शाळेसोबत शेतीमध्येही उपक्रमशील....

मांडाखळी (ता.जि. परभणी) येथील मुंजाभाऊ प्रभाकर शिळवणे यांनी शिक्षकी पेशासोबत शेतीशी नाते कायम ठेवले आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रयोगशील शेती नियोजनावर त्यांनी भर दिला आहे. मुंजाभाऊ शेतकरी गटाच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे धडे गावातील तरुण शेतकऱ्यांना देतात.
Agriculture
Agriculture Agrowon

परभणीपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील मांडाखळी शिवारात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. याच गावात पेशाने शिक्षक असलेले मुंजाभाऊ शिळवणे (Munjabhau Shilwane) हे उपक्रमशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. मुंजाभाऊ यांचे माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. बारावी झाल्यानंतर २००४ मध्ये त्यांनी नागपूर येथे डीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. डीएड पदविकेनंतर २००९ मध्ये परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली. सुरुवातीला सोमठाणा (ता. मानवत) येथील शाळेत त्यांची नियुक्ती झाली. अध्यापन करत असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्यापीठ (Yashwantrao Chvan Open University) अंतर्गत कला शाखेतील पदवी (बी.ए.) आणि पदव्युत्तर पदवी (एम.ए. इतिहास) पदवी संपादन केली. सध्या मुंजाभाऊ हे पाळोदी (ता. मानवत) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरीमध्ये असले तरी मुंजाभाऊ यांची शेती आवड (Agriculture) कमी झालेली नाही. दर रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मुंजाभाऊ पूर्णवेळ शेतीमध्ये असतात. शाळेच्या कामकाजाबरोबरीने शेती तसेच शेतकरी गटांच्या उपक्रमांसाठी वेळ देतात.

मुंजाभाऊ यांचे वडील प्रभाकर शिळवणे यांचे चार भावांचे २५ जणांचे संयुक्त कुटुंब होते. या वेळी कुटुंबाच्या दहा एकर शेतीमध्ये पारंपरिक पिकांच्या बरोबरीने भाजीपाला लागवड तसेच दुग्ध व्यवसायाची जोड होती. काही वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाले आणि प्रत्येकाच्या वाट्याला अडीच एकर जमीन आली. त्यानंतर मुंजाभाऊ यांनी दीड एकर जमीन खरेदी केली. दोन ते अडीच एकरांवर भाजीपाला तसेच उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, कापूस लागवड असते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एक एकरावर नागपुरी संत्र्यांची लागवड केली. शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी विहीर आणि कूपनलिका आहे.

Agriculture
संडे फार्मर : अभियंत्याने दिली शेतीला पूरक उद्योगाची जोड

बारमाही भाजीपाला उत्पादन ः

मुंजाभाऊ एकूण लागवड क्षेत्रापैकी दोन ते अडीच एकरावर हंगामानुसार वर्षभर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. पीक फेरपालट करत कारले, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मिरची, काकडी आदी भाजीपाल्याची लागवडीचे नियोजन असते. दरवर्षी मे महिन्यात कारले आणि काकडीची मांडव पद्धतीने लागवड असते. सध्या ३० गुंठ्यांवर कारले, एक एकर सोयाबीन, एक एकरावर कपाशी लागवड आहे. ऑगस्टनंतर टोमॅटो आणि फ्लॉवर लागवड आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन नोव्हेंबरमध्ये खरबूज लागवड केली जाते. सर्वच पिकांना ठिबक सिंचन केले आहे. पिकांना शिफारशीनुसार विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकासाठी फवारणी केली जाते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावले जातात. दर्जेदार भाजीपाला उत्पादनावर भर आहे. मुंजाभाऊ हे सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे बियाणे खरेदी करून प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपनिर्मिती करतात. रोपनिर्मितीसाठी छोटे शेडनेडगृह उभारले आहे. यामुळे खर्चात बचत होऊन दर्जेदार रोपांची उपलब्धता होते.

Agriculture
Vegetable : अभ्यासातून प्रगत केली भाजीपाला शेती

परभणी मार्केटमध्ये विक्री ः

गावातील बहुतांश शेतकरी विविध भाजीपाला लागवड करतात. दररोज गावातील वाहनाद्वारे परभणी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी जातो. शेतकरी गटातील सदस्य भाजीपाला मार्केटमध्ये नेण्यासाठी एकमेकांना मदत करतात. सध्या मुंजाभाऊंच्या शेतीमध्ये कारल्याची दर दोन दिवसाआड तोडणी सुरू असून, १ ते २ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सध्या प्रति किलो ३५ ते ४५ रुपये दर मिळत आहेत. वेलवर्गीय भाजीपाला, तसेच टोमॅटो पिकाने मुंजाभाऊंना चांगली आर्थिक साथ दिली आहे.

