जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून यशाची गुढी

देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या पंचविशीतील तरुणाने जिरॅनिअमपासून तेलनिर्मिती व्यवसायात दमदार वाटचाल सुरू केली आहे. स्वतःकडील १० एकरांसह सुमारे २५ शेतकऱ्यांसोबत करार शेतीद्वारे जिरॅनियम उत्पादन घेण्यात येते.
काळे यांची जिरॅनिअमची शेती
काळे यांची जिरॅनिअमची शेती

देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या पंचविशीतील तरुणाने जिरॅनिअमपासून तेलनिर्मिती व्यवसायात दमदार वाटचाल सुरू केली आहे. स्वतःकडील १० एकरांसह सुमारे २५ शेतकऱ्यांसोबत करार शेतीद्वारे जिरॅनियम उत्पादन घेण्यात येते. येत्या काळात १०० एकरांपर्यंत विस्ताराचे ध्येय बाळगून त्यानुसार प्रयत्न व यशाची गुढी उंचावण्यास सुरुवात केली आहे. नगर तालुक्यातील देहरे, खारेकर्जुने, विळद पट्टा तसा दुष्काळी. काही प्रमाणात या भागाला मुळा धरणाचा आधार आहे. उपलब्ध पाण्यावर ऊस, फळपिके, कांदा यांसारखी पिके घेतली जातात. नगर शहराला जवळ असल्याने दुग्ध व्यवसायाचाही जोडही काही शेतकरी देतात. त्यामुळे दुग्ध उत्पादन करणारे गाव अशी देहरेची ओळख आहे. शेतीतील नवे व्यवसाय, बाजारपेठांच्या मागण्या ओळखून नवे प्रयोग करण्याकडेही कल वाढला आहे. काळे यांची शेती गावातील विक्रम काळे यांची वीस एकर शेती आहे. त्यांचा मुलगा वैभव याने ‘बीएस्सी ॲग्री’चे घेतले. पूर्वी काळे कुटुंब पारंपरिक पिके घेत. सन २००५ मध्ये आठ एकरांवर डाळिंब लागवड केली. मात्र तेलकट डाग व अन्य रोगांचा सातत्याने प्रादुर्भाव होऊ लागला. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यात तफावत येऊ लागली. मग बाग काढून टाकली. दरम्यान, वैभव यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर गुजरातमध्ये एका कंपनीत चार महिने नोकरी केली. त्यानंतर काही काळ कांदा खरेदी- विक्री व्यवसाय केला. त्यानंतर पूर्णवेळ शेतीतच करिअर करण्याचे पक्के करून सूत्रे हाती घेतली. जिरॅनिअम शेतीचा शोध अभ्यासू व शोधक वृत्तीच्या वैभव यांना मुंबईत सुगंधी उत्पादने तयार करणाऱ्या आणि जिरॅनिअम तेल खरेदी करणाऱ्या कंपनीबाबत माहिती मिळाली. तेलाची मागणी, महत्त्व व अर्थकारण समजले. हाच व्यवसाय करायचे पक्के झाल्यावर लखनौ येथील सुगंधी व औषधी तेलविषयक संस्थेत पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सन २०१७ मध्ये एका एकरात जिरॅनिअमची लागवड केली. व्यवसायातील वाटचाल वैभव यांनी तेलखरेदी करणाऱ्या मुंबई येथील कंपनीविषयीही माहिती घेतली होती. त्यांच्याकडून रोपे उपलब्ध झाली. वैभव सांगतात की सुरुवातीला स्टंप लावावे लागतात. नर्सरीत वाढ करावी लागते.पुनर्लागवड केल्यानंतर चार महिन्यांनी उत्पादन सुरू होते. त्यानंतर दर साडेतीन महिन्यांनीपाल्याची कापणी करावी लागते. लागवड केल्यावर तीन वर्षे पीक चालते. दर पंधरा दिवसांनी पाणी द्यावी लागते. बाकी खते व कीडनाशकांचा गरजेनुसार वापर होतो. दीड वर्षापासून लागवडीसाठी मल्चिंगचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्यात बचत होत आहे. तणांची समस्याही कमी झाली आहे. उत्पादन व करार शेती एका वर्षात एकरी तीस ते चाळीस टन पाला मिळतो. त्यापासून ३० ते ४० किलो तेल उपलब्ध होते. पूर्वी एक एकर असलेले क्षेत्र आता १० एकरांवर नेले आहे. मात्र तेलाची मागणी पाहात उपलब्धता वाढवण्यासाठी परिसरातील सुमारे २५ शेतकऱ्यांसोबत करार शेती करण्यास सुरुवात केली आहे. प्रति टन पाच ते सहा हजार रुपये दराने खरेदी केली जाते. करारांतर्गत शेतकऱ्यांना रोपांचा पुरवठा तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन केले जाते. व्यवसायातील ठळक बाबी

