अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी प्रयोग

पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या खडकाळ जमिनीत सेंद्रिय पध्दतीने नियोजन करून हळदीची प्रयोगशील शेती साकारली आहे. पीडीकेव्ही हळद वाणात त्यांना आरोग्यदायी कुरकुमीनचे प्रमाण सर्वाधिक मिळाले असून त्या जोरावर बाजारपेठेत हळदीला जोरदार मागणीही त्यांनी मिळवली आहे.
पिकवलेली दर्जेदार हळद.
पिकवलेली दर्जेदार हळद.

पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या खडकाळ जमिनीत सेंद्रिय पध्दतीने नियोजन करून हळदीची प्रयोगशील शेती साकारली आहे. पीडीकेव्ही हळद वाणात त्यांना आरोग्यदायी कुरकुमीनचे प्रमाण सर्वाधिक मिळाले असून त्या जोरावर बाजारपेठेत हळदीला जोरदार मागणीही त्यांनी मिळवली आहे.   विदर्भात हळदीचे क्षेत्र दरवर्षी विस्तारत आहे. बदलत्या हवामानात हे पीक शेतकऱ्यांना खंबीर साथ देत आहे. अकोला जिल्हयात पातूर तालुक्यात फळे, भाजीपालावर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मोर्णा प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील पास्टुल गावाला जंगलाचा वेढा आहे. येथील संतोष नामदेव घुगे प्रयोगशील शेतकरी व त्यातही अलीकडे हळदीचे उत्पादक म्हणून ओळखले जातात.दहा एकरांपैकी आठ एकर शेती वहितीखाली आहे. जमीन नदीकाठावर असून बहुतांश क्षेत्र दगड, खडकाळ आहे. वडिलोपार्जित अडीच एकरांत २० वर्षांपूर्वी लावलेली मोसंबी बाग आहे. तीन वर्षांपूर्वी मोसंबीची नवी बागही उभी केली. रब्बीत कांदा, कलिंगड घेतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे थेट शेतात त्यांना मार्गदर्शन मिळते. सिव्हिल इंजिनिअरिंग विषयातील पदविका घेतल्यानंतर काही वर्षे घुगे यांनी कंत्राटी व्यवसाय केला. वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची पूर्णवेळ जबाबदारी आली. हळदीची शेती एक एकर, दोन एक असे दरवर्षी क्षेत्र वाढवत हळदीचे क्षेत्र चार एकरांपर्यंत पोचवले आहे. सर्वाधिक कुरकुमीन असलेल्या पीडीकेव्ही वायगाव वाणाची लागवड तीन वर्षांपासून करण्यास सुरवात केली आहे. औषधी कारणांसाठी ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी असल्याचे घुगे सांगतात. तीन वर्षांपूर्वी पाच किलो बियाणापासून या वाणाची लागवड केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून वाण मिळाले. बियाण्यासाठी वृद्धी केली. मागील वर्षी एक एकरांत ओल्या हळदीचे १२० क्विंटल तर वाळवलेल्या हळदीचे २५ ते २७ क्विंटल उत्पादन मिळाले. नागपूर येथील मनोहरराव परचुरे यांच्या पुढाकाराने हळदीची प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यात ७.२९ एवढी कुरकुमीनचे सर्वाधिक टक्केवारी मिळाली. घुगे सांगतात की सेलम वाणात २ टक्के, प्रगती वाणात ५.११ टक्के कुरकुमीन मिळाले होते. त्या तुलनेत या वाणात मिळालेले प्रमाण निश्‍चित महत्त्वाचे आहे. कुरकुमीनचा विक्रीला फायदा कुरकुमीन चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर हळदीला मागणी सुरु झाली. आयुर्वेदिक उद्योगात कार्यरत प्रसिद्ध कंपनीने आगाऊ रक्कम देत पाच क्विंटल हळद खरेदी केली. घुगे सांगतात की कोरोना काळात थेट ग्राहकांनी ओली हळद खरेदी केली. अनेकांनी कंद नेले. त्याचा काढा करून सेवन केला. काहींनी बेणे नेले. किलोला १०० रूपये दर (ओली) मिळाला. आपल्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. लाखोंचा खर्च करूनही त्यांना फायदा झाला नव्हता. आता आरोग्यदायी शेतीबाबत त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा तसेच रुग्णांना मदत छोटा प्रयत्न असून त्यात समाधान अधिक असल्याचे ते सांगतात. सेंद्रिय पध्दतीचा वापर घुगे सांगतात की माझे शेत धरणाच्या पायथ्याला आहे. शेताला लागूनच नदी वाहते. शेजारी मोठे जंगल आहे. या सर्व वातावरणाचा फायदा पिकाला होत असावा. शिवाय सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापन करतो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळत असावे. कुठलेही रासायनिक खत देत नाही. पेरणीपूर्वी बेडवर वर्षभर कुजवलेले शेणखत, निंबोळी पेंड व अन्य घटक देतो. यापूर्वी सेलमसारख्या वाणांमधूनही सुकवलेल्या हळदीचे उत्पादन एकरी ३० क्विंटलच्या पुढे मिळाल्याचे घुगे सांगतात. खड्डा पद्धतीने वृद्धी हळद हे सुमारे नऊ महिने लागणारे पीक आहे. त्यामुळे वर्षात एकच पीक घेता येते. संतोष यांनी याबाबत विचार करून हा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने काम सुरु केले. यात बेणे तयार करण्याची पद्धत वापरली. डिसेंबरमध्ये हळद काढल्यानंतर खड्डा तयार करून त्याची सावलीत साठवणूक होते. खालील व वरील थरात लिंबाचा पाला अंथरला जातो. वरून शेडनेटचे संरक्षण दिले जाते. मे महिन्यात वातावरण बदलण्यास सुरवात होते. अंदाज घेऊन बेणे ठेवलेल्या खड्ड्यात तीन ते चार वेळा पाणी दिले जाते. यामुळे कंदांना कोंब फुटण्याची प्रक्रीया सुरु होते. पावसाचा अंदाज घेऊन मे महिन्यात लागवड सुरु होते. कंद लवकर व ताकदीने अंकुरतात. या पद्धतीमुळे अंकुरण्यासाठी होणारा विलंब टाळता येतो. शिल्लक दिवस हळदीला परिपक्व होण्यासाठी मिळतात. करपा रोगापासून नुकसान टळते. साधारण सहा ते सात महिन्यात हळद तयार होते असे घुगे सांगतात. खडकाळ जमिनीत मोसंबी वडिलांनी २० वर्षांपूर्वी लावलेली मोसंबीची बाग आजही ५० हजारांपेक्षा निव्वळ नफा देत आहे. झाडाला लगडणारी फळे वजनदार व दर्जेदार असल्याचा प्रत्यय येतो. घुगे कृषी विद्यापीठाच्या वाणांना पसंती देतात. यंदा विद्यापीठाचे तुरीचे वाण लावले आहे. झाडावर जास्त संख्येने शेंगा पाहण्यास मिळत आहेत.  

 प्रतिक्रिया  हळदीच्या विविध वाणांत २.५ ते ६.२ पर्यंत कुरकुमीन आढळते. स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापुरी या वाणांच्या तुलनेत पीडीकेव्ही वायगाव वाणात कुरकुमीन अधिक म्हणजे ६.२ टक्क्यापर्यंत आहे. -डॉ.विजय काळे-८२७५३११८५४ (उद्यान विद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) संपर्क- संतोष घुगे-७७२१९९५५७७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com