तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही हुकमी कारले

तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या बागा काढून टाकाव्या लागल्या. राहुल रसाळ यांनी मात्र आपल्या १५ एकरांत भगवा डाळिंब बागेत निर्यातक्षम उत्पादनाचा आदर्श तयार केला आहे.
Stainless, saffron, attractive colored, shiny exportable pomegranate. Same size
Stainless, saffron, attractive colored, shiny exportable pomegranate. Same size

तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या बागा काढून टाकाव्या लागल्या. राहुल रसाळ यांनी मात्र आपल्या १५ एकरांत भगवा डाळिंब बागेत निर्यातक्षम उत्पादनाचा आदर्श तयार केला आहे. पूर्ण बाग ‘रेसिड्यू फ्री’ तत्त्वावर आणि ‘अनारनेट’ नोंदणीकृत आहे. उत्कृष्ट कॅनॉपी व निरोगी बागेत एकसारख्या आकाराची, आकर्षक भगव्या रंगाची, अनोखी चमकदार, डागविरहित लगडलेली फळे दिसतात. टिकवणक्षमताही चांगली आहे. सन २०१६ मध्ये लागवड असलेल्या बागेत तिसऱ्या वर्षापासून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. ...असे रोखले तेलकट डाग रोगाला राहुल सांगतात, की डाळिंब हे उष्णकटीबंधीय फळ आहे. पाणी जास्त झाल्यास नत्र जास्त होतो आणि तेलकट डाग रोग वाढतो. माझ्या बागेत एकूण चार हजार झाडांमध्ये ३५ ते ४० झाडांमध्येच कुठेतरी त्याची लक्षणे दिसू शकतील. रोगाचे बहुतांश नियंत्रण पाणी, अन्नद्रव्ये व नत्र-कर्ब गुणोत्तर जोपासण्यातून केले आहे. डबल लॅटरल व प्रति ४० सेंटिमीटरला १.६ लिटरचे डिस्चार्ज असलेले ड्रीपर आहेत. ८ ते ९ दिवसांतून फक्त २० ते २५ मिनिटे पाणी देतो. ‘डेल्टा टी तंत्रा’द्वारे रात्री १० वाजता फवारणी सुरू होऊन ती मध्यरात्रीपर्यंत चालते. तज्ज्ञांचे विवेचन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृद्शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी राहुल यांच्या शेतीला भेट दिली आहे. ते म्हणाले, की मातीचा प्रकार, पाण्याची गुणवत्ता व हवामान यांचा अभ्यास करून राहुल यांनी शेती जोपासली आहे. जमिनीसाठी कर्ब व नत्र गुणोत्तर तर वनस्पतीसाठी कार्बोहायड्रेटस व नत्र यांचे गुणोत्तर महत्त्वाचे असते. बहरासाठी कृत्रीम रसायने न वापरता नैसर्गिक ताण व्यवस्थित दिला, तर बहर व्यवस्थापन चांगले करता येते असेच राहुल यांच्या नियोजनातून दिसते. राहुल यांच्या व्यवस्थापनातील बाबी

 • उशिरा आंबिया बहर. १५ ऑगस्टनंतर (श्रावण) काढणी सुरू झाली पाहिजे असे नियोजन.
 • लागवड उत्तर-दक्षिण. अंतर १४ बाय १० फूट.
 • पूर्व- पश्‍चिम लागवड करायची झाल्यास चौकोनी अंतर हवे. तेथे १४ बाय १४ किंवा १५ बाय १५ फूट अशीही लागवड करता येते. झाडाच्या दोन्ही बाजूंना सूर्यप्रकाश भरपूर मिळायला हवा.
 • राहुल सांगतात, की नत्र हा पाणी, खते, टॉनिक याद्वारे झाडाला जाऊ शकतो. तीन दिवस पाऊस चालला, तर हवेतील सुमारे ७८ टक्के असलेला नत्र पाण्याच्या स्वरूपात झाडाजवळ येऊन थांबतो. अशावेळी ०-५२-३४ वा ०-०-५० चे ‘स्प्रे’ वरून घेतो. त्यामुळे फॉस्फरस व पोटॅशचे प्रमाण वाढते.
 • पाण्यातील नत्र जास्त झाल्यास सरकोस्पोरा, ॲथ्रॅकनोज, अल्टरनारिया आदी रोगही उद्‍भवू शकतात. म्हणूनच पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी ड्रीपमधून कोणतीही विद्राव्य खते न देता सर्व फवारणीद्वारे देतो. आर्द्रता वेळोवेळी तपासतो. बाहेरील आर्द्रता ३० ते ४० टक्के झाल्यानंतरच झाड मुळांतून खते घेण्यास सुरुवात करते.
 • उत्पादन, विक्री

