गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेती

-अळूच्या बहरलेल्या शेतात माणिक भोंग
-अळूच्या बहरलेल्या शेतात माणिक भोंग

सुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती करून वर्षभर हमखास उत्पन्नाचा मार्ग लऊळ (जि. सोलापूर) येथील भोंग कुटुंबाने शोधला आहे. या शेतीत तब्बल ३० वर्षे सातत्य ठेवले आहे. सातही दिवस विविध आठवडी बाजारांत थेट विक्रीचा मार्ग शोधला आहे. अळू हे व्यावसायिक पीक कसे होऊ शकते याचा आदर्शच या कुटुंबाने घालून दिला आहे.   सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळपासून आत कुर्डूवाडी मार्गावर लऊळ गाव लागते. येथे माणिक भोंग यांची साडेसात एकर शेती आहे. त्यात तीन एकर ऊस, अर्धा एकर ड्रॅगन फ्रूट आणि सुमारे १५ ते १७ गुंठ्यांत अळू आहे. सन १९९० पासून माणिक यांना शेतीचा अनुभव आहे. त्या वेळी एकदा बंधू विलास आणि चांगदेव यांनी महाशिवरात्रीच्या दरम्यान मित्र बशीर शेख यांच्याकडून अळूचे काही गड्डे आणून एक गुंठ्यात लावले. सुमारे महिना- दीड महिन्यात अळू विक्रीस तयार झाला. पंढरपूरच्या आठवडा बाजारात चांगली विक्री झाली. त्यातून कमी कालावधीत चांगले पैसे मिळाल्याने उत्साह वाढला. त्यानंतर मग या पिकाची वाट भोंग यांनी जी धरली ती आजतागायत कायम आहे. आज हे कुटुंब विभक्त झाले असले तरी तीनही भावांनी अळूची शेती सोडलेली नाही ही विशेष बाब आहे. संपूर्ण कुटुंब स्वतः माणिक हे आज प्रतिदिन किमान ४०० ते ५०० पेंढ्यांची विक्री करतात. या कामात आज त्यांच्या पत्नी, तीन मुले आणि सुना असे सर्व कुटुंबच राबते. बाराही महिने त्यांचा हा व्यवसाय अविरत सुरू आहे. या भागात अळूचे शेतकरी म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. भोंग यांच्या अळूशेतीतील मुद्दे

  • सुमारे तीस वर्षांच्या काळात भोंग यांचा अळू शेतीत हातखंडा तयार झाला आहे. सध्या माणिक विक्रीची जबाबदारी तर मुलगा स्वप्निल शेतीची जबाबदारी पाहतो. त्यांच्या अनुभवानुसार एकदा लागवड केल्यानंतर अळूचे पीक सुमारे तीन ते चार- पाच वर्षे चालते. त्यानंतर जागा बदलून नव्याने लागवड करावी लागते.
  • लागवडीसाठी खडकाळ, माळरानाची, पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
  • अळूला पाण्याची जास्त गरज असते. दररोज व किमान एकदिवसाआड पाणी द्यावेच लागते.
  • एक ते दोन महिन्यांतून १८-४६-०, १०-२६-२६ किंवा युरिया या खताचा डोस द्यावा लागतो.
  • थंडीच्या दिवसात अळूची वाढ कमी असते. या काळात फार चांगले उत्पादन मिळत नाही. या काळात शेणखत देणे फायदेशीर ठरते. वर्षाला पाच ते सहा गाड्या शेणखत दिले तरी चालते. त्यामुळे अळू दर्जेदार होतो. किडी-रोगांची समस्या कमी होते. अळी, मावा आदींच्या नियंत्रणासाठी एखादी फवारणी होते.
  • अळूचा हंगाम पाण्याची वर्षभर सोय असेल तर लागवड कधीही करता येऊ शकते. मात्र, जून ते सप्टेंबर हा अनुकूल हंगाम आहे. अर्थात अळूला बाराही महिने मागणी असते. त्यातही फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात अधिक मागणी असते. थंडीच्या दिवसात मागणी असली तरी उत्पादन हाती नसते. थेट विक्रीतून नफा अळूचे व्यवस्थापन तुलनेने कमी त्रासदायक आहे. पण, त्याच्या विक्रीचा मोठा प्रश्न होता. बाजार समितीमध्ये दररोज विक्री होईलच याची खात्री भोंग यांना नव्हती. त्यामुळेच त्यांनी विविध आठवडा बाजारांत बसून थेट विक्री करण्यासाठी ठरवले. आठवड्यातील बुधवार वगळता सहाही दिवस अशाच प्रकारे विक्री करून नफा कमविण्यात येतो. सात दिवसांची तयार केलेली बाजारपेठ

  • सोमवार- अकलूज,
  • मंगळवार- माढा
  • बुधवार - सुट्टी
  • गुरुवार- कुर्डुवाडी
  • शुक्रवार- टेंभुर्णी
  • शनिवार- मोडनिंब
  • रविवार- मोहोळ
  • अळू एक्सप्रेस माणिक पूर्वी सायकलवरून व त्यानंतर मोटारसायकलवरून विक्री करायचे. आता दररोज कुठल्या ना कुठल्या गावच्या आठवडा बाजारात जायचे असल्याने आणि प्रत्येक बाजारातील ग्राहक आणि मागणीचा अंदाज आल्याने अळूची मागणीही वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी त्यांनी छोटे चारचाकी वाहन घेतले आहे. ज्या पिकाने अर्थकारणाला गती दिली त्यावरूनच आपल्या वाहनाला अळू एक्सप्रेस असे नाव त्यांनी दिले आहे. त्यांची ही अळू एक्सप्रेस माढ्यासह पंढरपूर, मोहोळ, बार्शी अशा सर्व भागांत बाजाराच्या निमित्ताने फेरफटका मारते. पंचक्रोशीत त्यामुळेच भोंग यांच्या अळूने नाव केले आहे. दररोज ताजे उत्पन्न दररोज दुपारी तीन ते सहा या वेळेत अळूची पाने खुडायची. ती पाण्यात धुऊन एका टोपलीत ओल्या पोत्यात भरून ठेवायची. संध्याकाळी प्रत्येकी २० पानाची एक याप्रमाणे पेंढ्या तयार करायच्या अशा रोजचा दिनक्रम असतो. दररोज किमान ४०० ते ५०० पेंढ्या तयार केल्या जातात. त्या आठवडा बाजारात नेऊन विकण्यात येतात. वर्षभराचा विचार केल्यास प्रति पेंढी पाच रुपये दर कायम मिळतो. दर त्यापेक्षा खाली येत नाही. दररोज २००० ते २५०० रुपये मिळतात. अर्थात काढणीसाठी मजूर व वाहतूक हाच काय तो मुख्य खर्च असतो. मात्र, या पिकाकडे व्यावसायिक दृष्टिकोनाने पाहात भोंग यांनी त्याची केलेली आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे. संपर्क- स्वप्निल भोंग- ८६६८५२३२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com