Sapodila Farming
Sapodila FarmingAgrowon

उमरखेड भागात सुनियोजित जोपासली चिकूची बाग

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड येथील कृषी पदवीधर असलेले आनंद गोविंदवार यांनी वीस वर्षांपासून चिकूची बाग जोपासली आहे. त्याचा गोडवा उत्पन्नाच्या रूपाने त्यांना मिळत आहे. व्यावसायिक पीक पद्धतीचा विचार करून जोडीला घेतलेले आंबा फळपीकही चांगले उत्पन्न देत आहे. दुग्ध आणि रेशीम या पूरक व्यवसायांतूनही त्यांनी आर्थिक स्रोत भक्‍कम केले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शिवारात आनंद गोविंदवार कुटुंबीयांची ८० एकर शेती आहे.
बारमाही पिकांत ऊस (Sugarcane), हळद (Turmeric), हंगामी सोयाबीन (Seasonal Soybean), कापूस, तूर, हरभरा अशी पीक पद्धती आहे. अर्थात, व्यावसायिक पीक पद्धतीचा विचार करून फळबाग विकासाला (Orchard) अधिक प्राधान्य दिले. त्यात चिकूची (Sapodila) निवड केली. खरे तर हे पीक डहाणू, पालघर या भागांत अधिक पाहण्यास मिळते. पण विदर्भात काळ्या मातीत हे पीक यशस्वी करण्याचे गोविंदवार यांनी ठरवले. येथे पाऊसही ९०० मिलिमीटरपर्यंत होतो.

चिकूबागेचे व्यवस्थापन

-सुमारे दहा एकरांवर कालीपत्ती चिकूची लागवड आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठातून २००१ मध्ये ५० रुपये प्रति रोप याप्रमाणे रोपे घेतली आहेत. दहा बाय दहा मीटर अशी लागवड आहे. दरवर्षी ७० किलो प्रति झाड याप्रमाणे शेणखत देण्यात येते. खताचे चांगल्या प्रकारे विघटन करण्यासाठी जिवाणू कल्चरचा वापर होतो. शिफारशीच्या ५० टक्‍के कमी प्रमाणात रासायनिक खताची मात्रा दिली जाते. झाडाचा पाला व पीक अवशेषांचा अधिक वापर होतो.

-लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळ मिळण्यास सुरुवात होते. सुरुवातीची तीन वर्षे आंतरपीक घेणे शक्‍य असल्याचे गोविंदवार सांगतात. मात्र खरिपात तुरीची ओळ बागेत घेण्यात सातत्य आहे.

-झाडाची छाटणी वा अतिरिक्‍त फुटवे काढण्याचे काम मेमध्ये होते. वादळीवारा, पावसात फळांचे नुकसान होण्यासोबतच झाड कोलमडण्याचीही भिती राहते. त्यामुळे झाडाची अतिरिक्त उंची वाढविण्याऐवजी कॅनॉपी विस्तारावर भर दिला आहे. जमिनीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचली पाहिजेत असा प्रयत्न असतो. त्यासाठी झाडाची पाने तशा प्रकारे छाटावी लागतात. त्याद्वारे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो.

-एक सप्टेंबरच्या दरम्यान फूलधारणा होते. डिसेंबरमध्ये फळे लिंबाएवढी होतात. मार्चमध्ये ती तोडणीस येतात. एप्रिलपर्यंत प्लॉट सुरू राहतो. सुरुवातीच्या काही वर्षांत दोन बहर घेण्याकडे कल होता. मात्र फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी आता एकच बहर घेण्यात येतो.

...असे होते ‘मार्केटिंग’
हेक्टरी १०० झाडे आहेत. वीस वर्षांचे प्रति झाड २०० ते २५० किलो उत्पादन देते.
पूर्वी स्थानिक स्तरावर व्यापाऱ्यांना विक्री व्हायची. पण दर किलोला २७ ते ३० रुपये किलो मिळायचा. तीन वर्षांपासून औरंगाबाद येथील मॉलला चिकूचा पुरवठा होतो. त्याला ५५ ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे गोविंदवार सांगतात.

