काटों पे चलके मिलेंगे साये बहार के...

कडधे (जि. पुणे) येथील मोहोळ कुटुंबानेपाच एकर पॉलिहाउसमधील निर्यातक्षम गुलाबशेती फुलवत ठेवली. यंदाच्या व्हॅलेंटाइन डेसाठी देश-परदेशांतील बाजारपेठ साधली.
डावीकडून कृष्णा ठाकर, मोहोळ कुटुंबातील सचिन, वडील वाघू, आई सुभद्रा व सतीश लहानग्यांसह
डावीकडून कृष्णा ठाकर, मोहोळ कुटुंबातील सचिन, वडील वाघू, आई सुभद्रा व सतीश लहानग्यांसह

रुक जाना नहीं तू कहीं हार के काटों पे चलके मिलेंगे  साये बहार के ओ राही, ओ राही...

कोरोनाचे दीर्घ संकट, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, प्रतिकूल हवामान अशा एकापाठोपाठ चाल करून आलेल्या महाभयंकर संकटांनी कडधे (जि. पुणे) येथील मोहोळ कुटुंबाला पुरते घेरले. पण जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याच्या वरील ओळी या कुटुंबाने सार्थ ठरवल्या. असीम धैर्य, सैनिकाप्रमाणे लढण्याची क्षमता, प्रचंड आशावाद व उमेद यांचा प्रत्यय देत पाच एकर पॉलिहाउसमधील निर्यातक्षम गुलाबशेती फुलवत ठेवली. यंदाच्या व्हॅलेंटाइन डेसाठी देश-परदेशांतील बाजारपेठ साधली.

