सालईबनला मिळाली नवी ओळख

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने पुढाकार घेत ‘सालईबन’ येथील महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या उजाड जमिनीवर हिरवाई फुलवली आहे. २५ हजारांवर वृक्षांचे रोपण व संरक्षण केले जात आहे. पाच वर्षांपूर्वी उजाड दिसणारा डोंगर आता पुन्हा हिरवाई शालू नेसला आहे.
सालईबनला मिळाली नवी ओळख
पाच वर्षांपूर्वी उजाड असलेले डोंगर असे हिरवाईने नटले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने पुढाकार घेत ‘सालईबन’ येथील महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या उजाड जमिनीवर हिरवाई फुलवली आहे. २५ हजारांवर वृक्षांचे रोपण व संरक्षण केले जात आहे. पाच वर्षांपूर्वी उजाड दिसणारा डोंगर आता पुन्हा हिरवाई शालू नेसला आहे.   सातपुड्याच्या पर्वतरांगा मागील काही वर्षांत वृक्षतोड व अन्य कारणांनी उजाड झाल्याचे पाहण्यास मिळते आहे. वन्यजीवांना मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला. अशा स्थितीत पर्यावरणपूरक कार्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशन आणि मनजितसिंग शीख पुढे आले. पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी मनजितसिंग पूर्णवेळ स्थायिक झाले. येथील सालईबनमध्ये स्वप्नवत काम उभे राहत आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेले चालठाणा छोटे गाव असून त्याला शांतीनगर असेही म्हटले जाते. गावापासून दोन किमी अंतरावर सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी महात्मा गांधी लोकसेवा संघाची जमीन आहे. कलाचार्य पंधे गुरुजींसह अनेक ज्येष्ठ सर्वोदयींच्या पुढाकारातून काही वर्षांपूर्वी तेथे चळवळीचे केंद्र सुरु झाले. काळाच्या ओघात मध्यंतरी गोरक्षण वगळता अन्य कार्य थांबले. वृक्षारोपण आणि संवर्धन महात्मा गांधी यांच्या विचाराला अनुसरून येथे ‘तरुणाई’ आता सक्रिय झाली आहे. गांधीजींचे विकासाचे आणि निसर्ग संरक्षणाबाबतचे विचार शाश्वततेच्या संकल्पनेवर आधारित होते. तेच केंद्रस्थानी ठेवत वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. लोकसहभाग, सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या सहकार्याने २५ हजार झाडे लावून जगवली सुद्धा. सातपुडा जंगलातून नामशेष होत असलेले सालई, पळस, मोह, अंजन, खैर, बेहडा, कडुनिंबासह अनेक वृक्ष येथे पुन्हा डोलू लागले आहेत. वनौषधी उद्यानाची निर्मिती दुर्मिळ कंद, वनस्पतीची लागवड झाली आहे. संस्थेच्या जमिनीलगत शासनानेही मागील वर्षी ७५ हजार रोपांची लागवड केली. सर्वात मोठा बदल जैवविविधता वाढण्यावर झाला. उजाड आणि वैराण झालेल्या जागेवर हिरवळ झाल्याने जीवसृष्टी येथे पुन्हा सृजन करू लागली. विविध प्रकारच्या पक्ष्यांसह फुलपाखरे, सरीसृप व काही प्रमाणात वन्यजीव येथे मुक्तपणे बागडत आहेत. काही भागात विषमुक्त शेतीचा प्रयोग सुरु करून अन्नधान्यासोबतच भाजीपाला पिकविला जात आहे. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, शेणखत, कंपोस्ट खताचा वापर केला जातो. आदिवासी संस्कृतीचे जतन सातपुडा परिसरात अनेक आदिवासी पाडे आहेत. संस्थेच्या जमिनीवर वसलेल्या वडपाणी आणि लगतच असलेल्या बांडापिंपळ येथील आदिवासींचा जीवनस्तर उंचावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. वडपाणी या वस्तीसाठी पूर्वी रस्ता नव्हता. शेताच्या बांधावरून किंवा जंगलातील नाल्यातून त्यांची वहिवाट होती. तेथील आबाल वृद्धांना सोबत घेऊन तरुणाईने श्रमदानातून एक रस्ता बनवला. त्यामुळे आता वाहने त्यांच्या घरापर्यंत पोचू लागली आहेत. या रस्त्यामुळे आरोग्य सुविधा, शेतमालाची ने-आण या सारख्या कामासाठी मोठा फायदा झाला. येथे आता प्यायचे पाणी, वीज पोचली. आदिवासींचे आरोग्य सुधारावे या हेतूने गेल्या पाच वर्षांत सातत्याने आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. दरवर्षी होळी सणादरम्यान येथे फगवा उत्सवाचे आयोजन केल्या जाते. पारंपरिक वाद्य, वेशभूषा, लोकगीत, लोकसंगीत याचा सुंदर संगम याद्वारे होत असतो. आदिवासी संस्कृतीमधील बोली भाषा नवीन पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने चित्रमय शब्दकोश निर्मितीचे काम पूर्णत्वास जात आहे. पावरा, निहाल, भिलाला सारख्या आदिवासी जमातींच्या मुलांसाठी हा ज्ञानकोष महत्त्वाचा ठरणार आहे. जागतिक दर्जाचे गांधीशिल्प महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे वर्ष संपत असतानाच विनोबा भावे यांचे १२५ वे जयंती वर्ष सुरु होत आहे. यानिमित्ताने सालईबनात महात्मा गांधी यांचे जागतिक दर्जाचे अनोखे शिल्प उभारले गेले. तरुणाई फाउंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे यांच्या संकल्पनेतून २५ फूट उंचीचे शिल्प पोलाद पट्ट्यांपासून शिल्प उभे राहिले. एका विशिष्ट अंतरावरून आणि विशिष्ट कोनातून पहिले असता बापूंची हसरी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पाहण्याची जागा एक फूट जरी बदलली तरी प्रतिमा विचलित होते. दृष्टीभ्रमावर आधारित या कलेला ‘एनामॉर्फिक स्कल्प्चर किंवा इल्युजन आर्ट’ असेही संबोधतात. महात्माजींची जगभरात अनेक शिल्प आहेत. मात्र अशा पद्धतीचे हे जगातील पहिले शिल्प असावे. या ठिकाणाला ‘शांती स्थळ’ असे नाव देण्यात आले आहे. प्रतिक्रिया सातपुड्यातील आदिवासी, शेतकरी व पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सालईबन’ हा प्रकल्प लोकसहभागातून उभा राहतो आहे. भविष्याच्या दृष्टीने निसर्गोपचार केंद्र, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, देशसेवेत जाणाऱ्या युवकांसाठी अध्ययन व क्रीडा केंद्र उभारण्याचा ‘तरुणाई’चा मानस आहे. यासाठी समाजातून सहकार्याची, निधीची गरज आहे. मागील पाच वर्षांत पैशात मोजता येणार नाही, एवढे मोठे कार्य उभे राहिले. रस्ते, पक्के सभागृह, जागतिक दर्जाचे शांतीशिल्प, विंधन विहिरी, टीनशेड, निवासकुटी, वीज व्यवस्था, सौरदिवे, ठिबक सिंचन, पाणी पुरवठा, सार्वजनिक वापरासाठी साहित्य अशा विविध बाबी आहेत. - उमाकांत कांडेकर, कार्यकर्ते, तरुणाई फाउंडेशन ९०४९५८८७४४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.