लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य व सौदर्यप्रसाधनेही

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी या उच्चशिक्षित महिलेने लाकडी तेलघाणीच्या साह्याने विविध प्रकारच्या तेलांची निर्मिती केली आहे. गुणवत्तेशी तडजोड न करताउत्पादित होणाऱ्या तेलाला अल्पावधीतच त्यांनी ग्राहकांची पसंती मिळवली आहे.
लाकडी तेलघाण्यासह कांचन चौधरी.
लाकडी तेलघाण्यासह कांचन चौधरी.

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी या उच्चशिक्षित महिलेने लाकडी तेलघाणीच्या साह्याने विविध प्रकारच्या तेलांची निर्मिती केली आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता उत्पादित होणाऱ्या तेलाला अल्पावधीतच त्यांनी ग्राहकांची पसंती मिळवली आहे. एक पाऊल पुढे जाऊन सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थांच्या माध्यमातून आर्थिक उलाढालही वाढवण्यास सुरुवात केली आहे. संघर्षातून घडलेल्या यशकथा वाचायला सर्वांनाच आवडतात. मात्र तसा संघर्ष करण्यास सहजासहजी कोणी तयार नसतं. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी यांनी मात्र हा मार्ग निवडला व त्यात निर्धाराने वाटचाल केली. ‘बीएसस्सी- ॲग्री’ व ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ (एमबीए) या पदव्या प्राप्त केल्या. त्या जोरावर खरं तर मोठ्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण कुटुंबीयांना विश्‍वासात घेऊन उद्योजक होऊन स्वतः पायावर उभे राहण्याचा निर्धार केला. अर्थात, सुरुवात नक्की कुठून करायची हे निश्‍चित नव्हते. एकदा पुणे शहरात बहिणीकडे गेल्या असताना लाकडी घाण्यावरील तेल पाहण्यात आले. त्यातून हाच उद्योग ‘क्लिक’ झाला. उद्योगाची जुळवाजुळव लाकडी तेलघाणा उद्योगातील उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेबाबत काहीच माहिती नसल्याने त्याबाबत ‘होमवर्क’ सुरू केले. स्वतः काही घडवायचे तर तेवढे कष्ट करण्याचीही तयारी ठेवली. आवश्‍यक साधनांची जुळवाजुळव सुरू केली. भांडवल बँकेच्या माध्यमातून उभे केले. अकोट हे मध्यम लोकसंख्येचे शहर आहे. अशा शहरात बाजारपेठेत ब्रॅंड असलेल्या तेलांच्या तुलनेत काहीसे महागडे वाटणारे हे तेलघाणीचे तेल ग्राहकांच्या पसंतीस किती उतरेल याबाबत काही अंदाज नव्हता. या सर्व प्रक्रियेत कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे ठरल्याचे कांचन सांगतात. घरीच थाटला उद्योग कांचन यांच्या वडिलांचे अकोटमध्ये घर आहे. याच घरातील १५ बाय १५ फूट आकाराच्या खोलीत तेलघाणी बसवली. बदाम तेल बनविण्यासाठी स्वतंत्र छोटे यंत्र घेतले आहे. ज्यांना तेल काढण्याची पद्धती, दर्जा पाहण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही प्रक्रिया खुली, पारदर्शक ठेवली आहे. तेलघाणीच्या ठिकाणी स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहण्याजोगा आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला येथे वेगळा अनुभव मिळतो. तयार केली बाजारपेठ ‘रक्षा’ या ब्रँडनेमखाली उत्पादननिर्मिती सुरू