 • ३०० ते ६०० ग्रॅमपर्यंत वजनाची फळे ६० ते ६५ टक्के प्रमाणात.
 • २० टक्के माल २०० ग्रॅमपेक्षा जास्त तर १० ते १५ टक्के माल हा १०० ग्रॅम वजनापुढील.
 • वन टाइम हार्वेस्टिंग’. मागे माल काहीच राहत नाही. ‘हार्वेस्टिंग’नंतर बाग विश्रांती काळासाठी सोडून दिली जाते.
 • एकरी आठ ते नऊ टन उत्पादन.
 • निर्यातक्षम मालाची इंग्लंड व नेदरलॅंडला निर्यातदारांमार्फत निर्यात. त्यास किलोला २४० ते ३०० रुपये दर.
 • उर्वरित ग्रेडचा माल मॉल, बांगला देश, कोलंबो व देशातील अन्य बाजारपेठांत जातो. तेथे ८०, ९० ते ११० रुपये सरासरी दर.
 • वर्षभर पैसा देणारे हुकमी कारले कारले हे राहुल यांचे हुकमी व बाराही महिने तीन- चार एकरांत घेतले जाणारे पीक आहे. कारल्याला श्रावण वा सप्टेंबर काळात सर्वाधिक व हमखास दर असतात. त्या वेळी प्लॉट सुरू होईल असे लागवडीचे नियोजन असते. हे पीक मोठ्या प्रमाणात फारसे कोणी करीत नाही. अनेक शेतकरी ते पावसाळ्यात घेऊ शकत नाहीत किंवा कांदा व भुसार पिकांसाठी क्षेत्र राखीव असते. हा फायदा आम्हाला मिळतो असे राहुल सांगतात. व्यवस्थापनातील ठळक बाबी

 • कारले असे पीक की बाराही महिने दर राहतात. वर्षभरात किलोला २५ ते ३० रुपयांच्या खाली दर शक्यतो जात नाहीत असा अनुभव.
 • दहा बाय तीन फुटांवर लागवड. एकरी सुमारे १४०० झाडे.
 • ट्रायकोडर्माचा ठिबकमधून वापर. त्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.
 • ताज्या जैविक घटकांचा वापर केल्याने कॉलर रॉट, फ्युजारीयम, अल्टरनारिया आदी रोगांपासून मुळांचे संरक्षण. त्यामुळे अन्नद्रव्यांचा ‘अपटेक’ही चांगला.
 • खोडांपाशी प्रति झाड एक लिटर या प्रमाणात आठवड्यातून एकदा सेंद्रिय स्लरी.
 • पॉली मल्चिंगचा वापर. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे सेंद्रिय स्लरीचा प्रत्येक मल्चिंग छिद्राजवळ (स्पॉट ॲप्लिकेशन) वापर. ट्रॅक्टरचालकासह दोन व्यक्तींची गरज. एकरी दोन तासांत हे काम होते.
 • या पिकात मॅग्नेशिअम नायट्रेटचा वापर जास्त. शिवाय १९-१९-१९, युरिया व सूक्ष्म अन्नद्रव्येही देण्यात येतात.
 • सल्फेट स्वरूपातील घटक ठिबकद्वारे. फॉस्फरस व पोटॅशचे प्रमाण तुलनेने कमी लागते. फॉस्फरसचे प्रमाण वाढले तर कारल्याची फुगवण वाढते असा अनुभव.
 • पांढरी माशी, अन्य रसशोषक, फळमाशी व विषाणूजन्य रोग या समस्या. दर अमावास्येला अंड्यातून पिलांची उत्पत्ती होते. त्यामुळे रात्री फवारण्या. किडींचे चांगले प्रभावी नियंत्रण.
 • फळमाशीसाठी मिथाईल युजेनॉल ट्रॅपचा वापर.
 • उत्पादन व उत्पन्न

