Agrigulture
AgrigultureAgrowon

वर्क फ्रॉम होम’ सोबत शेतीचा लागला नाद

नंदनवाड (जि. कोल्हापूर) येथील रोहित जोशी हा ३२ वर्षे वयाचा युवक गावी राहून पुण्यातील नोकरी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहे. ते करताना घरच्या ११ एकर शेतीचा त्याला नाद लागला. आज ऊस, फळपिके व दुग्धव्यवसायातून घरची शेती उत्पादन व उत्पन्नक्षम करण्यासाठी रोहित यांनी विविध प्रयोग सुरू केले. काही वर्षांतच शेतीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका ठिकाणापासून सुमारे १८ किलोमीटरवर नंदनवाड गाव आहे. येथील रोहित जोशी या ३२ वर्षे वयाच्या युवकाने मुंबई येथे एमसीएचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबई येथेच २००९ ते २०१९ पर्यंत आयटी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर पुणे येथील आयटी कंपनीत ते नोकरीस लागले. मात्र कोरोना लाटेत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. रोहित मग त्यासाठी गावी आले. (Young Man Started Farming Along With Work From Home)

घरची सुमारे ११ एकर शेती होती. मात्र ती उत्पादन व उत्पन्नक्षम नव्हती. बरेच क्षेत्र पडीक होते. वडील सुधीर टपाल खात्यात नोकरीस असल्याने त्यांना शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य होत नव्हते. रोहित यांना शेतीचीही आवड होती. दहा वर्षांपासून ॲग्रोवनचे वाचन करताना शेतीतील ज्ञान ते वृद्धिंगत करीत होते. संपूर्ण ११ एकरांमधून वर्षाला केवळ दोन लाखांपर्यंत उत्पन्न यायचे. नोकरीची दुपारी एक ते रात्री दहा ही वेळ सांभाळून मग त्यांनी शेती उत्पादनक्षम करायला सुरवात केली.

Agrigulture
फलोत्पादन निर्यातीत राज्याचे नेतृत्व कायम

प्रयोगांना सुरवात

सहा एकरांत असलेल्या उसातील व्यवस्थापनात सुधारणा सुरू झाली. हवामान, मातीचा प्रकार, पाणथळ जागा, पाऊस या सर्वांचा विचार करून आपल्यासाठी उसाची योग्य जात कोणती ती पाहण्यासाठी को ८६०३२, नीरा, ९२००५, १०००१, फुले २६५ आदींची लागवड केली आहे. पाणी देण्याच्या पद्धतीत बदल करण्यासह जमिनीचा पोत वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. तणनाशकाचा वापर थांबवला आहे. घरची बैलजोडी असल्याने प्रत्येक पंधरवड्याला कुळवणी होते. शेतजमीन भुसभुशीत झाली आहे. शेती उतारावर आहे. हा फायदा समजून सायफनने पाणी देण्याच्या दृष्टीने शेततळे बांधले आहे. त्यात मत्स्यपालन करण्याचे प्रयत्न आहेत

Agrigulture
संत तुकाराम कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

शेणस्लरीचा वापर

दोन बैल, चार गायी, दोन म्हशी व वासरे मिळून सुमारे १२ जनावरे आहेत. त्यांची दररोज स्वच्छता केली जाते. शेणमूत्र साठवण्यासाठी सिमेंटची टाकी व त्याचे दोन भाग केले आहेत. ती उंचावर ठेवली आहे. त्यास तिरका कोन दिला आहे. द्रवरूप पदार्थ दुसऱ्या टाकीत जमा होऊन घनरूप पदार्थ पहिल्या टाकीत राहतात. सायफन पद्धतीने द्रवरूप स्लरी शेताला दिली जाते. सध्या एक एकरच ठिबक आहे. बाकी पाटपाण्याद्वारे स्लरी शेतात पोचवण्यात येते. पूर्वी एकरी २५ ते ३० टन उत्पादन यायचे. आता साडेपाच ते सहा एकरांत २५० टनांपर्यंत उत्पादन पोचल्याचे रोहित यांना समाधान आहे.

Agrigulture
मुरघास तंत्रज्ञानाने सावरला दुग्ध व्यवसाय

छोटेखानी दुग्धव्यवसाय

ऊसशेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. हा पैसा शेतीच्या रोजच्या कामाला येईल हा त्यामागे हेतू आहे. जनावरे घेतल्यानंतर अर्धा एकर शेती चारा म्हणून विकसित केली. सध्या दररोज ३० लिटरपर्यंत दूध संकलन होते. गोकूळ दूध महासंघाला ते पुरवले जाते. दर दहा दिवसांमागे ठरावीक रक्कम हाती येते. शेतीसाठी एक व पूरक व्यवसायासाठी एक असे दोन मजूर कायमस्वरूपी तैनात केले आहेत.

वाढवले उत्पन्नस्त्रोत

हापूस आंब्याची सुमारे २५ झाडे असून ती सुमारे २० वर्षे वयाची आहेत. नैसर्गिक रित्या पिकवून त्यांचे मार्केटिंग सुरू केले आहे. पूर्वी जिथे २० हजार रुपये मिळायचे तिथे या झाडांपासून ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. चिंचेची २० झाडे आहेत. सुमारे एक टन चिंचेची पाव ते अर्धा किलो पॅकिंगमधून मित्र, हितचिंतक व ग्राहकांना विक्री केली आहे. किलोला १६० रुपये दर मिळाला आहे. वर्षाला एकूण १० ते ११ लाख रुपये सर्व प्रयत्नांमधून मिळू लागल्याने रोहित यांची शेतीतील उमेद वाढली आहे. येत्या काळात सुगंधी वनस्पती तसेच अन्य प्रयोगांमधून शेतीत मोठी प्रगती करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

संपर्क- रोहित जोशी- ९३५६७२७५१०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com