फळबागांना भक्कम आधार रेशीमशेतीचा

देवगा (जि. औरंगाबाद) येथील ढाकणे कुटुंबाने मोसंबी व केशर आंब्याच्या फळबाग शेतीलाअलीकडील वर्षांत रेशीम शेतीची जोड दिली आहे. आई-वडिलांचे संस्कार, एकत्रित कुटुंबाची ताकद,शेतीतील कष्ट व व्यवस्थापन यांच्या जोरावर फळबागांसह रेशीम शेतीने त्यांच्या शेतीचे व कुटुंबाचेअर्थकारण भक्कम केले आहे.
जालना रेशीम बाजारपेठेत आपल्या रेशीम कोषांसह शहादेव ढाकणे.
जालना रेशीम बाजारपेठेत आपल्या रेशीम कोषांसह शहादेव ढाकणे.

देवगा (जि. औरंगाबाद) येथील ढाकणे कुटुंबाने मोसंबी व केशर आंब्याच्या फळबाग शेतीला अलीकडील वर्षांत रेशीम शेतीची जोड दिली आहे. आई-वडिलांचे संस्कार, एकत्रित कुटुंबाची ताकद, शेतीतील कष्ट व व्यवस्थापन यांच्या जोरावर फळबागांसह रेशीम शेतीने त्यांच्या शेतीचे व कुटुंबाचे अर्थकारण भक्कम केले आहे.   औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील देवगा शिवारात शहादेव ढाकणे यांची तीन भावांची मिळून ११ एकर शेती आहे. कुटुंबात १४ सदस्य आहेत. आई सुशीलाबाई, वडील किसनराव, पोलिस दलात वरिष्ठ पदी कार्यरत मोठे बंधू महादेवराव व नजीकच्या आडूळ येथे सेतू सुविधा केंद्रचालक धाकटे बंधू सदाशिव असा शहादेव यांचा परिवार आहे. शहादेव पत्नी शारदा यांच्यासह पूर्णवेळ शेतीची जबाबदारी सांभाळतात. वडिलांच्या वाट्याला ९ एकर शेती आली होती. कष्ट उपसत, प्रसंगी कर्ज उचलत मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा रहाटगाडा पत्नीच्या समर्थ साथीने त्यांनी सांभाळला. मोसंबी लागवडीसह दोन एकर नव्या शेतीची भर घातली. सन १९८२ पासून मोसंबीचे पीक आहे. कमी-अधिक वयाची मिळून सुमारे ९०० झाडे शिवारात पाहण्यास मिळतात. १६ वर्षांपूर्वी केसर आंब्याची एक एकरांत लागवड केली. आज सुमारे ३० ते ४० झाडे नैसर्गिक आपत्तीनंतर उभी आहेत. दोन विहिरी आणि दोन शेततळ्यांच्या आधारे सिंचन होते. शेतीचे अर्थकारण यंदाचे प्रातिनिधीक उदाहरण द्यायचे तर आंबिया बहाराचे १३ टन (सहाशे झाडांमधून) उत्पादन मिळाले. त्यास १७ हजार रुपये प्रति टन दर मिळाला. मृग बहाराचे साडेतीन टन (पावणेतीनशे झाडांमधून) उत्पादन व २७ जार रुपये दर मिळाला. आंब्यातून दरवर्षी किमान ५० हजारांचे उत्पन्न मिळते. फळबागांना हंगामी पिकांची जोड आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीत दीड एकर कपाशीतून सुमारे ११ क्विंटल उत्पादन व ८२०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. दीड एकर तुरीच्या क्षेत्रातून सात क्‍विंटल उत्पादन हाती आले. त्यास ६१०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. रेशीम शेतीची जोड पारंपारिक किंवा फळपिकांना कोणती जोड द्यावी या विचारात असलेल्या शहादेव यांनी बंधू सदाशिव यांच्या सल्ल्याने २०१८-१९ मध्ये रेशीम उद्योगाचा स्वीकार केला. अनुभव काहीच गाठीशी नव्हता. मात्र तालुक्यातील चॉकी सेंटर चालक व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या सल्ल्याने त्यात वाटचाल सुरू केली. गेल्या चार वर्षात या उद्योगाने त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला लावलेला हातभार पाहता तो उद्योग शेतीचा, कुटुंबाचा मुख्य