पुणे शहरापासून नजीक तळेगाव, वडगाव मावळ परिसरात पॉलिहाऊउसमधील गुलाबशेती मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. या भागातील फूल उत्पादक अभ्यासू व प्रयोगशील वृत्तीतून तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम गुलाब उत्पादन घेतात. दरवर्षी ‘व्हॅलेटांइन डे’साठी या भागातून मोठ्या प्रमाणात युरोपीय देशांना फुलांची निर्यात होते. मोहोळ कुटुंबाची ओळख पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावर पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर बाह्यवळण येते. तेथून काही अंतरावरच पवन मावळ भागातील कडधे गाव आहे. एका बाजूला पवना डॅम, दुसऱ्या बाजूस लोहगड, विसापूर प्रसिद्ध डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीतील वनराई अशी निसर्गाची मुक्त उधळण इथे पाहण्यास मिळते. याच गावातील वाघू मोहोळ यांनी मोठ्या कष्टाने पाषाण फोडून पॉलिहाउसमधील गुलाब शेतीचे नंदनवन इथे उभारले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पारंगत होत मुलगा सतीश पूर्णवेळ शेती पाहू लागले. लहान बंधू सचिन कृषी पदवीधर झाले. खत उद्योगातील कंपनीतील नोकरी सांभाळून आपल्या शेतीतील तांत्रिक जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. एकोप्यातून बघता बघता युरोपीय देशांत दरवर्षी निर्यात करून गुलाब शेतीतून समृद्धी तयार करण्यापर्यंत या कुटुंबाने भरारी मारली. ...आणि संकटांनी घेरले सन २०१८, २०१९ व अगदी मागील वर्षीच्या फेब्रुवारी २०२० पर्यंत व्हॅलेंटाइन डेसाठी मोहोळ कुटुंबाकडील गुलाबांची निर्यात व्यवस्थित सुरू होती. पुढे कोरोना विषाणूने जगासह भारताला घेरण्यास सुरुवात केली. मागील वर्षी २२ मार्चला केंद्र सरकारने देशात लॉकडाउन सुरू केला. तेथून मोहोळ यांच्या शेतीला एकेक संकटाने विळख्यात घेण्यास सुरुवात केली. लॉकडाउनमध्ये जिथे भाजीपाला, फळे व खाण्याच्या जिनसा घ्यायला सुद्धा लोक घराबाहेर पडायला धजावत नव्हते. तिथे फुलांचा विषयच संपलेला होता. वाहतूक बंद, व्यापारी थांबलेले. पण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला थांबून चालत नाही. शेतकऱ्याला थांबून चालतं काय? मोहोळ यांची २०१८ पर्यंत अडीच एकरांत पॉलिहाउसेस होती. मोठ्या उमेदीने त्यानंतर अजून अडीच एकरांत नवी पॉलिहाउसेस उभारली. पाच एकरांत आता दहा गुंठ्यांपासून ते ३८ गुंठ्यांपर्यंतची आठ नेटहाउसेस दिमाखात उभी होती. बंगळूरहून आणलेली महागडी, पेटेंटेड वाणाची व सहा वेगवेगळ्या रंगांची रोपे त्यात फुलत होती. एकीकडे पाच एकरांत दररोज १० हजार ते १२ हजार फुलांचे उत्पादन सुरू होते. तर दुसरीकडे फुलांची बाजारपेठ पूर्ण ठप्प झालेली. एकदा लागवड केल्यानंतर चार वर्षे त्यातून उत्पादन सुरू असते. मार्केट नाही म्हणून ते मध्येच थांबवता येत नाही. रोजच्या रोज विद्राव्य खते- पाणी (फर्टिगेशन), आंतरमशागत, कीडनाशक फवारण्या व अन्य व्यवस्थापन व त्यावरील मोठा खर्च सुरूच होता. मजुरांना सांभाळले सतीश सांगतात, की पाच एकरांसाठी आम्हाला कायमस्वरूपी ३० ते ३२ मजुरांची गरज भासते. लॉकडाउन काळात अन्यत्र ठिकाणचे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघून गेले. आम्ही मात्र घरच्यांप्रमाणे मजुरांना सांभाळले. मार्च- एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत त्यांना पूर्ण पगार दिला. त्यात जराही कपात केली नाही. पगारापोटी महिन्याला एकूण अडीच ते तीन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होता. उत्पन्न शून्य, खर्च अवाढव्य विजेचा खर्च होता. काही नवी पॉलिहाउसेस उभारल्याने बॅंकेचं कर्ज होतं. त्या अधिकाऱ्यांनी व्याजाच्या हप्त्यासाठी तगादे लावायला सुरुवात केली. एकूण हिशेब काढला तर महिन्याला संपूर्ण खर्च काही लाख रुपयांच्या घरात होता. उत्पन्न होतं शून्य रुपये. कष्टानं फुलवलेल्या रंगीबेरंगी, आकर्षक १० ते १२ हजार फुलांची दररोज विल्हेवाट लावायला मन धजावत नसे. दुसरा पर्यायच उरलेला नव्हता. सतीश सांगतात फेकून देण्याऐवजी फुलांचा वापर आमच्या भातशेतीत देखील केला. आजही व्यापाऱ्यांकडून आम्हाला दहा ते पंधरा लाख रुपयांचे येणे आहे. कोरोना काळात आमचीच विक्री झालेली नाही, असे व्यापारी आम्हाला उलट ऐकवायचे. नऊ महिने कसे काढले हे आमचे आम्हालाच माहिती आहे. आपली ही व्यथा सांगताना अश्रू आवरणं सतीश यांना जड जात होतं. चक्रीवादळाचा फटका यंदा निसर्ग चक्रीवादळानेही संयमाची कसोटी पाहिली. सतीश सांगतात, की दरवर्षी १५ मेनंतर पॉलिहाउसधारकांकडे नवी लागवड असते. पावसाळ्यापूर्वी अनेक जण डागडुजीही करून घेतात. नवे पॉलिथिन छत अंथरतात. आम्हीही ते केले. मात्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण पाच एकरांतील पॉलिहाउसचे अतोनात नुकसान झाले. वीस लाख रुपयांपर्यंत एकूण आर्थिक फटका बसला. हवामानानेही झुंजविले आता भिस्त होती यंदाच्या व्हॅलेंटाइन डे (१४ फेब्रुवारी)वर. नोव्हेंबरपासूनच छाटणीचं नियोजन सुरू होतं. त्यानंतर ५० ते ५२ दिवसांनी फुले सुरू होतात. पण दमट व उष्ण हवामानामुळे फुले दहा ते बारा दिवस आधीच म्हणजे ४० ते ४२ दिवसांत सुरू झाली. निर्यात २८ ते २९ जानेवारीच्या आसपास सुरू होते. पण फुले १५ तारखेलाच येऊ लागली. त्यांचे करायचे काय असा प्रश्‍न तयार झाला. यंदा लग्नसोहळे, राजकीय किंवा अन्य समारंभही कमी प्रमाणातच आहेत. त्यामुळे फुलांना उठाव नाही. सतीश सांगतात की दोन लाख फुलांच्या क्षमतेचे आमचे कोल्ड स्टोअरेज आहे. आजही ते भरलेले आहे. तेथे ८ ते १० दिवस फुले ठेवली जातात. त्यानंतर त्यांची विल्हेवाट लावावीच लागते. तरीही ‘व्हॅलेंटाइन’ साधला कितीही दुर्धर संकटे येऊद्या, संपेल तो शेतकरी कसला? प्रतिकूलतेतही यंदाचा व्हॅलेंटाइन डे साधायचाच असा ठाम निश्‍चय केलेला. सन २०१८ मध्ये मोहोळ यांनी एक लाख फुले निर्यात केली. सन २०१९ मध्ये दीड लाख ते दोन लाख फुलांचा टप्पा गाठला. यंदा तीन ते चार लाख फुलांचे उद्दिष्ट ठेवले. पण बऱ्याच फ्लाइट बंद किंवा कमी झालेल्या. युरोपीय देशांतील वातावरण अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. अशा स्थितीत ६० ते ७० हजार फूल निर्यातीपर्यंतची मजल मोहोळ यांनी मारली. परिस्थितीपुढे न झुकता प्रयत्नांची पूर्ण शर्थ करायची या मानसिकतेतून संकटातही यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला.   यंदाच्या निर्यातीवर दृष्टिक्षेप

