Vermicompost Production : अल्पभूधारक शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचा आधार

सोलापूर जिल्ह्यातील वाटंबरे (ता. सांगोला) येथील सुरेश पवार यांची अवघी दोन एकर शेती आहे. त्यास गांडूळ खतनिर्मितीच्या पूरक उद्योगाची जोड देत ‘यशराज’ ब्रॅण्ड शेतकऱ्यांत लोकप्रिय केला आहे.
Vermicompost Production
Vermicompost ProductionAgrowon

Success Story : सोलापूर जिल्ह्यात सांगोला-मिरज रस्त्यावर सांगोल्यापासून सुमारे १२ किलोमीटरवर वाटंबरे हे महामार्गावरील बाजारपेठेचे गाव आहे. पूर्वीपासून हा भाग कोरडवाहू किंवा दुष्काळी आहे.

काही अंतरावरून जाणारी माण नदी आणि अलीकडील वर्षातील भाटघर कालव्यामुळे किमान हंगामात पाण्याची उपलब्धता होते. त्यामुळे शेतीची दिशा बऱ्यापैकी बदलली आहे. डाळिंबासाठी हा पट्टा प्रसिद्ध आहे.

गावाच्या उत्तरेला सुरेश पवार यांची वडिलोपार्जित जेमतेम दोन एकर शेती आहे. त्यांच्याकडे पूर्वी डाळिंब (Pomegranate), कापूस (Cotton) अशी शेती होती. वीस वर्षांपूर्वी दहावी झाल्यानंतर सुरेश यांनीही शेतीतच लक्ष घातले. सध्या एक एकर नव्याने लागवड केलेले डाळिंब, पाऊण एकर मका आहे.

मित्रांनी दाखविली दिशा

सन २०१९ मध्ये डाळिंब बागेसाठी पवार यांनी मिरजेहून गांडूळ खत व त्याबरोबर स्वतः हे खत तयार करण्यासाठी प्लॅस्टिक बेड आणला. त्या वर्षी चांगल्या प्रकारे खताची निर्मिती झाली. उत्साह वाढला. मग पुन्हा बेड भरून आणखी खत तयार केले व मित्रांना दिले.

त्या वेळी त्यांनी या व्यवसायाचे महत्त्व व मागणीही समजावून दिली. आर्थिक साह्य करण्यासही ते पुढे आले. त्याच जोरावर सुमारे ९० हजार रुपयांची गुंतवणूक करत पाच बेड तयार केले. उद्योगाचा अनुभव वाढू लागला. गुणवत्ता जपली. विक्रीही चांगली होऊ लागली.

मग विस्तार करण्याचे ठरविले. सन २०२० मध्ये १०, २०२१ मध्ये १५ व गेल्या वर्षी (२०२२) २५ पर्यंत बेड्‍स वाढवले. सुमारे ९० बाय ३२ फूट पत्र्याचे शेड तयार केले. ‘व्हर्मिवॅाश’साठी स्वतंत्र साठवण व्यवस्था करण्यात आली आहे.

Vermicompost Production
Soybean-Cotton Rate In Maharashtra : सोयाबीन, कापसातील किंमतवाढीचे आंतरराष्ट्रीय संकेत

सध्याचा उद्योग

-आजमितीला एकूण प्लॅस्टिक बेड्‍स- २५

-खत निर्मितीत सुरुवातीला बेडमध्ये १५०० किलो शेणखत भरून घेण्यात येते.

-त्यानंतर सलग चार दिवस दररोज १०० लिटरपर्यंत पाणी शिंपडले जाते.

-चौथ्या दिवशी प्रति बेडमध्ये पाच किलो प्रमाणात गांडूळ कल्चर सोडले जाते.

आयसेनिया फेटिडा ही त्याची प्रजात आहे.

-त्यानंतर बेड बारदानाने झाकून घेतला जातो.

-पुढील दहा दिवस दररोज ५० लिटर व त्यापुढील दहा दिवस दररोज २० लिटर पाणी शिंपडले जाते.

-त्यानंतर खत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

-संकलित केलेले व्हर्मिवॅाशदेखील सातत्याने बेडवर टाकण्याची प्रक्रिया केली जाते.

-अशा प्रकारे अडीच महिन्यांत चहा पावडरीसारखे रवाळ, काळसर रंगाचे भुसभुशीत खत तयार होते.

-त्यानंतर पाणी शिंपडणे थांबवले जाते. तयार झालेले खत हलवून घेतले जाते.

-प्रति बेडची खत तयार करण्याची क्षमता एक टन. त्यातून प्रति अडीच महिन्यांच्या बॅचमध्ये

एकूण २५ टन गांडूळ खत तयार होते. वर्षातून चार ते पाच बॅचेस निघतात. त्यातून १०० ते १२० टनांपर्यंत खत निर्मिती होते.

-त्यानंतर ४० किलो गोणीमध्ये पॅकिंग केले जाते.

मिळाले ‘मार्केट’

गांडूळ खत आणि व्हर्मिवॅाशच्या मार्केटिंगसाठी ‘यशराज’ नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. खताची ११ हजार रुपये प्रति टन दराने विक्री होते. सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस या स्थानिक भागासह सांगली, सातारा जिल्हा तसेच सटाणा (नाशिक) भागातूनही खताला चांगली मागणी आहे.

द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला पिकांसाठी विशेष मागणी असून, सध्या अनेक शेतकऱ्यांना ‘वेटिंग’वरच राहावे लागत असल्याचे पवार सांगतात. खत बांधावर पोचवण्यासाठी छोटे वाहनही घेतलं आहे.

स्वतःच्या शेतीतही वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता वाढवली आहे. डाळिंबाचे एकरी सात ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते.

फायदेशीर अर्थकारण

अर्थकारणाचा विचार केल्यास प्रति बेडसाठी तीन हजार रुपयांचे शेणखत, १२५० रुपयांचे गांडूळ कल्चर आणि मजुरी १८०० रुपये याप्रमाणे प्रति बेड ६०५० रुपये खर्च येतो. या हिशेबाने एकूण २५ बेड्‍समागे दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.

अशा वर्षातून चार ते पाच बॅचेसमधून चांगल्या प्रकारे उत्पन्न हाती येते. व्हर्मिवॉश व्यतिरिक्त गांडूळ कल्चरचीही प्रति किलो २५० रुपये दराने विक्री होते.

Vermicompost Production
Vermicompost Production : बचत गटाने उभारला गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प

व्हर्मिवॅाशची गुणवत्ता

प्रत्येक बेडच्या बाजूला पाइप बसवला असून, सर्व बेडसमधील व्हर्मिवॉश एके ठिकाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अडीच महिन्यांच्या प्रत्येक बॅचमधून सुमारे २५० लिटरपर्यंत व्हर्मिवॅाश उपलब्ध होते.

शंभर रुपये प्रति लिटर त्याचा दर आहे. पवार सांगतात की गांडूळ खत तयार होण्याच्या प्रक्रियेत व्हर्मिवॉश सातत्याने बेडवर टाकण्याची प्रक्रिया सुरू असते. पण त्याची विक्री मात्र पक्के गांडूळ खत तयार झाल्यानंतरच होते. त्यामुळे गुणवत्ता चांगली मिळते.

संपर्क : सुरेश पवार, ८२०८२२९०४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com