आधार बनल्याची स्थिती आहे. ७० बाय २२ फूट लांबीचे शेड आहे. त्यात २० बाय साडेपाच फूट आकाराची सहा रॅक्स व पाच कप्पे आहेत. तालुक्यातील एका रेशीम उत्पादकाकडून चॉकी आणले जातात. त्यातून बॅचचा अवधी कमी होतो. ढाकणे दांपत्यासह घरातील सदस्यही सुट्टीच्या दिवसांत श्रम करतात. कुटुंबातील सामुहिक विचारातून सर्व निर्णय घेण्यात येतात. बागा आणि रेशीमशेती मिळून तीन ते चार मजूरांना वर्षभर काम मिळते. एक सालदार कायम आहे. उत्पादन व उत्पन्न पहिल्या वर्षी प्रत्येकी २०० अंडीपुंजांच्या एकूण दोन बॅचेस घेतल्या. पुढील वर्षी २०० ते २५० अंडीपुंजांच्या एकूण सहा तर २०२०-२१ मध्ये वर्षभरात आठ बॅचेस घेतल्या. यंदा आत्तापर्यंत तीन बॅचेस प्रत्येकी २५० अंडीपुंजांच्या तर तीन बॅचेस ४०० अंडीपुंज्याच्या अशा मिळून सहा बॅचेस घेतल्या आहेत. प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ९० किलो रेशीम कोषांचे उत्पादन मिळत आहे. शहादेवराव घेतात. २५० अंडीपुंजांच्या बॅचसाठी सुमारे २० हजार रुपये तर ४०० अंडीपुंजांच्या बॅचसाठी ४० हजारांपर्यंत खर्च आला आहे. अर्थकारण ठरतेय फायदेशीर जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे वाहनाद्वारे कोष घेऊन जाणे सोईस्कर होते. यंदा कोषांचे दर अत्यंत चढे म्हणजे ७०० ते ८०० रुपये प्रति किलो मिळत आहेत. त्यामुळे या उद्योगाचे अर्थकारण वाढून साडेसात लाख रुपयांपर्यंत पोचले आहे. आणखी दोन बॅचेसची भर पडली तरी त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या तीन वर्षांत मात्र दर २०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत राहिले. कोव्हीड काळात मात्र आर्थिक फटका सहन करावा लागला. प्रति बॅच ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले तरी ते शेतीच्या अर्थकारणाला चांगला हातभार लावत असल्याचे शहादेव म्हणतात. शेळीपालन कुटुंबात आठ वर्षांपासून एका शेळीचे पालन सुरू झाले. उस्मानाबादी जातीची शेळी वर्ष- दीड वर्षातून दोन वेळा किमान सहा पिल्ले देते. दरवर्षी किमान ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. सुरवातीला घेतलेल्या शेळीपासून आता दोन शेळ्या झाल्या आहेत. दुसऱ्या पाटीनेही नुकतेच दोन नर दिले आहेत. शेळीपालनाचाही विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. एकत्र कुटुंब हीच ताकद शहादेव यांचे मोठे बंधू महादेव म्हणतात की वडिलांचे शिक्षण कमी असलं तरी त्यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत आमचं शिक्षण चांगलं होण्यावर भर दिला. मी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर १९९७ मध्ये घरची आर्थिक गरज म्हणून पोलिस दलात शिपाई पदावर रुजू झालो. वडिलांनी आम्हाला त्याग व संकटावर संयमाने मात करण्याची शिकवण दिली. दूरदृष्टीतून मोसंबी व आंबा बाग उभी केली. दोन हजार सालापर्यंत उत्पादन आणि अर्थकारण सांभाळताना वडिलांची तगमग व्हायची. पण ते डगमगले नाहीत. मी २०११ मध्ये राज्य सेवा परिक्षेद्वारे पीएसआय व पुढे वरिष्ठ पदापर्यंत पोचलो. एकत्रित कुटुंब हीच आमची खरी ताकद आहे.

संपर्क- शहादेव ढाकणे-९४०४५५०२५७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com