एक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेती

एक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेती
एक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेती

खानापूर (जि. पुणे) येथील कागदी बंधूंनी पिरॅमिड किंवा व्हर्टिकल फार्मिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण प्रयोग चार गुंठ्यात उभारला आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून त्यात तीन ते चार ‘एक्सॉटिक’ भाजीपाला उत्पादन यशस्वी केले आहे. पॉलिहाऊसमधील रंगीत ढोबळी मिरचीत हातखंडा मिळवून पूरक व्यवसायांसह एकात्मिक शेती उभारली आहे. खानापूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील अमजद आणि इसाक या कागदी बंधूंची तीन एकर शेती आहे. दहा वर्षांपासून पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरची उत्पादनात सातत्य ठेवत त्यांनी या शेतीत हातखंडा तयार केला आहे. हा दीर्घ अनुभव सुरू असताना प्रत्येकी दहा गुंठे शेतात परदेशी (एक्सॉटिक) भाजीपाल्याचे उत्पादन ते घेत होतेच. व्हर्टिकल फार्मिंगचा प्रयोग मजूरटंचाई, कमी जागेत अधिक उत्पादकता व नफा घेणे या बाबींचा अभ्यास करून नवे प्रयोग करण्याचे कागदी यांचे प्रयत्न सतत सुरू होते. नावीन्याचा शोध घेत असताना यू ट्यूबवर परदेशातील विविध प्रयोग ते अभ्यासत होते. एकदा पिरॅमिडच्या आकाराच्या स्ट्रक्‍चरवर शेती केल्याचा व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला. त्याचा उत्पादन व अर्थशास्त्र या दृष्टीने अभ्यासही केला. मग ही संकल्पना साकारण्याचे ठरवले. आपला अनुभव व ज्ञानकौशल्य वापरून ती अमलात आणली व यशस्वीही केली.  अशी आहे पिरॅमिड शेती

  • चार गुंठ्यात ५० बाय १८ फूट उंचीचे पिरॅमिड आकाराचे स्ट्रक्टरमधील उंची १२ फुटाची.
  • लोखंडी अँगल्सचा सांगाडा. रोपे लावण्यासाठी पीव्हीसी पाइप्सचा वापर.
  • प्रत्येकी एक फुटावर रोप लागवड
  • हायड्रोपोनिक्स पद्धतीचा वापर. मातीऐवजी कोकोपीट.
  • ठिबकद्वारे पाणी व खते.
  • सर्व गुंतवणूक- पाच लाख रुपये
  • या प्रयोगाला अलीकडील महिन्यातच सुरुवात. मात्र, सुमारे ५५ दिवस कालावधीची किमान तीन ते चार पिके घेतली.
  • घेतलेली पिके

  • लोलोरोसा, रोमन, आइसबर्ग, पाकचॉय आदी
  • उदाहरण सांगायचे तर चार गुंठ्यात आइसबर्गच्या सुमारे सहा हजार रोपांची लागवड
  • बियाणे रोपवाटिकांत वाढवून सुमारे ३० दिवसांनी पाइप्समध्ये लागवड
  • पुढील ३० दिवसांत जैविक विद्राव्य खते व गरजेनुसार जैविक कीडनाशकांचा वापर
  • चार गुंठ्यात सुमारे एक टन ते १४०० किलोपर्यंत मिळाले उत्पादन
  • विक्री व्यवस्था कागदी अनेक वर्ष परदेशी भाजीपाल्यांचे उत्पादन घेत असल्याने पंचतारांकित हॉटेलला पुरवठा करणाऱ्या मुंबई, पुण्यातील व्यापाऱ्यांशी त्यांचा संपर्क आहे. त्यांना हा भाजीपाला पुरवठा केला जातो. जून, जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये कमाल दर असतो. वर्षभरात ३० ते १०० रुपये प्रतिकिलो तर सरासरी ५० रुपये दर मिळतो. खर्च वजा जाता सुमारे ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न ६० दिवसांच्या कालावधीत मिळते. या तंत्राचे झालेले फायदे

  • मातीतून येणाऱ्या किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी. त्यामुळे फवारण्या व त्यावरील खर्च कमी
  • खुरपणी व त्याचा खर्च नाही.
  • मजूरबळ कमी लागते.
  • कमी जागेत चांगले उत्पादन साध्य होते.
  • ‘ॲक्वापॉनिक्स’ चा प्रयोग प्रयोगशील वृत्ती कायम ठेवलेले कागदी यांनी ‘ॲक्वॉपॉनिक्स ’ शेतीचाही प्रयत्न मागील वर्षी केला. त्यासाठी पाच लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र, या प्रयोगात तेवढे यश मिळाले नाही. मात्र, हायड्रोपोनिक्स प्रयोगात यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील तज्ज्ञ गणेश पडवळ यांच्या मार्गदर्शनानुसार, टप्प्याटप्प्यांने पिरॅमिडवरील शेतीचे क्षेत्र वाढविणार आहे. एकात्मिक शेतीचा आदर्श कागदी पोल्ट्री आणि मत्स्यशेतीही करतात. इसाक यांनी आपल्या जबाबदारीखाली तीन वर्षांपूर्वी लेअर पोल्ट्री सुरू केली. सध्या साडेचार हजार पक्षांचे संगोपन होत असून दररोज सुमारे दोन हजार ते चारहजार अंड्यांचे उत्पादन मिळते. पाच गुंठ्यात पॉलिहाऊसमध्ये मत्स्यशेतीही साकारली आहे. यापूर्वी तिलापिया तर यंदा रूपचंदा माश्यांचे संगोपन होत आहे. त्यातून वर्षाला सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मत्स्यशेतीचे पाणी पॉलिहाऊसमधील रंगीत ढोबळी मिरचीसाठीही वापरले जाते. पॉलिहाऊसमधील मत्स्यशेतीच्या प्रयोगात तापमान नियंत्रणात राहत असल्याने माश्यांची मरतूक कमी होऊन वाढ आणि वजन चांगले मिळते. वर्षभरात दोन टनांपर्यंत माश्यांचे उत्पादन मिळते असा अनुभव आहे. विक्री पुण्यात होते. किलोला ५० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. ढोबळीचे उत्पादन रंगीत ढोबळी मिरचीसाठी सुमारे ४३ गुंठ्यात दोन पॉलिहाऊसेस आहेत. एकरी सुमारे २५ टन उत्पादन मिळते. पुणे व मुंबई येथे विक्री होते. त्यास किलोला सरासरी ५० रुपये दर मिळतो. , संपर्क-अमजद कागदी- ९८२२९८०६५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com