वैशालीताईंच्या श्रमातून शेतीमध्ये समृद्धी

लोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील वैशाली बापूसाहेब होले गेल्या बारा वर्षांपासून दहा एकर शेतीचे नियोजन पाहत आहेत. फळबाग, फुलशेती, कांदा बीजोत्पादन तसेच हंगामी पीक व्यवस्थापनातून त्यांनी शेतीमध्ये समृद्धी आणली. यामध्ये कुटुंबाचीही त्यांना चांगली साथ मिळाली. शेती नियोजनात त्यांचा हातखंडा तयार झाला आहे.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. या गाव शिवारात होले कुटुंबीयांची शेती आहे. या शिवारात कुकडीचे (Kukadi River) कधीतरी पाणी मिळते, शाश्‍वत पाण्याची (Water Availability) उपलब्धता नाही. पाऊस आणि उपलब्ध पाण्यावरच शेती अवलंबून असली तरी होले कुटुंबांनी हार मानली नाही. कृषी पदवीधर बापूसाहेब होले हे बारा वर्षांपासून कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) ‘आत्मा’मध्ये कंत्राटी पद्धतीने समन्वयक आहेत. त्यांना वडिलोपार्जित दहा एकर शेती. नोकरीमुळे बापूसाहेब सतत बाहेर असल्यामुळे वैशालीताईंनी शेतीची जबाबदारी स्वीकारून सर्व तंत्र अवगत केले. दहा एकर शेतीची जबाबदारी त्या सक्षमपणे सांभाळतात. अकरावीत शिकणारा मुलगा अभिजित, बीएस्सी शिकत असलेली वैष्णवी आणि बीसीए शिकत असलेली गायत्रीची शेतीकामात मदत होते. वैशालीताईंना शेती विकासामध्ये कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के, कृषी सहायक अनिल तोडकर यांचे चांगले मार्गदर्शन असते.

Women Empowerment
Horticulture : रोहयो’तील फळबाग लागवडीतील अडथळे कायम

कांदा लागवड आणि बीजोत्पादन ः

- पूर्वी ऊस, मका लागवड होती. वैशालीताईंच्या पुढाकारातून दहा वर्षांपासून दरवर्षी पाच ते सात एकरावर कांदा लागवड. उडीद निघाल्यानंतर कांदा लागवडीचे नियोजन. सीताफळबागेतही कांद्याचे आंतरपीक.

- कांदा व्यवस्थापन खर्च काढण्यासाठी उत्पादित झालेल्यापैकी तीस टक्के कांद्याची तातडीने विक्री. अन्य पिकांच्या तुलनेत कांद्यातून चांगले पैसे.

- पाच वर्षांपासून गावरान कांदा बीजोत्पादन. पहिल्या वर्षी ५ गुंठ्यांवर कांदा बीजोत्पादनातून ५५ किलो बियाणे उत्पादन. प्रति किलोस १ हजार ते १२०० रुपये दर. दरवर्षी एक एकरावर कांदा बीजोत्पादन. एका एकरातून ४७० किलो बियाणे उपलब्धता. प्रति किलोस दीड हजार ते तीन हजारांपर्यंत दर. यंदा साधारण दीड ते दोन हजारांपर्यंत दर मिळाला.

सीताफळात उडदाचे आंतरपीक ः

वैशालीताईंनी पाच वर्षांपूर्वी एक एकर आणि दोन वर्षांपूर्वी अडीच एकरांवर सीताफळाची लागवड केली. दरवर्षी साधारण सात एकरावर उडदाचे उत्पादन घेतात. अडीच एकरांवरील सीताफळात उडदाचे आंतरपीक असते. उडीद निघाल्यानंतर कांदा लागवड केली जाते. साधारण एकरी सहा ते साडेसहा क्विंटल उडदाचे उत्पादन मिळते. सरासरी ५५ ते ६० रुपये किलो प्रती किलो दर मिळतो. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सीताफळ बागेत उडदाचे आंतरपीक घेतले जाते. शेती बांधावरही त्यांनी पेरू, आंबा, जांभूळ, नारळ, ॲपल बेर, संत्रा, मोसंबी, चिकू अशा विविध फळझाडांची लागवड केली आहे.

Women Empowerment
महिला यशोगाथा : पाककलेचे रूपांतर झाले व्यवसायात

शेती व्यवस्थापन ः

- सीताफळ, कलिंगड, कांदा पिकासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापनाला प्राधान्य.

- सीताफळाला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत ताण दिला जातो. या काळात पाण्याचीही कमतरता असते. १५ मेपासून मशागतीची कामे सुरू होतात. एका झाडाला ४० किलो शेणखत, चार किलो गांडूळ खत आळ्यात मिसळून दिले जाते. जूनमध्ये छाटणी करून पाणी दिले जाते. त्यानंतर अडीच महिन्यांनी गरजेनुसार फळपोषण्यासाठी विद्राव्य खताचे नियोजन असते. फळबागेला ठिबक सिंचन आहे.

