गरमडे यांनी विकसित केले सोयाबीनचे वाण, कायदेशीर स्वामित्व हक्क प्राप्त

वायगाव भोयर (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथील सुरेश बापुराव गरमडे यांनी निवड पद्धतीने सोयाबीनचे वाण विकसित केले आहे. विविध गुणवैशिष्ट्ये व उत्पादकतेसाठी हे वाण चांगले असल्याचा दावा आपल्या अनुभवातून गरमडे यांनी केला आहे. वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकार महासंघ यांच्यातर्फे या वाणाला कायदेशीर स्वामीत्व हक्क प्राप्त झाले आहेत.
सुरेश गरमडे यांनी विकसित केलेले सोयाबीन वाण व त्याचे शेत.
सुरेश गरमडे यांनी विकसित केलेले सोयाबीन वाण व त्याचे शेत.

वायगाव भोयर (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथील सुरेश बापुराव गरमडे यांनी निवड पद्धतीने सोयाबीनचे वाण विकसित केले आहे. विविध गुणवैशिष्ट्ये व उत्पादकतेसाठी हे वाण चांगले असल्याचा दावा आपल्या अनुभवातून गरमडे यांनी केला आहे. वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकार महासंघ यांच्यातर्फे या वाणाला कायदेशीर स्वामीत्व हक्क प्राप्त झाले आहेत.   चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव भोयर (ता. वरोरा) या गावचा समावेश ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफरझोन’मध्ये होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास बाराही महिने राहतो. त्यामुळेच शेती करणे या भागात आव्हानाचे असते. गावची लोकसंख्या १५०० असून, आदिवासीबहूल लोकसंख्या ७० टक्के आहे. वरोर या तालुक्याच्या ठिकाणापासून गाव ३० किलोमीटरवर आहे. याच गावी सुरेश बापूराव गरमडे यांची शेती आहे. वन्यप्राण्यांच्या समस्येवर उपाय शोधताना आपल्या शेताला त्यांनी सौर कुंपण घातले आहे. सन १९८९ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची सूत्रे सुरेश यांनी आपल्याकडे घेतली. सन १९८७ मध्ये त्यांनी बँकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेत विहीर खोदली. सुमारे ३६ फूट खोदल्यानंतरही पाणी लागले नाही. परिणामी, खर्च वाया गेला. मात्र कर्जाचा भरणा करावा लागला. यानंतरही निराश न होता घरूनच पैसा उभारत ३२ फूट खोल व २० फूट रुंद विहिर खोदून त्याला दगडाचे बांधकाम केले. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले व एक मुलगी अशा सदस्यांचा समावेश आहे. सोयाबीन वाणाचा विकास गरमडे यांची वडिलोपार्जित १६ एकर शेती असून, तीन एकरांत भाताची लागवड होते. सिंचनाच्या सुविधा असल्याने सोयाबीन व पुढे हरभरा लागवडीचा ‘पॅटर्न’ राबविला होता. काही शेती करारावर घेतली. सोयाबीनचे क्षेत्र १६ एकरांपर्यंत विस्तारले. जेएस ३३५ वाण घेण्यावर त्यांचा भर होता. सन २०१० मध्ये शेतात निरीक्षण करीत असताना त्यांना सोयाबीनच्या दोन झाडांना अधिक शेंगधारणा झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना ३२५ पर्यंत शेंगा लगडलेल्या होत्या. उर्वरित झाडांना ६० ते १०० इतक्याच संख्येत शेंगा होत्या. परिणामी, या झाडांचे गुणधर्म काही वेगळे असल्याचे वाटून त्यापासून बियाणे तयार करण्याचा निर्णय घेतला. पुढे सुमारे २०० ते २५० ग्रॅमपर्यंत व टप्प्याटप्प्याने अधिक बियाणे मिळविण्यावर भर दिला. व्यवस्थापनातील बाबी गरमडे दोन ओळींत १६ ते १८ इंच अंतर ठेवून सोयाबीन घेतात. ट्रॅक्टर किंवा बैलचलित यंत्राचा वापर त्यासाठी होतो. गादीवाफा (बेड) पद्धतीतही उत्पादकता चांगली मिळते. परंतु जमिनीच्या प्रतिनुसार त्यात फरक होतो असे गरमडे सांगतात. मॉन्सूनच्या पावसाने खंड दिल्यास संरक्षित ओलित करण्याचा प्रयत्न असतो. दोन ओळींतील अंतर १६ इंच ठेवल्यास सहा तासांनंतर एक तास (ओळ) रिकामा सोडण्यात येतो. उत्पादन व वाणवैशिष्ट्ये गरमडे अलीकडील वर्षांपासून स्वतः विकसित केलेल्या वाणाचीच लावण करतात. त्यास त्यांनी एसबीजी-९९७ असे नाव दिले आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबाबत त्यांनी केलले दावे पुढीलप्रमाणे आहेत. उंची ७५ सेंटिमीटरपर्यंत आहे. प्रति १०० दाण्यांचे वजन १३ ग्रॅम आहे. तीन दाणे असलेल्या शेंगांचे प्रमाण बहुतांश आहे. एकरी १४, १५ ते १६ क्विंटल उत्पादन बागायती पध्दतीत मिळाले आहे. प्रयोगशाळेत तपासून घेतल्याप्रमाणे यात तेलाचे प्रमाण १९.