 • सहा रंगांच्या गुलाबांचे उत्पादन
 • लाल
 • पिवळा
 • फिक्कट गुलाबी
 •  दोन रंगांत- गुलाबी शेडसहित पांढरट
 • शेंदरी देखणा रंग
 • पांढरा
 • दरवेळची निर्यात- नेदरलॅंड, लंडन, ऑस्ट्रेलिया आदी.
 • त्यासाठी दोन ते तीन व्यापारी कंपन्या.
 • यंदा निर्यातीसाठी मिळालेला दर- ५० सेंमी लांबीचे फूल- १२ रुपये
 • (दरवर्षीचा दर- १३ ते १५ रु.)
 • ४० सेंमीचे फूल- ७ रुपये. (दरवर्षीचा दर- ८ ते ९ रु.)
 • ६० सेंमी. फुलाला दरवर्षी १६ ते १७ रुपये दर. यंदा फक्त ५० सेंमी. लांबीचेच फूल घेतले. त्यामुळे ६० व ७० सेंमी लांबीचे फूल ५० सेंमीला कट करून द्यावे लागले.
 • स्थानिक बाजारपेठेतही प्रयत्न निर्यातीवर परिणाम झाला तरी मोहोळ यांनी चिकाटी, हिंमत व आशावाद सोडलेला नाही.सतीश म्हणाले, की महाविद्यालये, अनेक कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. रेल्वे वाहतूक सुरू नाही. तरीही देशांतर्गत मार्केटला फुले देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सध्या वाराणसी, सुरत, लखनौ, नागपूर, अहमदाबाद, पटणा, दिल्ली येथे दररोज पंधरा हजार या संख्येने फुले जात आहेत. त्यास प्रति फूल ५ ते ६ रुपये दर मिळत आहे. परिसरातील फूल उत्पादकांनी आता जय मल्हार फूल उत्पादक संघ स्थापवन केला आहे. सतीश अध्यक्ष तर कृष्णा ठाकर सचीव आहेत.   शासनाने दृष्टिकोन बदलावा मोहोळ सांगतात, की नुकसानीचे पंचनामे झाले. आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष भेटून गेले. पण अद्याप आर्थिक मदत काहीच झालेली नाही. येत्या मे- जूननंतर परिस्थितीत सुधारणा झाली तरी नफ्याचे गणित सुधारायला खूप विलंब लागणार आहे. फूल उत्पादक संघानेही पाठपुरावा केला आहे पॉलिहाउसधारक म्हणजे सधन शेतकरी, त्यांना नुकसानभरपाईची गरज नाही असाच शासनाचा दृष्टिकोन आहे. तो बदलायला हवा. तरच उमेद वाढेल राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॉलिहाउससाठीचे अनुदानही तीन वर्षांपासून बंद केले आहे. पवन मावळ भागातील उत्पादकांचे त्या अनुषंगाने २० ते २२ कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. आमचे सुमारे ५० लाखांपर्यंतचे अनुदान बाकी आहे. ते वेळेत मिळाले तर बॅंकेचे ओझे कमी होईल. डोक्यावरचं ओझं खांद्यावर येईल. त्यातून शेतीतील उमेद अजून वाढेल. नवी ऊर्जा मिळेल. एक एकर पॉलिहाउस उभारणी व अन्य खर्च ५५ ते ६० लाख रुपये आहे. त्यासाठी बॅंकेकडे जावेच लागते. सगळा विचार केल्यास सरकारने व्याजमाफीचाही विचार करायला हवा अशी भावना मोहोळ कुटुंबीय व्यक्त करतात. संपर्क- सचिन मोहोळ, ९८६०७१२७७९ सतीश मोहोळ, ९९२२९८७७९२

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com