रंगीत ढोबळी मिरचीची यशस्वी शेती

पुणे जिल्ह्यातील जातेगाव (बुद्रूक) (ता. शिरूर) येथील विठ्ठल उमाप या तरुण शेतकऱ्याने दीर्घ अनुभव, व्यवस्थापन व विक्री व्यवस्था यांच्या जोरावर पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीच्या शेतीत मास्टरी मिळवली आहे. जोडीला चेरी टोमॅटो व पार्सली या परदेशी भाज्यांच्या प्रयोगातून पूरक उत्पन्नही जोडण्यास सुरवात केली आहे.
उमाप यांची रंगीत ठोबळी मिरचीची शेती.
उमाप यांची रंगीत ठोबळी मिरचीची शेती.

पुणे जिल्ह्यातील जातेगाव (बुद्रूक) (ता. शिरूर) येथील विठ्ठल उमाप या तरुण शेतकऱ्याने दीर्घ अनुभव, व्यवस्थापन व विक्री व्यवस्था यांच्या जोरावर पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीच्या शेतीत मास्टरी मिळवली आहे. जोडीला चेरी टोमॅटो व पार्सली या परदेशी भाज्यांच्या प्रयोगातून पूरक उत्पन्नही जोडण्यास सुरवात केली आहे.   पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील जातेगाव (बुद्रूक) येथील विठ्ठल उमाप हा युवा शेतकरी आहे. घरची पारंपरिक पाच एकर शेती होती. वाबळेवाडी येथील शिक्षक दत्तात्रेय वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिहाऊस उत्पादक गटाशी विठ्ठल यांचा संपर्क आला. त्यातून रंगीत ढोबळी मिरची लागवडीविषयी प्रेरणा मिळाली. कृषी विभाग, नाबार्ड योजना व भारतीय स्टेट बॅंकेचे १५ लाख रुपये कर्ज या आधारे २००३ मध्ये १० गुंठ्यात पॉलिहाऊस उभारले. सन २००३ ते २०१७ पर्यंत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतल्यानंतर २० गुंठ्याचे आणखी एक पॉलिहाऊस वाढवले. यात १० गुंठ्यात गुलाब आणि १० गुंठ्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. कोरोना टाळेबंदीचा फटका सन २०२० मध्ये कोरोना टाळेबंदीचा सर्वाधिक फटका फूल उत्पादकांना बसला. मंदिरे, लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांबरोबरच बाजारपेठा बंद होत्या. फुलांची मागणी ठप्प झाली. प्रक्रियाही करता येत नसल्याने फुलांचे करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला. झाडांची निगा राखणेही मुश्कील होऊ लागले. अखेर संपूर्ण पीक काढून टाकावे लागले. पण विठ्ठल यांनी पुन्हा हिंम्मत एकवटली. मागील अनुभवातून त्यांनी मे २०२१ मध्ये पुन्हा रंगीत ढोबळी मिरची लागवडीचे धाडस केले. रंगीत ढोबळी मिरचीची शेती आज विठ्ठल यांनी प्रत्येकी १० गुंठे क्षेत्राची चार पॉलीहाऊसेस उभारली आहेत. त्यात पिवळ्या व लाल ढोबळीचे उत्पादन घेतले जाते. दर वर्षाला १५ मेच्या दरम्यान नवी लागवड केली जाते. १० गुंठ्यात सुमारे तीनहजार रोपे बसतात. तेवढ्या क्षेत्रात सुमारे १० ते १२ टन उत्पादन मिळते. बाजारपेठेतील मागणीनुसार काढणीचे नियोजन सरासरी चार दिवसांच्या अंतराने होते. एका वेळेच्या काढणीस साधारण ८०० किलो, एक टन ते दीड टनांपर्यंत उत्पादन मिळते. रोपांची किंमत जास्त असल्याने (प्रति रोप १० रुपये) तसेच विद्राव्य खते दररोज दिली जात असल्याने उत्पादन खर्च वाढतो. विक्री व्यवस्थापन गेल्या ७ ते ८ वर्षांत विक्री पुणे आणि मुंबई बाजार समितीमध्ये व्हायची. आता पुणे, मुंबई आणि नाशिक येथील व्यापाऱ्यांच्या ओळखी झाल्या आहेत. त्यातून थेट मागणी नोंदविली जाते. आगाऊ पैसे आल्यानंतर मग मिरची पाठविली जाते. अलीकडील वर्षांच्या अनुभवानुसार मिरचीस प्रति किलो दर किमान ७० रुपये, मध्यम दर १२५ रुपये तर पुणे मार्केटला कमाल दर यंदा ३२० रुपये मिळाला आहे. अर्थात असे दर कमी काळासाठीच असतात. त्याबाबत विठ्ठल म्हणतात की कोरोना संकटात गेल्या दोन वर्षांत अनेक शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ढोबळीची लागवड कमी केली. आवक कमी झाल्याने दर चांगले मिळाले. कोरोना काळात हे दर किलोला ४० रुपये एवढे खालीही आले होते. पॉलीहाऊससेच्या उभारणीसाठी सुमारे ४० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. मात्र सातत्यपूर्ण उत्पादन घेत राहिल्याने आता कर्जाची परतफेड होऊन नफ्याचेही प्रमाण वाढल्याचे विठ्ठल यांनी सांगितले. मे २०२१ मधील एकूण लागवडीतून ३० टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. चेरी टोमॅटो आणि पार्सली ढोबळी मिरची सोबत बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून चेरी टोमॅटो आणि पार्सली या परदेशी भाज्यांचीही मागणी होऊ लागली. ती पर्ण करण्यासाठी विठ्ठल यांनी यंदा २० गुंठ्यावर चेरी टोमॅटो आणि पार्सलीची १० गुंठ्यात खुल्या शेतात लागवड केली आहे. दोन टनांपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळाले आहे. तर प्रति किलो ६० ते ८० रुपये दर मिळत आहे. त्यातून सुमारे ५० हजारांपुढे उत्पन्न मिळत आहे. पार्सलीचा उपयोग भाजीव्यतिरिक्त फुलांच्या बुकेमध्येही होत असल्याने मागणी मिळत असल्याचे विठ्ठल यांनी सांगितले. त्यास प्रति जुडी पाच रुपयांपासून ते १०, १५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. या दोन्ही पिकांव्यतिरिक्त ३० गुंठे क्षेत्रात पेरू, एक एकर ऊस व अर्धा एकर लांब मिरची अशीही पिके घेतली आहेत. त्यातूनही पूरक उत्पन्नाची जोड तयार झाली आहे. संपूर्ण कुटुंबाचे खंबीर पाठबळ विठ्ठल स्वतः शेतीची धुरा सांभाळत असले तरी कुटुंबीयांची त्यांना भक्कम साथ आहे. वडील शिवाजी, आई कमल, पत्नी पूजा, भाऊ नवनाथ, वहिनी मनिषा, पुतणे ओंकार आणि सनी हे देखील शेतीच्या विविध कामांमध्ये आपले योगदान देतात. त्यातून मजुरीवरील अवलंबित्व व खर्च कमी झाला असून कष्ट देखील सुकर झाले आहेत. शिवाय कुटुंबीयांच्या पाठबळावरच विविध प्रयोग यशस्वी करू शकल्याचे विठ्ठल अभिमानाने सांगतात. संपर्क- विठ्ठल उमाप- ९६०४४१५६५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com