वर्षभर तिहेरी आंतरपीक पद्धती, आले शेती झाली कमी जोखमीची

सातारा जिल्ह्यातील पाल येथील विजय व सतीश या शिंदे बंधूंनी आले या पिकांत कोथिंबीर, झेंडू व पपई या तीन आंतरपिकांची जोड दिली आहे. प्रत्येक आंतरपिकाची मागणी, त्याचा हंगाम व मिळणारा दर या बाबी लक्षात घेऊन तशी लागवड केल्याने त्यातून चांगला पैसा मिळवत आले पिकातील उत्पन्न हे पूर्ण बोनस म्हणून मिळवले आहे.
वर्षभर तिहेरी आंतरपीक पद्धती, आले शेती झाली कमी जोखमीची
सतीश व संदीप हे शिंदे बंधू.

सातारा जिल्ह्यातील पाल येथील विजय व सतीश या शिंदे बंधूंनी आले या पिकांत कोथिंबीर, झेंडू व पपई या तीन आंतरपिकांची जोड दिली आहे. प्रत्येक आंतरपिकाची मागणी, त्याचा हंगाम व मिळणारा दर या बाबी लक्षात घेऊन तशी लागवड केल्याने त्यातून चांगला पैसा मिळवत आले पिकातील उत्पन्न हे पूर्ण बोनस म्हणून मिळवले आहे .   सातारा जिल्ह्यातील पाल (ता. कऱ्हाड) हे खंडोबा देवस्थान राज्यात प्रसिद्ध आहे. येथील विजय व सतीश हे शिंदे बंधू यांनी आपली शेती प्रयोगशील व प्रगतिशील केली आहे. शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. सुरूवातीच्या काळात शेती कोरडवाहू असल्याने सतीश शेती करण्याबरोबरच अन्य शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करायचे. दरम्यान, सह्याद्री साखर कारखान्याच्या यशवंत सहकारी पाणीपुरवठा योजनेमुळे सतीश यांची शेती बागायत होण्यास मदत मिळाली. त्या वेळी एक एकरात पहिल्यांदाच ऊस घेतला. त्याचे एकरी ७० टन उत्पादन मिळाले. सिंचनाची झालेली व्यवस्था व आश्‍वासक वाटू लागलेले अर्थकारण पाहून सतीश यांचा उत्साह वाढला. मग २००० च्या दरम्यान या भागात नगदी असलेले आले पीक घेण्यास सुरुवात केली. पण त्याच्या दरांतही अस्थिरता जाणवू लागली. आर्थिक नियोजन बिघडत असल्याचे लक्षात आले. आंतरपिकांची जोड आले पीक दीर्घ मुदतीचे असल्याने त्यात एकाहून अधिक आंतरपिके घेणे व त्यातून अधिकाधिक उत्पन्न कमावणे शक्य होते. आले पिकातील दरांची जोखीमही कमी करणे शक्य होते. शिंदे यांनी त्या दृष्टीने ही पद्धती अवलंबण्याचे ठरवले. त्यादृष्टीने पुढील पिकांचे नियोजन केले. कोथिंबीर- मे किंवा जूनच्या सुरुवातीला आल्याची लागवड होते. त्यानंतर लगेच धने लावण होते. साधारणपणे ४५ ते ५० दिवसांत कोथिंबीर काढण्यास येते. एकरात सुमारे सात हजार ते आठ हजारांपर्यंत पेंड्या मिळतात. जून- जुलैच्या काळात बाजारात मागणी असते त्या वेळी कोथिंबीर उपलब्ध होत असल्याचा फायदा घेता येतो. पाच, सात ते दहा रुपये प्रति पेंडीपर्यंत दर मिळतो.  या पिकातून सुमारे ४० हजारांपासून ते त्यापुढेही उत्पन्न मिळते. कराड बाजारपेठेत कोथिंबीर विक्रीस नेली जाते. झेंडू कोथिंबीर निघाली की आले पिकांत बाळ भरणी होते. या क्षेत्रात एक बेड आड पद्धतीने झेंडू घेऊन प्रत्येकी दोन रोपांत चार फूट अंतर ठेवले जाते. एकरी सुमार तीन हजारांपर्यंत रोपे बसतात. फुले सुमारे ४५ दिवसांत सुरू होतात. गौरी, गणपती, श्रावण महिन्यात फुले येतील असे नियोजन ठेवले जाते. साहजिकच सरासरी प्रति किलो ३० ते ४० रूपये दर मिळतो. एकरी चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. एकरी ५० ते ६० हजार रुपये भांडवली खर्च येतो. तर एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. विक्री दादर मार्केटला होते. पपई आले लागवडीनंतर सुमारे तीन महिन्यांनी म्हणजे ऑगस्टच्या अखेरीस पपई लागवड एक आड बेड पद्धतीने होते. उत्पादन सुमारे नऊ महिन्यांनी सुरू होते. रमजान महिन्यात पपई येईल असे नियोजन असते. एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. उत्पादन खर्च ६० ते ७० हजार रुपये येतो. गोवा व वाशी येथे पपई विक्रीस पाठवली जाते. किलोला पाच रुपयांपासून ते १२ व कमाल १४ रुपयांपर्यंत दर मिळतो. उत्पादन खर्च वजा जाता ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. आल्याचे उत्पन्न बोनस तीन आंतरपिकांची त्रिसूत्री राबवल्याने आले पिकाचे उत्पन्न बोनसच ठरते. या पिकात मशागत ते काढणीपर्यंत एकरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मार्चमध्ये काढणी केल्यास ३० ते ३५ गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) एवढे उत्पादन मिळते. अलीकडील वर्षांत प्रति गाडी दर पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत खाली आल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र आतापर्यंतचा विचार केल्यास या पिकामुळे कुटुंब व शेतीची आर्थिक घडी बसण्यास मदत झाल्याचेही ते गतात. अलीकडे दोन ते अडीच एकरांवर हे पीक असते. सन २०१२ मध्ये विक्रमी प्रति गाडीस ६१ हजार, तर मागील चार वर्षांपूर्वी ४० हजार रुपये दर मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांचे शेती व्यवस्थापन (ठळक बाबी)

 • दरांचा अभ्यास करून पिकांची निवड. वर्षभर पैसा खेळता राहावा असे पीक पद्धती व आर्थिक नियोजन.
 • टोमॅटो पिकाचीही दरवर्षी लागवड. सध्या ३० गुंठ्यांत उत्पादन सुरू. जोडीला कांदा, कलिंगड, भात, मिरचीही.
 • दूध व शेणखतासाठी प्रत्येकी दोन म्हशी व गायींचे संगोपन. शेतीला पूरक म्हणून ५०० संख्या क्षमतेच्या कोंबडीपालन शेडची उभारणी.
 • शेतीतून साम्राज्य शिंदे यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मदतीने योग्य नियोजनाद्वारे शेतीतून साम्राज्य उभे केले आहे. टुमदार बंगला बांधला आहे. ट्रॅक्टर, अवजारे, चारचाकी गाडी खरेदी केली आहे. दोन एकर क्षेत्रातही वाढ केली असून विहीर, नदीवरून पाइपलाइन करून शेती बागायत केली आहे. स्वतःची व खंडाने मिळून २२ एकरांत शेती केली जाते. पुतण्या संदीप देखील काकांच्या मदतीने शेतीत प्रयोगशील झाला आहे. संपर्क- सतीश शिंदे, ९८२२३१४५७१

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.