युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन फार्मिंग मॉडेल

शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील तंत्रज्ञान वापर, ‘पिकेल ते विकेल’संकल्पनेवर आधारित व्यावसायिक पीक पद्धती, सेंद्रिय- रासायनिक पद्धतीचा सुरेख मेळ घालून संपूर्ण ‘रेसीड्यू फ्री’ उत्पादन. अशी विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेली निघोज (जि. नगर) येथील युवा शेतकरी राहुल यांची काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) आवर्जून अनुभवावी अशीच आहे. या शेतीचे निवडक अध्या
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन फार्मिंग मॉडेल
क्रिमसन रेड वाणाची दर्जेदार दाक्षबाग व निर्यातक्षम डाळिंब बाग.

शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील तंत्रज्ञान वापर, ‘पिकेल ते विकेल’ संकल्पनेवर आधारित व्यावसायिक पीक पद्धती, सेंद्रिय- रासायनिक पद्धतीचा सुरेख मेळ घालून संपूर्ण ‘रेसीड्यू फ्री’ उत्पादन. अशी विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेली निघोज (जि. नगर) येथील युवा शेतकरी राहुल यांची काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) आवर्जून अनुभवावी अशीच आहे. या शेतीचे निवडक अध्याय आजपासून दररोज मालिका स्वरूपात देत आहोत. .......................................................  भाग १ ............................................................. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाचे असमाधानकारक दर, मजूरटंचाई, महागड्या निविष्ठा, वाढलेला उत्पादन खर्च, कुटुंब पोसताना रोजचा संघर्ष, आलेली हतबलता अशा अनेक संकटांमधून शेतकरी जातो आहे. अशावेळी दीपस्तंभाप्रमाणे ठाम उभे राहून कर्तृत्वातून शेतीत उत्साह व प्रेरणारूपी प्रकाशमान वाटा तयार करणारे युवकही निश्‍चित अवतीभोवती आहेत. ‘प्रिसिजन फार्मिंग’चा आदर्श नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निघोज येथील राहुल अमृता रसाळ या केवळ २९ वर्षे वयाच्या युवकाची कीर्ती आज राज्याच्या सीमेबाहेर पोहोचली आहे. शेतीतील नवे प्रयोग, तंत्रज्ञान पाहण्यासाठी आपण इस्राईल, नेदरलॅंड आदी विविध देशांचे दौरे करतो. पण प्रिसिजन फार्मिंग’ (काटेकोर शेती) शेती व्यवस्थापनाचा अनुभव आपल्याला राहुलच्याच शेतीत घेता येतो. साधी राहणी, मध्यम उंची व शरीरयष्टी, स्वभावात विनम्रपणा आणि शेतीचा रोजचा व्याप सांभाळून विद्यार्थ्यांप्रमाणे सातत्याने सुरू असलेला शेतीतला अभ्यास असं या युवकाचं व्यक्तिमत्त्व आहे. वीस एकर वडिलोपार्जित शेतीचा विस्तार होऊन सुमारे ६५ एकर शेती राहुल कसतो आहे. त्यात सुमारे २० एकर द्राक्षे, त्यात करटुल्याचे आंतरपीक, १५ एकर डाळिंब, सहा- सात एकर टोमॅटो, तीन- चार एकर कारले व उर्वरित असा १० एकर भाजीपाला अशी प्रमुख पीक पद्धती आहे. ‘पिकेल ते विकेल’ व ‘आवक नसेल त्या वेळी बाजारात आणेल’ या संकल्पनांचा वापर करून त्याने शेती व्यावसायिक वा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. इयत्ता नववीत असल्यापासून मातीत उतरलेल्या राहुलचा आज शेतीत १६ वर्षांचा भक्कम अनुभव तयार झाला आहे. नाशिक येथील मुक्त विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने त्याने ‘हॉर्टिकल्चर’ पदवी नुकतीच घेतली आहे. वडिलांचा