सुधारित तंत्राचा वापर ः

आतापर्यंत मुंजाभाऊ दोन ओळींतील अंतर १८ इंच ठेवून सोयाबीन पेरणी करत होते. या पद्धतीने एकरी २४ ते ३० किलोपर्यंत बियाणे लागायचे.एकरी ८ ते ९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे.यंदा त्यांनी एक एकर क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड केली. दोन गादी वाफ्यातील अंतर साडेतीन फूट आणि दोन ओळींतील अंतर १८ इंच ठेवून टोकण यंत्राद्वारे सोयबीनची पेरणी केली. या पद्धतीने एकरी १३ किलो बियाणे लागले. सोयाबीन पिकास माती परीक्षानुसार खतमात्रा दिली आहे. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचे नियोजन आहे. कपाशी लागवड पाच बाय सव्वा फूट अंतरावर असून ठिबक सिंचन केले आहे. या पिकालादेखील माती परीक्षणानुसार खत मात्रा दिली जाते. एकात्मिक कीड नियंत्रणावर त्यांचा भर असतो. सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. रब्बीमध्ये घरापुरते ज्वारी, गहू उत्पादन घेतले जाते.

कुटुंबाची साथ मोलाची...

मुंजाभाऊ यांचे वडील प्रभाकरराव, आई लक्ष्मीबाई यांच्यासह पत्नी ज्योती यांची दैनंदिन शेती व्यवस्थापनात मदत असते. आंतरमशागतीची कामे, पीक व्यवस्थापन आणि भाजीपाला काढणीचे नियोजन कुटुंबातील सदस्यांकडे आहे. दररोज भाजीपाल्याच्या काढणीनंतर पाण्याने स्वच्छता केली जाते. प्रतवारीकरून क्रेट किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून परभणी बाजारपेठेत विक्रीसाठी भाजीपाला पाठविला जातो.

गांडूळ खतनिर्मिती ः

मुंजाभाऊ यांच्याकडे एक गावरान गाय आहे. त्यामुळे गांडूळ खतनिर्मितीसाठी शेण उपलब्ध होते. उपलब्ध शेणखत तसेच गांडूळ खताचा वापर भाजीपाला तसेच अन्य हंगामी पिकासाठी केला जातो. शिफारशीनुसार रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यामुळे खर्चात बचत होते. गरजेनुसार शेणखत विकत घेतले जाते.

शेतकरी गटामार्फत विविध उपक्रम ः

मुंजाभाऊ यांनी १५ शेतकऱ्यांसह एकत्र येत ‘आत्मा’अंतर्गत स्वराज्य अॅग्रो शेतकरी बचत गट स्थापन केला आहे. गटाच्या नियमित बैठकांमध्ये अडीअडचणी तसेच शेतीतील नवीन तंत्रज्ञानावर चर्चा होते. बैठकीमध्ये परिसरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शनासाठी येतात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) गटाने कृषी अवजार बँक सुरू केली आहे. बीबीएफ पेरणी यंत्र, सरी यंत्र, रोटाव्हेटर, मळणी यंत्र आदी अवजारे गरजू शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर दिली जातात. गटातील सदस्यांना अवजारांसाठी दरामध्ये सूट दिली जाते. गटामुळे गावातील शेतकऱ्यांचा कल भाजीपाला, फळबाग लागवडीकडे वाढला आहे. विशेषतः संत्रा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. गटाने गावशिवारात लोकसहभागातून जल, मृद्‍ संधारणाची कामे केल्याने विहिरी, कूपनलिकेच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सामाजिक उपक्रमात सहभाग...

मुंजाभाऊ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दररोज एक तास वाचन उपक्रम राबवितात. आठवड्यातील एक, दोन दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटांना भेटी देतात, पालकांशी चर्चा करतात. यामुळे विद्यार्थ्यांना वाचन तसेच अभ्यासाची गोडी लागली आहे. ‘शेक हॅण्ड फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील विधवा, अनाथ मुलांना मदत करण्यासाठी मुंजाभाऊंनी पुढाकार घेतला आहे.

संपर्क ः मुंजाभाऊ शिळवणे ः ८८०६००३०५७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com