जर्मनीची ऑफर नाकारून आणले आरोग्यदायी ‘फूड कल्चर’

कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथील उच्चशिक्षित प्रसाद पाटील यांनी जर्मनीतील नोकरीची ऑफर नाकारून बंधू प्रसन्नसह लाकडी घाण्यावर आधारित तेलनिर्मिती व सेंद्रिय पदार्थ व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहकांना आरोग्यदायी अन्न देण्यासाठी ‘फूड कल्चर’ संकल्पना राबवून त्यांचा विश्‍वास कमावत बाजारपेठही वाढवली आहे.
अकरा प्रकारच्या तेलांची निर्मिती व विक्री.
अकरा प्रकारच्या तेलांची निर्मिती व विक्री.

कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथील उच्चशिक्षित प्रसाद पाटील यांनी जर्मनीतील नोकरीची ऑफर नाकारून बंधू प्रसन्नसह लाकडी घाण्यावर आधारित तेलनिर्मिती व सेंद्रिय पदार्थ व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहकांना आरोग्यदायी अन्न देण्यासाठी ‘फूड कल्चर’ संकल्पना राबवून त्यांचा विश्‍वास कमावत बाजारपेठही वाढवली आहे.   कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी शहराला लागून असलेल्या कबनूर (ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले अशोक पाटील यांचे कुटुंब प्रसिद्ध आहे. त्यांची पाच एकर शेती आहे. यात ऊस व भाजीपाला आहे. अशोक यांचा मुलगा प्रसाद (वय ३१) यांनी एम.टेक. मेकॅनिकल (डिझाइन इंजिनिअरिंग) तर लहान बंधू प्रसन्न (वय २८) यांनी एमबीए पदवी घेतली आहे. प्रसाद यांना जर्मनी येथे नोकरीची संधी चालून आली. मात्र उद्योजक होण्याचे ध्येय, आपल्या भागातील शेतकऱ्यांचा फायदा, आरोग्यदायी अन्ननिर्मिती व ग्राहकांना त्याची उपलब्धता ही उद्दिष्टे समोर ठेवून त्यांनी परदेशातील संधी नाकारली. वडिलांनाही पाठिंबा दिला. प्रसन्ननेही नोकरीचा विचार न करता आपल्या कुटुंबाच्या या व्यवसायाला हातभार लावण्याचे ठरवले. व्यवसायाची सुरुवात दोघा बंधूंनी शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केली. सेंद्रिय धान्य व अन्य घटकांची खरेदी करून विक्रीही सुरू केली. कोल्हापूर शहराजवळील कणेरी मठात सेंद्रिय शेती प्रसाराचे कार्य चालते. मठाचे प्रमुख श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांची प्रेरणा घेतली. उच्चशिक्षित तरुण या क्षेत्रात उतरल्याने महाराजांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी भागातील चौथ्या गल्लीत श्री श्रीनिवासन ॲग्रो फूडस नावाने शॉपी सुरू केली. तेल उत्पादन शेंगदाणा तेलाचे ७५ टक्के उत्पादन तर सोबत करडई, सूर्यफूल, खोबरेल, मोहरी (काळी व पांढरी), तीळ, बदाम, जवस, अक्रोड, एरंडेल तेल आदी सुमारे ११ प्रकारचे तेल तयार केले जाते. स्थानिक भागातून पुरेशा शेंगदाण्याची उपलब्धता होत नसल्याने गुजरातहून प्रक्रियेस आवश्‍यक शेंगदाणे आणले जातात. अन्य तेलांसाठीचा कच्चा मालही शेतकरी वा बाजारपेठेतून घेतला जातो. शॉपीमध्येच लाकडी घाणा उभारला आहे. एक ते पाच लिटरपर्यंत पॅकिंग केले जाते. भुईमूग तेलाची २७५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. किटली घेऊन या, तेल घेऊन जा काही ग्राहक पॅकिंगमधील तेल घेत नाहीत. तर घरून किटली घेऊन येतात. त्यांच्या समोर तेल तयार करून दिले जाते. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होण्यास मदत होते. शिवाय पॅकिंगचा खर्च कमी होतो. त्यात अन्य घटकांचे मिश्रणही नसते. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे शेंगदाणे आहेत त्यांनाही तेल काढून देण्याचे काम केले जाते. दररोज सरासरी शंभर लिटर तेल घाण्यातून उपलब्ध होते. स्थापन केली शेतकरी कंपनी पाटील यांनी 'श्री श्रीनिवासन' नावाने शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. कोल्हापूर व बेळगाव पट्ट्यात मिळून त्याचे साडेपाचशे शेतकरी सभासद आहेत. यापैकी सुमारे ७० शेतकऱ्यांकडील सेंद्रिय माल खरेदी केला जातो. कबनूर येथे संकलन व प्रतवारी होऊन दर बुधवार व रविवारी तो शॉपीत उपलब्ध केला जातो. प्रसाद यांनी सुमारे बाराशे ग्राहकांचा ‘व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केला आहे. त्याद्वारे ‘ऑर्डर’ घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांकडून माल मागविला जातो. पंधरवड्याला पेमेंट केले जाते. या नेटवर्कमधील काही शेतकऱ्यांनी ‘पीजीएस’ प्रमाणपत्र घेतले आहे. तर काही अनेक काळापासून सेंद्रिय शेतीत कार्यरत आहेत. विश्‍वास कमावला शेतीमालाची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी)देखील दिली जाते. लॉकडाउनच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर उपाय शोधून, संकटांवर मात करून भाजीपाला विक्री नियमित सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर शेतकऱ्यांकडून ४० रुपयांना घेतलेल्या मालाची ६० रुपयांनी विक्री होत असेल तर तसे स्पष्ट केले जाते. थोडक्यात, काय तर शेतकरी व ग्राहक अशा या दोघांमध्येही खरेदी-विक्रीची पारदर्शकता ठेवली आहे. त्यामुळे दोघांचाही विश्‍वास कमावल्याचे समाधान मोठे असल्याचे प्रसाद सांगतात. शिवाय ४० रुपये ही शेतकऱ्यांसाठी हमीभाव असतो. बाजारपेठेत २० रुपये दर असला तरी आमचा हमीभाव निश्‍चित केलेला असतो असे प्रसाद सांगतात. शॉपीत उपलब्ध अन्य उत्पादने