- दर पंधरा दिवसांनी ठिबकमधून प्रती एकरी दोनशे लिटर जिवामृत दिले जाते. छाटणीनंतर शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाते. एकरी वीस कामगंध सापळे लावले जातात. फळतोडणी

करण्याआधी कोणत्याही रासायनिक कीडनाशकांची फवारणी घेतली जात नाही.

- यंदा सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांकडे फारसा चांगला बहर आला नाही, फळगळ व फुलगळ झाली. वैशालीताईंनी सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे सीताफळास चांगला बहर आला आहे.

- कलिंगड, झेंडू पिकाला शिफारशीनुसार शेणखत, कोंबडीखताचा वापर केला जातो. पीकवाढीच्या टप्प्यात विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते.

- कांदा उत्पादन आणि बीजोत्पादनासाठी माती परीक्षण शिफारशीनुसार रासायनिक आणि सेंद्रिय खताचा वापर केला जातो. फुले उमलायला लागल्यावर काढणीपर्यंत मधमाशीसाठी जाऊ नये म्हणून कोणतीही फवारणी केली जात नाही. मधमाश्‍यांना आकर्षित करण्यासाठी मोहरीची लागवड असते. शेतात ठिकठिकाणी गूळ,पाणी मिश्रण ठेवले जाते.

- जमिनीची सुपीकता जपण्यासाठी दरवर्षी तीन एकरावर ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांची लागवड असते.

- सध्या सर्वच भागांत मजूरटंचाई आहे. त्यामुळे मोकळ्या वेळेत वैशालीताई अन्य शेतकऱ्यांकडे बदलीवर शेतीकामाला जातात. गरजेच्या वेळी त्या अन्य मजुरांना बदलीवर बोलावतात. बापूसाहेबांची अधूनमधून मदत मिळत असली तरी फवारणी, खत देणे, पाणी नियोजन ही कामे वैशालीताई आणि मुले मिळून करतात. वैशालीताई स्वतः ट्रॅक्टर चालवून शेती मशागत करतात.

झेंडू आणि कलिंगडाची लागवड ः

बाजारातील मागणी आणि संभाव्य दराची स्थिती लक्षात घेऊन वैशालीताई गेल्या पाच वर्षांपासून झेंडू आणि कलिंगड लागवडीचा प्रयोग करत आहेत. यंदा एक एकर क्षेत्रात मल्चिंगवर कलिंगड आणि झेंडूची लागवड केली आहे. एक आड एक कलिंगड आणि झेंडू रोपांची लागवड आहे. साधारणपणे दसरा काळात कलिंगड विक्रीस येते. एकरी साधारण २५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. या काळात ८ ते १५ रुपये प्रति किलो दर मिळतो.

- कलिंगड निघाल्यानंतर झेंडू विक्रीला येतो. दिवाळीपर्यंत फुले विक्रीला उपलब्ध असतात. एकरी ५ ते ७ टन फुलांचे उत्पादन होते. प्रती किलोस २५ ते ५० रुपयांपर्यंत दर मिळतो.

विहीर ठरतेय आकर्षण ः

लोणी मसदपूर परिसर फारसा बागायती नाही. त्यामुळे शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून बापूसाहेब होले यांचे वडील दत्तात्रय कृष्णाजी होले तसेच शंकरराव होले, रंगनाथ होले, दामोदर होले या भावंडांनी मिळून १९७२ साली साधारणपणे ५२ फूट व्यास आणि ७५ फूट खोल असलेली विहीर खोदली. वर्षभर काम सुरू होते. दुष्काळात लोणी मसदपूर परिसरातील ५० मजुरांना रोजगार मिळाला. वीस हजार दोनशे रुपये खर्च करून दगडाच्या चिऱ्यांचे आकर्षक बांधकाम, सुमारे तीन मोटा चालतील असे थारोळे, पुढील वर्ष काळाचे नियोजन म्हणून इंजिन ठेवण्यासाठी जागा आणि ११० पायऱ्या आहेत.

विहिरीतील प्रत्येक पायरी साडेतीन फुटांची आहे. कुठेही सिमेंटचा वापर न करता बांधकामाचे वेगळेपण असलेली विहीर, पन्नास वर्षानंतरही सुस्थितीत आहे. याच विहिरीचे पाणी आजही शेतीमध्ये जाते. या परिसरातील एकमेव दगडी बांधीव विहीर पाहण्यासाठी विविध ठिकाणांहून लोक येतात. चित्रपटाच्या शूटिंगसाठी या विहिरीची पाहणी झाली आहे.

संपर्क ः वैशालीताई होले ः ९६५७६३४९९२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com