
Orange Cultivation : नागपूर जिल्ह्यातील पारशिवणीपासून अवघ्या सात किलोमीटरवर भागेमहारी हे ११४३ लोकसंख्या गाव. गावात ५५ हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड असून, खरिपात कपाशी, तूर, धान, सोयाबीन ही पिके घेतली जातात. पारंपरिक पिकांची उत्पादकता सातत्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी संत्रा लागवडीवर भर दिला आहे.
येथील बंड कुटुंबीयांची १४ एकर शेती आहे. त्यापैकी १ एकरामध्ये संत्रा लागवड आहे. दहा वर्षे जुन्या या बागेतून एकरी ३ ते ४ टन संत्रा फळांचे उत्पादन मिळते. दिवसेंदिवस वातावरण बदलासह फळगळीमुळे संत्रा पिकाची उत्पादकता कमी होत चालली आहे.
त्यामुळे शेतीशी संलग्न इतर पर्यायी उत्पन्नाच्या स्रोतांवर बंड कुटुंबीय शोधात होते. त्यातूनच शेतीमध्ये मजुरांच्या कमतरतेचा प्रश्न भीषण असून, त्यावर यांत्रिकीकरण हाच उपाय आहे.
या अनुषंगाने बंड यांनी २०२१ मध्ये अवजार बँकेची स्थापना केली. त्याअंतर्गत शेतीकामांसाठी भाडेतत्त्वावर अवजारे पुरविण्यास सुरुवात केली.
माणिक बंड यांना अंकुश आणि मंगेश ही दोन मुले. अंकुश बंड हे पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी ठरविले. मंगेश बंड यांच्या पत्नी नेहा यांनी बीएस्सी (कृषी)पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या देखील शेती व अवजार बॅंकेचे व्यवस्थापन सांभाळतात.
अवजार बॅंकेची स्थापना
सुरुवातीला बैलांच्या माध्यमातून शेती कसण्यावर बंड यांचा भर होता. परंतु चाऱ्याची कमतरता आणि जनावरांच्या संगोपनावर होणारा खर्च यामुळे त्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतून अनुदान घेऊन अवजार बॅंकेची स्थापना केली. त्याकरिता ४० टक्के अनुदान मिळाले. साधारण ५ लाख ६५ हजार ८५६ रुपयांच्या अनुदानावर आठ अवजारे मिळाली. याशिवाय काही अवजारांची खरेदी त्यांनी स्वखर्चातून केली.
बीबीएफ तंत्राने सोयाबीन लागवड
आधी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन लागवड केली जात असे. मात्र अवकाळी पाऊस, गारपीट, संततधार पाऊस अशी हवामान स्थितीमुळे उत्पादकता घटलेली. गेल्या तीन वर्षांत एकरी २ क्विंटल इथपर्यंत उत्पादकता घसरली. याच पार्श्वभूमीवर मागील वर्षी खरिपात पहिल्यांदा दीड एकरात बीबीएफद्वारे सोयाबीन पेरणी केली.
या तंत्रामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी सरीतून निघून गेले. शिवाय चराच्या माध्यमातून मातीत ओलावा कायम राहून पिकाला गरजेवेळी पाण्याची उपलब्धता झाली. योग्य व्यवस्थापनातून एकरी ७ ते ८ क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले.
पारंपरिक पद्धतीने लागवडीसाठी २६ ते ३० किलोपर्यंत बियाणे लागायचे. मात्र बीबीएफ पद्धतीने लागवडीसाठी फक्त १८ ते २० किलो बियाणे पुरेसे झाले. त्यामुळे वाढीव उत्पादकतेसह बियाणे बचतीचा उद्देश साधता आल्याचे, बंड सांगतात.
कृषी विभागाने दिले प्रोत्साहन
अतिरिक्त आणि अवेळी होणाऱ्या पावसामुळे या भागात सोयाबीन उत्पादकता प्रभावित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बीबीएफ वापराला प्रोत्साहन दिले. तालुका कृषी अधिकारी डॉ. ए. टी. गच्चे, मंडळ कृषी अधिकारी एस. आर. शेंडे, कृषी पर्यवेक्षक पी. सी. झेलगोंदे, कृषी सहायक ए. व्ही. ढोले, कृषिमित्र सुधीर धुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
करंभाड, सावळी, निंबा, भागेमहारी यांसह इतर गावांमध्ये विशेष कार्यशाळा आयोजित घेण्यात आल्या. याद्वारे ६० एकरांवर बीबीएफ, तर ५० एकरांवर टोकण पद्धतीने लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला. बियाणे बचतीसोबतच उत्पादकता वाढीला हा पर्याय पूरक ठरला. त्यामुळे यंदाच्या हंगामात बीबीएफखालील लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाडेतत्त्वावर अवजारांची उपलब्धता
भागेमहारी गावानजीक बंड कुटुंबीयांची शेतजमीन आहे. तेथे अवजारे ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. याच ठिकाणावरून शेतकऱ्यांना अवजारे भाडेतत्त्वावर दिली जातात.
हंगामात रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर या अवजारांना चांगली मागणी असते. या व्यवसायातून गेल्या हंगामात ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे बंड यांनी सांगितले.
अवजार बॅंकेतील यंत्रे
- ट्रॅक्टर
- बहुउद्देशीय मळणी यंत्र
- रोटाव्हेटर
- कल्टिव्हेटर
- हायड्रोलिक नांगर
- बीबीएफ पेरणी यंत्र
- रिपर
- पावर वीडर
- बेड मेकर
- आंतरमशागत फास (कापूस मशागत)
- धान चिखलणी यंत्र
- व्ही-फास (पऱ्हाटीचे झाड काढणेकामी)
करारावर शेती
स्वतःच्या १४ एकर शेतीसोबतच बंड कुटुंबीय कराराने ३० ते ३५ एकर शेती घेऊन करतात. त्यात ४ ते ५ एकर धान लागवडीत १०० पोती धानाचे उत्पादन मिळाले. सुगंधी प्रकारातील तांदूळ असल्याने त्यास मागणीही अधिक राहते.
एकरी धानाची उत्पादकता २३ ते २५ क्विंटल मिळते. याशिवाय २० एकरांवरील कपाशी लागवडीतून एकरी १९ क्विंटल उत्पादन मिळते. सोयाबीन, कपाशी पिकांत तुरीचे आंतरपीक घेतले जाते. त्यातून तुरीचे एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
संपर्क - अंकुश बंड, ८८५६९४५७३७, मंगेश बंड, ९५५२२४३३३०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.