आंबाही देतोय समाधानी उत्पन्न

चिकूच्या जोडीला दोन हेक्‍टरवर २००५ मध्ये आमराई फुलविली आहे. बहुतांशी केशर व काही प्रमाणात दशेरी आणि लंगडा आहे. व्यापाऱ्यांना थेट बाग दिली जाते. पाच बाय पाच मीटर याप्रमाणे सघन पद्धतीची लागवड आहे. एकरी सरासरी एक लाख रुपये उत्पन्न दरवर्षी मिळते. मे महिन्यात बागेची छाटणी करावी लागते. उलट्या छत्रीप्रमाणे बागेचे ‘कॅनॉपी मॅनेजमेंट’ करावे लागते. पावसाळा संपल्यानंतरच्या काळात झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावण्यात येते. सर्व क्षेत्रामधून १० टनांपर्यंत उत्पादन मिळू लागल्याचे गोविंदवार सांगतात. स्थानिक स्तरावर किलोला ४० रुपये दराने विक्री होते.

सिंचन व्यवस्थापन

शेताला काही ठिकाणी उतार असल्याने कंटूर पद्धतीचा वापर केला आहे. चर खोदले असून एका तलावात पाणी संकलित केले जाते. खालील बाजूस विहीर घेतली आहे. तलावातील पाण्याचा उपसा करून पॉलिमल्चिंग असलेल्या शेततळ्यात ते साठविले जाते. सन २००३ मध्येच ठिबक सिंचनाचा पर्याय अवलंबिण्यात आला. सन २०१७-१८ मध्ये ‘ऑटोमेशन’ यंत्रणा बसविली.

ऊस व हळद लागवड

विदर्भात पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ऊसशेती कमीच आहे. पण गोविंदवार यांनी १६ एकरांवर ऊस घेतला आहे. शेतीचे सुमारे ८० एकर एकूण क्षेत्र आहे. सोबत दोन पूरक व्यवसायदेखील आहेत. अशा परिस्थितीत उसाची निवड फायदेशीर ठरल्याचे गोविंदवार सांगतात. एकरी सरासरी ६० टन उत्पादन मिळते. नॅचरल शुगर, हादगाव तसेच मांगूळ अशा तीन साखर कारखान्यांना विक्री होते. चार एकरावंर हळद लागवड करून नगदी पिकांचा आदर्शही जोपासला आहे. सेलम जातीच्या हळदीचे एकरी २५ ते २७ क्‍विंटल उत्पादन होते. वसमत (हिंगोली) येथे विक्री होते.

पूरक व्यवसायांचा मोठा आधार

गोविंदवार बहुतांशी शेती एकहाती पाहतात. मोठे क्षेत्र सांभाळताना पूरक व्यवसाय करणे म्हणजे कसरतीचे असते. मात्र गोविंदवार यांनी अशा स्थितीतही दूग्ध व रेशीम व्यवसायात जम बसविला आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यात सातत्य आहे. नागपुरी, सुरती, मुऱ्हा व पंढरपुरी आदी वीस म्हशी आहेत. प्रति म्हशीपासून सरासरी पाच लिटर दूध मिळते. खासगी डेअरीला पुरवठा होतो. रेशीम शेतीत वर्षाला चार बॅचेस घेण्यात येतात. दीड एकरांत सघन पद्धतीची तुतीची लागवड केली आहे. सुमारे तीनशे अंडीपुंजांना लागणारा पाला त्यातून मिळवण्याचा प्रयत्न असतो. एकूण २१० ते २४० किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते. रामनगर- कर्नाटक येथे विक्री होते.

संपर्क ः आनंद गोविंदवार, ९४२३६५३९९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com