 • प्रति झाड २५ किलो, तर एकरी २० ते २५ टन उत्पादन.
 • लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू. तिथून तीन महिने प्लॉट चालतो. त्यामुळे १५ ते २० दिवस मार्केट पडले तरी पुढे भरून निघते. जागेवरच मार्केट. (शिरूर व पुणे.)
 • एकरी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न.
 • अन्नद्रव्यांचे नियोजन

 • विद्राव्य खते देण्याआधी ‘ईसी मीटर, ‘पीएच टेस्टर’ ही उपकरणे मातीत खोचून रीडिंग.
 • मातीचा ईसी ०.४, मातीचे तापमान २४. ७ व पीएच ८.२ (जमिनीत २१ टक्के चुना असल्याने) असल्याचे आढळले.
 • ईसी १ ते १.५ च्या पुढे जाणार नाही असेच फर्टिगेशन. ईसी वाढल्यास जमिनीतील क्षारांचं प्रमाण वाढतं. जमिनीची सुपीकता घटते. वनस्पतीचा ‘रूट झोन' एक ईसीपर्यंतच अन्नद्रव्यांचे ‘अपटेक’ करतो.
 • मातीचा पीएचही साडेसहा ते सातच्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न.
 • उपकरणांच्या माध्यमातून खते, पाणी व मातीतील जिवाणूंची कार्यक्षमता टिकवण्याची दिशा मिळते.
 • खतांच्या वापरात व खर्चातही मोठी बचत. पूर्वी जिथे १० किलोपर्यंत खत वापर व्हायचा तेथे हे प्रमाण निम्म्यावर आले. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढली आहे.
 • तज्ज्ञांचे विवेचन डॉ. दुरगुडे सांगतात, की चुनखडीयुक्त जमिनीकडून सल्फेटयुक्त रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद मिळतो. अशा जमिनीत विद्राव्य रूपातील फॉस्फरस दिल्यास मुळ्यांची वाढ चांगली होते. अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते. कॅल्शिअमयुक्त जमिनीत मॅग्नेशिअमची कमतरता जाणवते. मॅग्नेशिअम हा पानांतील क्लोरोफिल (हरितद्रव्य) सिंथेसिससाठी व अन्ननिर्मितीसाठी महत्त्वाचे कार्य करतो. राहुल यांनी या अनुषंगाने खतांचे नियोजन केलेले पाहण्यास मिळते.

  शेणखताचा कुजवून वापर राहुल बिगर कुजवलेले काहीच जमिनीत वापरत नाहीत. सेंद्रिय खत वापरण्यापूर्वी ते जी प्रक्रिया करतात ती पुढीलप्रमाणे. ३० टक्के शेणखत, ३० टक्के कारखान्याचे बगॅस, ३० टक्के प्रेसमड अधिक डाळिंबासाठी १० टक्के कारखान्याची राख तर अन्य पिकांसाठी (द्राक्षे, भाजीपाला) त्याऐवजी १० टक्के पोल्ट्रीखत. डेपो लावून सूर्यप्रकाशाद्वारे या घटकांच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यातून चांगली उष्णता उत्सर्जित होते. या प्रक्रियेमुळे मूळकुजीचा धोकाही कमी केला जातो. ज्या वर्षी वापर करायचा त्याच्या ९ ते १२ महिने आधी ही निर्मिती सुरू होते. म्हणजे वापरावयाच्या वर्षी तयार दर्जेदार ह्यूमस उपलब्ध होते. वापर- दरवर्षी. एकरी २० ब्रास प्रति पीक. काढणीनंतर. संपर्क- राहुल रसाळ, ९७६६५५०६२४

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com