पिरॅमिड ड्रायर’मुळे वाढली प्रक्रिया मालाची गुणवत्ता

कोसबाड (डहाणू) येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी व महिला बचत गटांसाठी‘पिरॅमिड सोलर ड्रायर’चे तंत्रज्ञान उपलब्ध केले. १२ ड्रायर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले.
पिरॅमिड सोलर ड्रायर
पिरॅमिड सोलर ड्रायर

कोसबाड (डहाणू) येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी व महिला बचत गटांसाठी ‘पिरॅमिड सोलर ड्रायर’चे तंत्रज्ञान उपलब्ध केले. १२ ड्रायर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्यातून कमी वेळेत प्रक्रिया होत उत्पादनाची चव, स्वाद, रंग व गुणवत्ता यात वाढ होत प्रक्रिया व्यावसायिकांना दरही चांगले मिळत आहेत. पालघर हा बहुतांश आदिवासी जिल्हा आहे. येथील डहाणू- घोलवडच्या चिकूने देशभर ओळख तयार केली आहे. नोव्हेंबरपासून बाजारात मोठया प्रमाणात चिकू येण्यास सुरुवात होते. आवक वाढल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा योग्य दर मिळत नाही. अशावेळी प्रक्रिया करणे हाच त्यावर उपाय ठरतो. त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होते. पारंपरिक प्रक्रियेतील समस्या डहाणू, बोर्डी, घोलवड परिसरांत मोठ्या प्रमाणावर बचत गटांच्या माध्यमातून चिकूपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. यात पावडर, चॉकलेट, सुपारी, मुखवास, लोणचे आदींचा समावेश असतो. डहाणूला समुद्र किनारा असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या पदार्थांना मागणी चांगली असते. हे पदार्थ तयार करण्यापूर्वी नैसर्गिकरीत्या पिकलेल्या चिकूचे काप करून उन्हात खुल्या वातावरणात सुकविले जातात. त्यासाठी तीन- चार दिवसांचा कालावधी लागतो. धूळ, पक्षी, माश्‍यांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यदायी बाबींचे पालन होत नाही. रंग, गुणवत्तेवर परिणाम होतो. कोसबाड- डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) हीच समस्या लक्षात घेऊन शेतकरी व बचत गटांसाठी ‘ड्रायर’ व त्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे ठरवले. ‘ड्रायर’ तंत्रज्ञान

 • घरगुती पातळीवर शेतमाल सुकविण्याच्या दृष्टीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे
 • (दापोली) पिरॅमिड आकाराचा ‘सोलर ड्रायर’ विकसित
 • तंबूच्या आकाराचा लोखंडी सांगाडा. त्याची पूर्ण घडी (फोल्डिंग) करता येते.
 • -चारही बाजू २०० मायक्रॉन जाडीच्या पारदर्शक प्लॅस्टिक शीटने आच्छादित.
 • ‘ड्रायर’च्या तळभागाला काळ्या रंगाचा कागद. त्यामुळे सूर्यकिरणे जास्त प्रमाणात शोषली जातात. यंत्रात ‘ट्रे’ ठेवण्यासाठी चार कप्पे.
 • वापर व वैशिष्ट्ये