  • सेंद्रिय गूळ व पावडर, युनिक ब्रॅंडने काकवी, रसायनविरहित साखर, सैंधव, देशी गायीचे तूप,
  • मध, ड्रायफ्रूट्स, सेलम हळद, लोणचे.
  • कबनूर येथील गृहिणींकडून लोणची, पापड, चटण्या तयार करून त्यांचीही विक्री होते.
  • काही पदार्थ जपानसारख्या देशातही पाठवण्यात आले आहेत.
  • फूड कल्चर जोपासले प्रसाद सांगतात, की सेंद्रिय व आरोग्यदायी पदार्थांच्या व्यवसायातून ‘फूड कल्चर’ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सकस अन्नाचे सेवन केल्यास आपले विचार, मनही तसेच होते. आणि तोच आमचा मुख्य ‘फोकस’ आहे. उत्पादनांच्या किमतीपेक्षा त्याचे शरीरासाठी असलेले महत्त्व आम्ही ग्राहकांना पटवून देत आहोत. रोटरी, स्वयंसिद्धा बचत गट आदींच्या व्यासपीठाद्वारे सकस अन्नाबाबत लेक्चर देऊन ग्राहकांत जागृती करीत आहोत. शास्त्रज्ञांसोबत बोलणी सुरू आहेत असेही प्रसाद यांनी सांगितले. संपर्क-  प्रसाद पाटील, ९८२२४७१०३८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com