केली. चांगल्या व्यवस्थापनावर भर देत दर्जेदार उत्पादन घेऊन केळीची निर्यातही केली. अडीच वर्षांपूर्वी ते पपईच्या प्रयोगाकडे वळले. सुरुवातीला सहा एकर आणि आता नंतर १० एकर अशी सध्या १६ एकरांत त्यांची पपई बाग उभी आहे. त्यातील सहा एकर बाग दीड ते पावणेदोन वर्षे वयाची असून फळावर आहे. त्याची काढणी सुरू आहे. व्यवस्थापनातील बाबी धडके यांनी सुरुवातीपासूनच पपईचे व्यवस्थापन चांगले ठेवण्यावर भर दिला. ऑस्ट्रेलियन जातीच्या वाणाची निवड केली. इंदूर (मध्य प्रदेश) येथील नर्सरीतून प्रतिनग ४० रुपये दराने रोपे आणली. सात बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. एकरी सुमारे एक हजार रोपे लागली. लागवडीनंतर प्रति झाड पाटीभर देशी गाईचे शेण रोपांच्या बुडात टाकले. त्यानंतर झाडांना ताकाची आळवणी केली. तुरीचा भुस्सा झाडाच्या बुडात वापरला. दुसऱ्या महिन्यात गूळ, शेण प्रत्येकी दोन किलो आणि गोमूत्र पाच लिटर या मिश्रणाने २०० लिटर पाण्याची आळवणी केली. तिसऱ्या महिन्यात झाडाच्या बुडात टोपलीभर शेणखत टाकले. चौथ्या महिन्यात जिवामृत ड्रीपमधून दिले. पाचव्या महिन्यात ह्युमिक ॲसिडचा वापर केला. सातव्या महिन्यात ०-५२-३४ या खताचा वापर केला. सातव्या महिन्यापासून फळे पक्व होण्यास सुरुवात झाली. मिलिबगचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाचा वापर केला. दर आठ ते दहा दिवसांतून एकदा किंवा बागेत लक्षणे पाहून फवारणी केली. पाणी व्यवस्थापनात सुरुवातीला एक दिवसाआड अर्धा तास पाणी दिले. त्यानंतर ते तासाभरापर्यंत वाढवण्यात आले. थेट बांधावरच विक्री पपईला सोलापूरसह पुणे, मुंबई या बाजारपेठा उपलब्ध आहेत. मात्र व्यापारी थेट शेतावरच खरेदीसाठी येतात. त्यामुळे तिथेच दर निश्‍चित केले जातात. वाहतूक खर्च, आडत-हमाली आणि अन्य खर्च याच बचत होते. गेल्या दोन वर्षांत पपईला किलोला ५ रुपये सरासरी, तर कमाल दर १५ ते १८ रुपये मिळाला. दर दहा दिवसांतून एकदा अशी महिन्यातून साधारण तीन वेळा काढणी होते. पवित्र रमजान महिना सध्या पार पडतो आहे. या काळात फळांना सर्वाधिक मागणी असते. त्याचा मोठा फायदा धडके यांना घेता आला. मागील वर्षी आणि यंदा असे दोन्ही हंगाम त्यांना मिळाले. अर्थात, अन्य महिन्यांपेक्षाही या कालावधीतील बाजाराचे गणित हमखास यशस्वी झाले. मार्केटचा विचार करून धडके यांनी आता स्वतःची रोपवाटिका उभारणी केली आहे. वाणाचे वैशिष्ट्य धडके पपईच्या वाणाबाबत म्हणाले, की त्याचा आकार लंबगोलाकार आहे. चवीला खूपच गोड व रंगही लाल आहे. वजन एक ते पावणेदोन किलोपर्यंत भरते. या झाडाला पानांचा संभारही चांगला असल्याने फळांना ‘सनबर्न’चा धोका कमी होतो. एकत्र कुटुंब ही ताकद धडके बंधूंच्या शेतीची खरी ताकद एकत्र कुटुंब आहे. विठ्ठल यांच्यासह पत्नी संगीता, मुलगा रविकिरण, विशाल आणि विनीत, तर चिदानंद यांच्या पत्नी रेश्मा, मुलगा सुयश आणि श्रेयश असं हे संयुक्त कुटुंब आहे. नव्या पिढीतील रविकिरण देखील सध्या शेतीची जबाबदारी सांभाळतो आहे. विशालने बी.टेक.ची पदवी घेतली असून, विनीतने ‘डिप्लोमा’चे शिक्षण घेतले आहे. चिदानंद म्हणाले, की पपई व्यतिरिक्त अन्य पिकेही घेतो. यंदा आठ एकरांत सुमारे १४० क्विंटलच्या दरम्यान ज्वारी तर चार एकरांत सुमारे ४० क्विंटल तूर उपलब्ध झाली. संपर्क- चिदानंद धडके, ९६८९४६०७७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com