केली. पहिल्या दिवसापासूनच गुणवत्तेत तडजोड न करण्याचे धोरण स्वीकारले. हे पथ्य पाळल्यानेच आज उत्पादित तेल अकोट शहरातच नव्हे तर अन्यत्रही विकले जात आहे. अकोला, अमरावती, नागपूर, मुंबईसारख्या शहरांमधूनही नियमितपणे मागणी असते. शेंगदाणा, करडई, खोबरेल, तीळ, सूर्यफूल, मोहरी, जवस आदी तेले लाकडी घाण्यावर तयार केली जातात. त्यासाठी लागणारा कच्चा माल उच्चतम दर्जाचाच वापरतात. त्यावर दोन पैसे अधिक खर्च झालेत तरी मागे-पुढे पाहिले जात नाही. बॉटल्सचे पॅकिंगही आकर्षक केले आहे. लाकडी घाण्याचे तेल खाण्याचे किती व कसे फायदे होतात याची माहिती देणारे फलक, पत्रकेही या ठिकाणी ग्राहकांना दिली जातात. सुरुवातीला पाच ते दहा लिटर तेलाचाही खप होईल की नाही याची खात्री न वाटणाऱ्या कांचन यांचा हा व्यवसाय आता महिन्याला सरासरी १२०० लिटर विक्रीपर्यंत पोहोचला आहे. यातून मासिक सुमारे दोन ते अडीच लाखांवर उलाढाल होत असल्याचे त्या सांगतात. तेल आणि अन्य पदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र ‘आउटलेट’ही सुरू केले आहे. ग्राहकांना घरपोच सुविधाही देण्यात आली आहे. तेलघाणीवर कामासाठी तरुण तर ‘आउटलेट’च्या कामकाजासाठी तरुणी अशी रोजगारनिर्मितीही केली आहे. कांस्य थाळी मसाज लाकडी घाण्यावरील तेल घेणारा ग्राहक हा आरोग्याविषयी अधिक जागरूक समजला जातो. त्यामुळे येथे येणाऱ्यांसाठी आणखी एक सुविधा कांचन यांनी तयार केली. काश्‍याच्या थाळीने मसाज करण्यासाठी यंत्र बसविले. त्याच्या मदतीने पायांना विविध तेल, तुपाने मसाज करण्याची सुविधा मिळते. त्यातून वाताचे प्रमाण कमी होणे, शरीरात वाढलेली उष्णता कमी करणे, डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळणे असे फायदे होतात. तळव्यांना भेगा पडणे तसेच पायाची जळजळसारख्या समस्या कमी होतात. मसाजची सुविधा नाममात्र दरात मिळत असल्याने दररोज अनेक जण त्याचा लाभ घेतात. सौंदर्यप्रसाधने विविध तेलनिर्मितीनंतर सेंद्रिय गूळ, नाभी बॉल (नाभीवर ठेवण्यासाठी कापसाचा बोळा), शुद्ध सैंधव यांचीही विक्री सुरु केली आहे. सोबतच व्हिटॅमीन सी क्रीम, रोझ क्रीम, कॉफी क्रब, हेअर जेल, अंडर आय जेल, मॅजिक क्रीम, फेसिअल कीट, कलौंजी ऑइल, कढीपत्ता ऑइल, ऊबटन सोप, फेसियल बॉम्ब, एलोवेरा शाम्पू, हेअर डाय, बाथ सॉल्ट, ब्लॅक मेहंदी अशा विविध प्रकारांवर काम हाती घेतले आहे. उत्कृष्ट दर्जाच्या पॅकिंगमधून विक्री होते. उत्पादनासह ‘मार्केटिंग, ई-कॉमर्स, सोशल मीडियाद्वारे प्रचार, आर्थिक नियोजन अशी विविध कामे कांचन एकहाती लीलया सांभाळतात. पती अन्य शहरात नोकरीस असल्याने घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण- संगोपनाकडेही दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारीही घेतात. सर्वच आर्थिक स्तरावरील कुटुंबांपर्यंत घाणीवरील तेलाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी अकोटमध्ये तेल महोत्सव भरविण्याचे नियोजनही कांचन करीत आहेत. संपर्क- कांचन चौधरी, ७२१९४४७११०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com