५० टक्के आढळले आहे. जेएस-३३५ या वाणात हेच प्रमाण १८ टक्के आढळले आहे. याला प्रति झाड १०० ते १५० पर्यंत शेंगा येतात. प्रतिकूल वातावणात ‘यलो मोझॅक’ रोगाला हे वाण बळी पडत नसल्याचा दावाही केला आहे. घेतले कायदेशीर स्वामित्व हक्क नवी दिल्ली येथील केंद्रिय कृषी मंत्रालयांतर्गत असलेल्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकार प्राधीकरणातर्फे शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या वाणाला स्वामीत्व हक्क देण्यात येतात. पुणे येथील कृषी महाविद्यालयात या प्राधीकरणाचे कार्यालय आहे. त्या अंतर्गत गणेशखिंड येथील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी गुरव यांनी नियम व निकषांनुसार आवश्‍यक तपशील भरून गरमडे यांचा प्रस्ताव अर्ज प्राधीकरणाकडे पाठवण्यासाठी सहकार्य केले. श्री. गुरव म्हणाले, की पुढे प्राधीकरणाच्या निर्णयावरून वाणाच्या काही परीक्षण चाचण्या घेतल्या जातात. गुणधर्म तपासले जातात. ही प्रक्रिया झाल्यानंतर ‘प्लॅंट व्हरायटी रजिस्ट्री’मध्ये त्याबाबत माहिती प्रसिध्द केली जाते. ९० दिवसांचा ना हरकत कालावधी देण्यात येतो. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या वाणाचे नोंदणीकरण होते. तसे प्रमाणपत्र मिळते. म्हणजेच त्या शेतकऱ्याला संबंधित वाणाचे कायदेशीर स्वामित्व हक्क प्राप्त होतात. सर्वांचे सहकार्य गरमडे यांच्या गावापासून १८ किलोमीटरवर सुसा गाव आहे. येथील श्रीकांत एकुडे यांचे एम. एससी. (अ‍ॅग्री)पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनीही प्राधिकरणाकडे तांत्रिक मुद्दे देण्यासाठी सहकार्य केले. पंचायत समिती कृषी अधिकारी शंकर किरवे, जयंत धात्रक, तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश, शेगावचे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, पंचायत समिती अधिकारी विजय खिरडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, विशाली घागी यांचीही मदत झाली. दादाजी खोब्रागडे प्रेरणास्रोत भाताचे विविध वाण विकसित करण्यात कै. दादाजी खोब्रागडे यांचे योगदान मोलाचे होते. या वाणांचे स्वामित्व हक्क त्यांना मिळाले असते तर फार चांगले झाले असते. हीच प्रेरणा घेऊन मी माझ्या वाणाचे हक्क घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे गरमडे सांगतात. त्यांना यापूर्वी शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. व्यवस्थापन व शेंडे खुडणी पद्धतीतून त्यांनी तुरीचे एकरी १६ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. या भागात सलग तूर घेणारे ते पहिलेच शेतकरी असावेत. संपर्क- सुरेश गरमडे, ९६२३३७६८७२ तज्ज्ञांची प्रतिक्रिया वनस्पती वाण व शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाकडे आपल्या एसबीजी ९९७ या शेतकरी वाणाची नोंदणी केल्याबद्दल गरमडे यांचे अभिनंदन करायला हवे. हा वाण प्रसारित झाला नसून नोंदणीकृत झाला आहे. नोंदणी करताना प्रामुख्याने तो अन्य वाणांपेक्षा वेगळा व नावीन्यपूर्ण आहे की नाही हे पाहिले जाते. त्यात वाणाची हेक्टरी उत्पादकता, विविध किडी- रोगांविरुद्ध प्रतिकारक्षमता आदींविषयी विशेष निरीक्षणे घेतली जात नाहीत. अर्थात विविध पिकातील शेतकरी वाण नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्राधिकरणासोबत आमच्या विद्यापीठाद्वारेही प्रोत्साहित करण्यात येत आहे. डॉ. सतीश निचळ, सोयाबीन पैदासकार, अखिल भारतीय सोयाबीन समन्वयित संशोधन प्रकल्प, अमरावती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संपर्क- ९५८८४१४१४४, ९४२३४७३५५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com