बांधकाम व्यवसाय आहे. लहान भाऊ सागर ‘बीई सिव्हिल आहे. आई संजीवनी, पत्नी स्वाती व छोटा चिरंजीव सिद्धार्थ असे राहुलचे कुटुंब आहे. जग फिरलेला माणूस जग फिरल्याशिवाय अन्य देश कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत याचे भान येत नाही. राहुलने २०१२-१३ च्या दरम्यान (वयाच्या १६ व्या ते १७ व्या वर्षीच) इस्राईलचा दौरा केला. तेथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शने पाहिली. जगातील नवे प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आपले स्पर्धात्मक देश कोणते, त्या दृष्टीने कोणती स्पर्धात्मक पीक पद्धती आपल्या राबवू शकतो हे ज्ञान त्यातून राहुलला मिळालं. ब्राझील, चिली, पेरू, स्पेन, जॉर्डन, नेदरलॅंड, थायलंड आदी देशांना त्यानं भेट दिली. त्यातून आपल्या शेतीत गरजेनुरूप विज्ञान व तंत्रज्ञान वापरलं. शेतकरीच नव्हेत तर शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, कृषी विभाग, उद्योजक आदी सर्वांनी भेट देऊन अनुभवावी अशीच राहुलची शेती आहे. कृषी विभाग-आत्माच्या वतीने शेतकऱ्यांच्या सहली येथे सुरू असतात. आठवड्याला ३० ते ४० या संख्येने इथले प्रयोग शेतकरी याची देही याची डोळा अनुभवतात. शास्त्रीय भाषेत बोलणारा शेतकरी राहुलने शेती विज्ञानाचा पाया बळकट केला आहे. शास्त्रीय संकल्पना, तत्त्वे ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्याप्रमाणे अभ्यासली आहेत. काल पाऊस भरपूर पडला, आमच्या जमिनीत पीएच जास्त आहे असे मोघम तो कधीच बोलत नाही. दोन दिवसांत २० मिलिमीटर पाऊस पडला. आमच्या पाण्याचा टीडीएस २००० आहे. मातीचा पीएच साडेसात आहे अशा शास्त्रीय, किंबहुना शास्त्रीय युनिट्‌समध्येच तो बोलतो. डॉक्टर स्टेथास्कोपद्वारे रुग्णाची नाडी तपासून मग रक्त, लघवी, एक्स रे आदी चाचण्या करण्यास सांगतात. वैद्यकीय अहवालाद्वारे निदान निश्‍चित करून उपचारांची दिशा ठरवतात. राहुल हेच काम शेतीत करतो. त्याने विविध उपकरणे ताफ्यात सज्ज ठेवली आहेत. त्याद्वारे प्रत्येक गोष्ट शास्त्रीय पातळीवर मोजूनच नियोजन होते. एखाद्या सैनिकाची उपमाही त्यास देता येईल. समस्यारूपी शत्रुला शेताच्या सीमेवरच रोखण्यासाठी विविध आयुधे त्याने आपल्या शस्त्रागारात तैनात केली आहेत. पीकपद्धती निवडताना बाजारपेठ एवढाच विचार सीमित न ठेवता तिथेही विज्ञानाचा आधार घेतला आहे. राहुलच्या शेतीची ठळक वैशिष्ट्ये

 • शेतीतील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र समजून घेऊन त्यानुसार व्यवस्थापन
 • सेंद्रिय स्लरीनिर्मिती प्रकल्प. रासायनिक व सेंद्रिय अशा दोन्ही पध्दतीचा संतुलित मेळ घालून संपूर्ण ६० एकरांत ‘‘रेसीड्यू फ्री’ उत्पादन. ग्लोबलगॅप प्रमाणीकरण, ग्रेपनेट, अनारनेट नोंदणीकरण.
 • स्वतःची प्रयोगशाळा उभारून ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचे उत्पादन.
 • प्रत्येक शेतीमालाचा दर्जा निर्यातक्षम. फळांचा रंग, चकाकी, स्वाद, आकार ए ग्रेड.
 • केवळ एकरी पीक उत्पादनवाढीकडे लक्ष नाही. मातीची सुपीकता वा सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही चांगले जपले.
 • शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन.
 • संपर्क- राहुल रसाळ, ९७६६५५०६२४

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com