-सुभद्रा ब्रॅंडची दर्जेदार हळद.
-सुभद्रा ब्रॅंडची दर्जेदार हळद.

आजीच्या प्रेरणेतून सुभद्रा ब्रॅण्ड सेंद्रिय हळदनिर्मिती

घोसपुरी (ता. जि. नगर) येथील प्रवीण झरेकर यांनी आजीने सुरू केलेल्या हळदीच्या शेतीचा वारसा पुढे सुरू ठेवत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आजीच्याच नावाने म्हणजे सुभद्रा ब्रॅंडने हळद पावडरीची निर्मिती करून अल्पावधीत सुमारे दीड हजाराहून अधिक ग्राहकांची बाजारपेठही त्यांनी मिळवली आहे.

घोसपुरी (ता. जि. नगर) येथील प्रवीण झरेकर यांनी आजीने सुरू केलेल्या हळदीच्या शेतीचा वारसा पुढे सुरू ठेवत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आजीच्याच नावाने म्हणजे सुभद्रा ब्रॅंडने हळद पावडरीची निर्मिती करून अल्पावधीत सुमारे दीड हजाराहून अधिक ग्राहकांची बाजारपेठही त्यांनी मिळवली आहे.   नगर जिल्ह्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. या भागांमध्ये पारंपरिक आणि फळपिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. नगर तालुक्यातील घोसपुरी येथेल झरेकर कुटुंब राहते. जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कुटुंबातील बाबासाहेब यांना संजय आणि राजेंद्र ही दोन मुले आहेत. राजेंद्र शिक्षक असून संजय पूर्णवेळ शेती करतात. त्यांचा मुलगा प्रवीण कृषी पदवीधर झाला असून, त्यानेही पूर्णवेळ शेतीलाच प्राधान्य दिले आहे. कुटुंबाची एकत्रित ४० एकर जमीन असून ऊस, डाळिंब, कांदा, गहू आदी पिके घेतात. कायम दुष्काळी संघर्ष असलेल्या या भागात प्रवीण यांनी हळदीचे पीक रुजवले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात (राहुरी) येथे फळप्रक्रियेचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. आजीची प्रेरणा सुभद्राबाई व बाबासाहेब (प्रवीण यांचे आजी-आजोबा) दहा वर्षांपूर्वी पर्यटनाला गेले असता हळदीचे गावरान बेणे घेऊन आले. तेव्हापासून अर्धा ते एक गुंठ्यात घराशेजारी त्याचे उत्पादन घेत.केवळ शेणखतावरच हे पीक चांगले यायचे. प्रवीण यांनी ही बाब हेरली. आजीची प्रेरणा घेत हळदीची व्यावसायिक शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या हळदीपासूनच बेणे तयार करून तीन वर्षांपूर्वी अर्ध्या एकरात लागवड केली. पावडर निर्मिती हळदीची पावडर तयार करून अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देश ने दळणयंत्र व पॅकिंग यंत्र खरेदी केले. ‘सोशल मीडिया’ची मदत घेत ग्राहक तयार केले. जवळपास सर्व हळद विकली गेली. पुढील वर्षी एक एकर तर तिसऱ्या वर्षी (यंदा) दोन एकरांत हळद घेतली. एकरी २० ते २३ क्विंटल उत्पादन निघते. प्रति किलो हळकुंडापासून सुमारे ९०० ग्रॅम तर एकूण २० क्विंटलपर्यंत पावडर होते. संपूर्ण शेतीत वडील, काका यांच्यासह आई अलका, काकू विजया, बहीण प्रतीक्षा, प्रियांका यांचीही मोठी मदत मिळते. हळद विक्रीचे प्रयत्न प्रवीण यांनी स्वतः ग्राहक शोध सुरू केला. सेंद्रिय पावडर तसेच दर्जा आणि विश्‍वासार्हतेने ग्राहकांत भर पडत गेली. एकमेकांच्या मदतीने व मौखिक प्रसिद्धीतून मागणी वाढू लागली. रायगड जिल्ह्यातील तत्कालीन कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून राज्यभर शेतकऱ्यांचे जाळे निर्माण करून त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकही त्यात जोडले आहेत. प्रवीण यांची एक वर्षापूर्वी नगर येथे कार्यक्रमात चौधरी यांच्यासोबत भेट झाली. त्यानंतर तेही या ‘नेटवर्क’मध्ये जोडले गेले. सुमारे दोन हजारांपर्यंत जोडले ग्राहक आतापर्यंत दीड हजार ते दोन हजारांपर्यंत ग्राहक जोडल्याचे प्रवीण सांगतात. सध्या २५० रुपये प्रति किलो दराने मुंबई, पुणे, नगरसह सेंद्रिय हळद पावडरीची विक्री होत आहे. कुरिअर वा अन्य सुविधेतून पुरवठा होतो. घोसपुरी परिसरातील बहुसंख्य ग्राहकही थेट घरून खरेदी करतात. हळदीच्या शेतीत आजीची प्रेरणा मिळाल्याने तिच्याच नावाचा म्हणजे ‘सुभद्रा’ ब्रॅण्ड विकसित केला आहे. आता आवळा कॅण्डी, मिरची पावडर, धना पावडर यांचीही मागणी होत असल्याने त्यांचीही विक्री करण्याचा मानस आहे. त्यासाठी मिरचीची लागवड करण्याचा विचार आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन (ठळक बाबी)