 • ‘ड्रायर’ची उभारणी मोकळ्या जागेत, स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या जागी. घराच्या छतावरही शक्य.
 • उभारणीवेळी चारही बाजू क्‍लिपांच्या साह्याने घट्ट बसवणे गरजेचे. जेणे करून आतील गरम हवा बाहेर जाणार नाही.
 • दिवसभरात ‘ड्रायर’वर सावली पडणार नाही याची काळजी आवश्‍यक.
 • प्लॅस्टिक आच्छादन स्वच्छ ठेवावे. धूळ साचू देऊ नये. यामुळे सूर्यकिरणे अडवली जाणार नाहीत.
 • तळभागातील काळा रंगाचा कागद फाटणार नाही याची काळजी घ्यावी. फाटल्यास बदलावा, अन्यथा काळा रंगाचा प्लायवूडही वापरता येतो.
 • हवेतील धूळ, पालापाचोळा, उंदीर, घुशी कोंबड्या, वाऱ्यापासून संरक्षण
 • एकावेळी १० ते १५ किलो पदार्थांची वाळवणी शक्य.
 • खुल्या वाळवणीपेक्षा ‘ड्रायर’मध्ये वाळवलेल्या पदार्थांचा दर्जा, रंग व चव चांगली. वाळवणीही लवकर.
 • धान्ये, पालेभाज्या, फळे, पापड, कुरडया, शेवया, आवळा, सुपारी व अन्य पदार्थ वाळवता येतात.
 • शेतकरी अनुभव मालती बाग नावाने आमचे घोलवड येथे चार एकरांत कृषी पर्यटन केंद्र आहे. त्यास चिकू प्रक्रियेची जोड दिली आहे. येथे आंबा, चिकू, नारळ, केळी, हळद, भाजीपाला यांची लागवड होते. शेतीमाल व चिकूच्या मूल्यवर्धित पदार्थांची विक्री पर्यटन केंद्रामुळे मोठ्या प्रमाणावर होते. पूर्वी चिकू, हळद व आंब्याच्या फोडी उन्हात वाळवत असल्याने वेळ जास्त जायचा. काप काळपट व्हायचे. रंग, स्वाद, गुणवत्ता कमी व्हायची. ‘पिरॅमिड ड्रायर’मुळे प्रक्रिया सुकर होऊन सुरक्षितता व स्वच्छता प्राप्त झाली. सुकविण्याचा कालावधी कमी झाला. परिणामी उत्पादनांची विक्री वाढू लागली. चिकू प्रक्रियेतून वर्षाकाठी साठ ते सत्तर हजारांची उलाढाल करणे शक्य झाले आहे. ज्योती सावे, रामपूर-घोलवड, डहाणू संपर्क- ९८९०६६५१०२

  सावे यांना झालेला फायदा
  उत्पादन   वार्षिक उत्पादन पारंपरिक (किलोचा) वार्षिक उत्पादन  ड्रायरमुळे (किलोचा) सध्याचा दर  (किलो) 
  चिकू चिप्स ७० ते ७५ १२० ते १२५ ५०० रु
  चिकू सुपारी २५ ते ३० ४० ते ५० ३०० रु
  आवळा कॅण्डी ५० ते ६० ७० ते ८० ४०० रु.
  आवळा मुखवास ५० ते ६० ७० ते ८० ३०० रु.

  प्रक्रियेतून महिला बचत गटाची उभारणी सन २०१७ मध्ये चिकू प्रक्रियेचे प्रशिक्षण केव्हीके येथे घेऊन साई समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून चिकू चिप्स व पावडर बनविण्यास सुरुवात केली. काप पूर्वी नैसर्गिकरीत्या खुल्या वातावरणात उन्हात वाळवत असल्याने अनेक समस्या भेडसवायच्या. ‘ड्रायर’च्या वापरामुळे वेळेत बचत होऊ लागली. उत्पादनांचा रंग, स्वाद, गुणवत्तेत सुधारणा झाली. परिणामी, दर चांगला मिळू लागला. पापड सुकविण्यासाठीही ‘ड्रायर’ उपयुक्त ठरत आहे. त्यात साधारणतः १५० ते २०० पापड मावतात. नाचणी, बटाटा, तांदूळ, पोह्याचे पापड तयार करणे शक्य होते. चिकू प्रक्रियेतून सहा महिन्यांत चाळीस ते पन्नास हजार, तर पापड उद्योगातून दहा ते पंधरा हजारांची उलाढाल होत आहे. महिला उद्योजकांसाठी रोजगाराची ही संधीच उपलब्ध झाली आहे. जयश्री ईभाड, साई समर्थ महिला बचत गट भोनर पाडा, कोसबाड हिल, डहाणू संपर्क- अनुजा दिवटे, ९९२०९३५२२३ (लेखिका दिवटे या ‘केव्हीके’ त विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) तर डॉ. जाधव केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com