निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान- तंत्रज्ञानरूपी, रसायन अवशेषमुक्त व्यावसायिक अशा जागतिक दर्जाच्या शेतीचा आदर्श राहुल रसाळ या तिशीतील युवकाने उभारला आहे. विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या सध्याच्या शेतीत इच्छाशक्ती व स्वकर्तृत्वातून समस्त शेतकऱ्यांसाठी चैतन्यरूपी प्रकाशवाटा तयार केल्या आहेत. शेतीला विविध संकटरूपी अंधाराने घेरले आहे. अशावेळी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करून शेतीच्या वाटा प्रकाशमान करणारे आणि शेतीत नवचैतन्य आणणारे युवकही पाहण्यास मिळतात. नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील राहुल अमृता रसाळ या केवळ एकोणतीस वर्षे वयाच्या युवकाची कीर्ती त्यामुळेच राज्य आणि त्याबाहेर झाली आहे. नवे प्रयोग, तंत्रज्ञान पाहण्यासाठी आपण इस्राईल, नेदरलॅंड, ब्राझील, चिली आदी देशांना भेटी देतो. पण हेच जागतिक दर्जाचं शेती व्यवस्थापन आपल्याच मायभूमीत म्हणजे राहुलच्या शेतीत अनुभवता येतं. शेतीतच खरा अर्थ मध्यम उंची व शरीरयष्टी, साधी राहणी, विनम्र स्वभाव आणि शेतीचा भला व्याप सांभाळून सातत्याने सुरू असलेला अभ्यास असं राहुलचं व्यक्तिमत्त्व आहे. शेतीत राम राहिलेला नाही अशी हतबलता व्यक्त करणारे, व्यवसाय- नोकरीला पसंती देत शहरांची वाट धरणारे, समस्यांशी लढत शेतीत तगून राहणारे आणि शहरांकडून शेतीकडे वळणारे अशा समस्त वर्गांसाठी राहुल हे नवचैतन्याचं स्फुलिंग आहे. अन्य व्यवसाय, नोकरीपेक्षा शेती-मातीतच पैसा, वैभव, समृद्धी आहे. कुटुंबाचं सुखसमाधान, शांती, आरोग्य आहे. सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठा आणि ‘सेलिब्रिटी’ पणही आहे हे राहुलनं सिद्ध केलं आहे. ब्राझील, चिली, स्पेन, नेदरलॅंड आदी सुमारे सात- आठ देशांना त्यानं भेट दिली आहे. कमी वयात कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांचा तांत्रिक सल्लागार सदस्य होण्याचा मान पटकाविला आहे. विविध पुरस्कारांसह शास्त्रज्ञांनी पाठ थोपटली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची शेती आपल्या ६५ एकरांतील शेतीत २० एकर द्राक्षे, त्यात करटुल्याचे आंतरपीक, १५ एकर डाळिंब, १० एकर टोमॅटो व उर्वरित क्षेत्रात भाजीपाला अशी पीक पद्धती आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून शेतीत काम सुरू करून राहुलचा सुमारे १६ वर्षांचा दांडगा अनुभव तयार झाला आहे. नाशिक येथील मुक्त विद्यापीठातून ‘बीएस्सी ॲग्री’च्या चौथ्या वर्षाला तो शिकत आहे. मात्र ज्ञान, अनुभव यांचा मेळ घातला तर लौकिक अर्थानं त्यानं ‘पीएचडी’ पूर्ण केली आहे असं म्हटल्यास वावगं नाही. त्याच्या शेतीतले सारे अध्याय समजून घेण्यासाठी ‘ॲग्रोवन’मधून या महिन्यापासून मालिका सुरू होत आहे. राहुल यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
संपर्क- राहुल रसाळ- ९७६६५५०६२४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.