  • प्रवीण यांनी हळदीची शेती पूर्णपणे सेंद्रिय केली आहे. ते सांगतात की आजीने आणलेले वाण सेलम किंवा गावरान असावे.
  • मार्च- एप्रिलमध्ये शेत तयार केले जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यात एकरी ८ ते ९ ट्रॉली शेणखत, शंभर किलो निंबोळी पेंड यांचा एकत्रित वापर. गादीवाफे व ठिबक पद्धत. शेणखतासाठी घरची आठ जनावरे. .
  • लागवडीच्या पंधरा दिवसांनी ते हळद निघेपर्यंत सात महिन्यांपर्यंत दर पंधरा दिवसांनी
  • जिवामृत स्लरीचा एकरी दोनशे लिटर प्रमाणे वापर. बेसनपीठ, गूळ, शेण- गोमूत्र, वडाखालील माती आदींचा त्यात समावेश.
  • लागवडीनंतर दोन महिन्यांनी प्रति एकरी २० गोण्या (प्रति गोणी ४० किलो)
  • साडेसात ते आठ क्विंटल कोंबडी खताची मात्रा.
  • नऊ महिन्यांनंतर काढणी करून कंद उकडून घेतात. पंधरा दिवस वाळवणी करून हळकुंडाला पॉलिश व मागणीनुसार पावडर निर्मिती.
  • एकरी उत्पादन खर्च ४० ते ५० हजार रुपये होतो.
  • आजीने लागवड केलेल्या हळदीपासूनच बेणेनिर्मिती. एकरी सात ते आठ क्विंटल बेणे लागते. फेब्रुवारी-मार्चमध्ये काढणी केल्यानंतर निवडक कंद काढून जमिनीत एके ठिकाणी गाडून ठेवण्यात येतात.
  • दुष्काळाचा फटका झरेकर कुटुंबाने सहा वर्षे दुग्ध व्यवसायही केला. सुमारे ५५ गायी व पाचशे लिटरपेक्षा अधिक दूध संकलन व्हायचे. मात्र २०१५ मध्ये दुष्काळाचा मोठा फटका बसला. पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाचे पडलेले दर यात आर्थिक ताळमेळ न बसल्याने व्यवसाय बंद करावा लागला. मात्र खचून न जाता कुटुंबाने अन्य पिकांसह हळद व त्याचे मूल्यवर्धन करून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे.   संपर्क-  प्रवीण झरेकर, ७२७६६४६२६३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com