भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची करार शेती

नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत या पाटील बंधूंनी भरीताच्या वांग्यासह कांद्याची करार यशस्वी केली आहे. सोबत केळी, कलिंगड व अन्य भाजीपाला पिके व थेट विक्रीया माध्यमातून त्यांनी अर्थकारण सक्षम केले आहे.
भरीताची दर्जेदार वांगी.
भरीताची दर्जेदार वांगी.

नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत या पाटील बंधूंनी भरीताच्या वांग्यासह कांद्याची करार यशस्वी केली आहे. सोबत केळी, कलिंगड व अन्य भाजीपाला पिके व थेट विक्री या माध्यमातून त्यांनी अर्थकारण सक्षम केले आहे.   जळगाव जिल्ह्यात नशिराबाद हे वाकी नदीकाठील गाव आहे. वाघूर नदीचाही काही शिवारास लाभ आहे. अलीकडे जलसंधारणाची कामे हाती घेतल्याने एका भागातील शिवारात जलसाठे मुबलक आहेत. गावातील लालचंद पाटील आपले चुलत बंधू यशवंत यांच्यासह सुमारे ५५ एकर शेती कसतात. तीन कूपनलिका, दोन विहिरी आहेत. दोन बैलजोड्या व अन्य पशुधनाच्या बळावर उपलब्ध होणाऱ्या शेण- मुत्राचा शेतीसाठी कार्यक्षम उपयोग ते करून घेतात. भरीताची वांगी, कांदा, व केळी ही त्यांची पारंपरिक पिके आहेत. शेतीतील सुधारणा अलीकडील १५ वर्षांत शेती व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. केळीच्या उतीसंवर्धित रोपांचा वापर होतो. ठिबक सिंचन तर आहेच. जमीन काळी कसदार असून केळीची लागवड मार्चमध्ये करण्याचे नियोजन असते. तीन वर्षांपासून कलिंगडाची लागवडही केली जात आहे. त्यासाठी पिंपळगाव खुर्द (ता..भुसावळ) येथील ज्ञानेश्वर राणे यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. अधूनमधून काशीफळ व अन्य भाजीपाला पिकांचे उत्पादनही घेण्यात येते. उसाची लागवड १० एकरांत दरवर्षी असते. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या रक्षणासाठी केळी, कांदा व अन्य भाजीपाला पिकांच्या क्षेत्राभोवती तारेचे मजबूत कुंपण तयार केले आहे. भरीताच्या वांग्यांमध्ये सातत्य भरीताच्या वांग्याचे उत्पादन १९८२ पासून घेण्यात येते. वडील प्रभाकर व काका वासुदेव यांनी या पिकाची सुरवात केली. त्या वेळेस प्रथमच आठ एकर क्षेत्र हंगामी बागायती होते. वांग्यासाठी घरच्याच पारंपरिक वाणांचा उपयोग होतो. दरवर्षी एक ते दीड एकर क्षेत्र असते. अलीकडे किडींची समस्या वाढल्याने फवारण्या, चिकट सापळे आदींचा वापर होतो. जूनमध्ये रोपवाटिका तयार केली जाते. रोपे ४० ते ४५ दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवड करतात. पीकवाढीसाठी चुलीतील राखेचाही उपयोग केला जातो. उत्पादन साधारणतः दिवाळीमध्ये सुरू होते. विक्री व्यवस्था आई पुष्पा पाटील, काकू मंगला पाटील या पूर्वी गावातील नियमीत बाजारात वांग्यांची विक्री करायच्या. भुसावळ, जळगाव, भादली येथील आठवडी बाजारातही पाटील यांची वांगी जायची. गावातील काही ग्राहकांनाही थेट पुरवठाही केला जातो. सध्या जळगावातील बाजारात व गावात विक्री होते. बियाणे मार्चमध्ये पक्व झालेल्या पिवळसर वांग्यातील बिया काढण्यात येतात. त्या व्यवस्थित स्वच्छ केल्या जातात. वाळवून चुलीतील राखेची प्रक्रिया केली जाते. स्वच्छ कापडात गुंडाळून त्या ठेवल्या जातात. पुढे जूनमध्ये रोपवाटिकेसाठी या बियांचा उपयोग केला जातो. कांद्याची करार शेती पूर्वी जेथे सिंचनाची सुविधा होती त्या भागात कांदा पीक घेतले जायचे. सुमारे २१ वर्षांपासून जळगावच्या प्रसिद्ध कंपनीसोबत कांद्याची करार शेती सुरू केली आहे. बियाणे व मार्गदर्शन कंपनीकडून मिळते. खरेदीचे दर निश्चित असून बाजारभावापेक्षा पाच टक्के अधिक मिळतात. खरेदीची हमी असते. फक्त काढणी केल्यानंतर कंपनीच्या जळगाव येथील प्रक्रिया केंद्रात कांदा पोचवावा लागतो. रेन पोर्ट (मिनी तुषार सिंचन प्रणाली) द्वारे सिंचन तर ‘बीबीएफ’ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने कांद्याची लागवड चार वर्षांपासून केली जात आहे. हलक्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरिपात लागवड करण्यावर भर असतो. जमीन सुपीकतेवर लक्ष केळी, कांदा, वांगी या पिकांसाठी चांगला बेवड असावा, जमीन सुपीक असावी असा विचार असतो. एकाच क्षेत्रात सतत केळी, ऊस, कांदा न घेता फेरपालटीवर भर असतो. जेथे केळी, ऊस घ्यायचा तेथे धैंचा या हिरवळीच्या खताची लावण होते. केळी, उसाच्या शेतात एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर होतो. अधिकाधिक शेणखत घरच्या पशुधनाच्या माध्यमातूनच उपलब्ध होते. काशीफळ, कलिंगड ही वेलवर्गीय पिके केळी व पपई या पिकांच्या बेवडसाठी लाभदायी ठरतात. केळीची प्रति रास सुमारे २२ किलोची मिळते. कांद्याचे एकरी सात टनांपर्यंत, कलिंगडाचे २० ते २५ टनांच्या आसपास तर वांग्याचे ४० ते ४५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. केळीला कमाल किलोला ११ रुपये, कांद्याला १० रुपयांपर्यंत तर वांग्याला २५ ते २८ रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. शेतीतील प्रगती शेतीचा व्याप अधिक असल्याने पाटील बंधू नोकरीच्या मागे लागले नाहीत. वडिलोपार्जित शेती सुरू असताना सात एकर शेतीही विकत घेतली. मोठे बंधू किशोर रेल्वेत नोकरीस आहेत. मात्र ते देखील सुट्टीत शेतात राबतात. आसोदा (ता..जळगाव) येथील किशोर चौधरी व शेतीच्या मार्गदर्शनासाठी वयाने लहान असलेल्या मंडळींशीदेखील पाटील बंधू सतत संवाद साधत असतात. आठवडी बाजारांमध्ये बैलगाडीवर भरीताची वांगी ठेऊन अनेक वर्षे विक्री केली. पीक संरक्षण, सिंचन यासाठी शेतात रात्रीचा मुक्कामही अनेकदा केला. प्रभाकर यांनी गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकपद भूषविले. त्यांच्या निधनानंतर लालचंद यांना हे पद मिळाले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविण्याची संधीही मिळाली. यादरम्यानही शेतीच्या अर्थकारणावर त्यांचे लक्ष राहिले. संपर्क- लालचंद पाटील- ९४२३७७३४७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com