  • वैभव लक्ष्मी जिरॅनिअम फार्म असे प्रकल्प नामकरण
  • जिरॅनिअम तेल काढण्यासाठी २०१७ मध्येच दोन लाख रुपये गुंतवून डिस्टिलेशन युनिट उभारले.
  • प्रति दिन एक टन पाल्यापासून तेल काढणी क्षमता वाढवून ती चार टनांपर्यंत केली आहे. एका टॅंकचे दोन टॅंक उभारले आहे. प्रति टन तेल काढणीसाठी एक हजार रुपये खर्च येतो. चार लाखांची सध्याची गुंतवणूक.
  • मुंबई येथील एका कंपनीला तेल पुरवठा. प्रति लिटर साडेबारा हजार रुपये दर मिळतो.
  • वाहनातून पाठवले तरी रीतसर वजनानुसार रक्कम ऑनलाइन वर्ग होते.
  • चार वर्षांपासून तेलाच्या दरात चढउतार नाही.
  • अलीकडील वर्षांत नगर जिल्ह्यात केवळ दोन ठिकाणी जिरॅनिअमची लागवड. वैभव यांचा त्यात समावेश आहे. टाकळी खातगाव (ता. नगर) येथील योगेश पादीर, नीलेश कुलट तर गावातील हरिदास करंडे, भारत काळे, अमोल काळे यांनीही केली लागवड.
  • व्यवसाय विस्ताराचे उद्दिष्ट येत्या काळात वैभव यांनी सुमारे शंभर एकरांवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. वयाच्या पंचविशीतच त्यांनी चांगला पल्ला गाठला आहे. वडील विक्रम, आई लता, पत्नी अस्मिता यांची साथ त्यांना लाभते. भागात बहुतेक पहिल्याच असलेल्या या जिरॅनिअम प्रयोगाचे शेतकऱ्यांना अप्रूप आहे. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. रोपनिर्मिती, कंपोस्ट खत

  • तेलनिर्मितीनंतर उर्वरित भागापासून एकरी तीस ते पस्तीस टन कंपोस्ट खतनिर्मिती. त्याचा शेतात वापर.
  • यंदाच्या वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने जिरॅनिअम घेण्याचा प्रयोग
  • तीन वर्षांपासून रोपवाटिका. करार शेती अंतर्गत त्याचा पुरवठा केला आहे. वर्षाला तीन लाख रोपे तयार करण्याची क्षमता.
  • ‘नैसर्गिक संकटे, दरांचा प्रश्‍न, वन्यप्राणी, अन्य कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी सतत चिंतेत असतात. जिरॅनिअम शेतीवर मात्र तुलनेने प्रतिकूल बाबींचा परिणाम होत नाही. कोरोना संकटातही फार नुकसान सोसावे लागले नाही. जिरॅनिअम तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने व सुगंधी द्रव्ये निर्मिती उद्योगात होतो. त्यामुळे नैसर्गिक सुगंधी स्रोत म्हणून मागणी व संधीही भरपूर आहे. -वैभव काळे संपर्क- ९८६०८०२०६४  

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    logo
    Agrowon
    www.agrowon.com