
Success Story : कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पूरक उद्योगाचे स्रोत महत्त्वाचे ठरले आहेत. त्या अनुषंगाने परभणी तालुक्यातील माळसोन्ना गाव लाल कंधारी गोवंश संवर्धनासाठी प्रसिद्ध झाले आहे.
शेतीकामासाठी लाल कंधारी बैलजोडी अत्यंत उपयोगी ठरते. काही शेतकऱ्यांनी देवणी गोवंशाचेही संगोपन केले आहे.
लाड यांची गोवंश संवर्धनात ओळख
गावातील अनंत लाड तब्बल वीस वर्षांहून अधिक काळ लाल कंधारी गोवंशाचे संवर्धन करीत असून, त्यामध्ये राज्यभर ओळख तयार केली आहे. भारतीय किसान संघाचे संघटक व काका दादा लाड यांच्याकडून त्यांना या पशुधनाची प्रेरणा मिळाली. अनंत यांची सात एकर जमीन आहे. त्यात हंगामी पिके ते घेतात. पत्नी सुमन आणि तीन उच्चशिक्षित मुलगे असे त्यांचे कुटुंब आहे.
या सर्वांची मदत अनंत यांना होते. चुलत बंधू बळिराम हाच व्यवसाय करतात. सन २००३ मध्ये अनंत यांनी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव (ता. लोहा) येथील प्रसिद्ध यात्रेतील पशुप्रदर्शनात कुणका (जि. लातूर) येथील शेतकऱ्याकडील जातिवंत तीन वर्षे वयाची लाल कंधारी गाय २७ हजार रुपयांस खरेदी केली. लोहा येथील जनावरे बाजारातून त्याच जातीचा प्रजननक्षम वळू ४१ हजार रुपयांस खरेदी केला.
...असे होते गोवंशाचे संगोपन
-सध्या ११ जनावरे. त्यात गायी-वासरांसह दोन लाल कंधारी व एक देवणी वळू.
-गावाजवळील शेतातच ५० बाय ३० फूट आकाराचा पत्र्याचे छत असलेला निवारा. शेजारील मोकळ्या जागेत जनावरे बांधण्यासाठी व चारा साठवणुकीसाठी जागा.
-पाण्याचा हौद बांधून बोअर, पाइपलाइनद्वारे पाणी व्यवस्था.
-प्रति गाय दिवसाला सहा ते आठ लिटर दूध देते. मात्र दुधाची विक्री हा व्यावसायिक हेतू न ठेवता दूध वासरांना देण्यावर भर.
-कालवडींची विक्री न करता जातिवंत वंशवृद्धीसाठी त्यांचे संगोपन.
-ज्वारीचा कडबा, सोयाबीनचे कुटार, भुईमुगाचा पाला, शेंगदाणा, सरकी पेंड, मका, गजराज गवत, कडवळ आदीं प्रकारे आहार व्यवस्थापन. ज्वारी, मका, भुईमुगाची लागवड.
जातिवंत वळूद्वारे नैसर्गिक रेतन
अनंत यांनी पशुपालकांची गरज व मागणी लक्षात घेऊन लाल कंधारी वळूचा नैसर्गिक रेतनासाठी वापर सुरू केला आहे. वळू १८ महिने वयाचा झाला की रेतनासाठी वापर होतो. त्यातून माळसोन्ना परिसरातील २० ते २५ गावांमध्ये लाल कंधारी गोवंशाचा प्रसार झाला आहे.
परभणी, लातूर, नांदेड, वाशीम आदी जिल्ह्यांतील शेतकरी गायी लाड यांच्याकडे शेतावर नैसर्गिक रेतनासाठी घेऊन येतात. प्रति गाय ४०० रुपये शुल्क आकारले जाते. सुरुवातीला वर्षभरात ४०० ते ५०० पर्यंत येणाऱ्या गायींची संख्या आता ७०० पर्यंत पोहोचली आहे.
शेतकऱ्यांचे नाव, संपर्क, गायीचा वंश, रंग, रेतनाची तारीख, वेळ आदी तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. २१ दिवसांच्या आत रेतन अयशस्वी झाल्यास पुन्हा मोफत रेतन करून देण्यात येते. परंतु असे प्रमाण अत्यंत कमी आहे. एका प्रजननक्षम वळूचा दोन वर्षांच्या कालावधीसाठी वापर होतो.
त्यानंतर घरातील किंवा नवा जातिवंत वळू खरेदी करण्यात येतो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन यंदापासून देवणी वळू उपलब्ध केला आहे. रेतनाचे ५०० रुपये शुल्क घेण्यात येते.
व्यवसायातून आर्थिक बाजू भक्कम
शेतीकामाला सरस असल्याने लाल कंधारी बैलांना मागणी असते. आजवर २५ वळूंची विक्री केली आहे. आज वळूची किंमत एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. रेतन व्यवसायातून वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
या व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे. गावात सिमेंट काँक्रीटचे पक्के घर बांधले आहे. येत्या काळात गोठ्याचे आधुनिकीकरण होणार आहे.
पशुप्रदर्शनांमध्ये सन्मान
अनेक पशू प्रदर्शनांमधील स्पर्धांमध्ये लाड यांच्या पशुधनाने बाजी मारली आहे. यंदा मार्चमध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे शिर्डी येथे आयोजित महापशुधन एक्सोमध्ये लाल कंधारी (नर) वासरू प्रवर्गात प्रथम (चॅम्पियन) व रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. लातूर आणि कण्हेरी मठ (जि. कोल्हापूर) येथे लाल कंधारी कालवडीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, माळसोन्ना येथील पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. रूपेश कलाल, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. नितीन मार्कंडेय, पशुधन विकास अधिकारी डॉ. रणजित लाड, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. श्रीनिवास कारले यांचे मार्गदर्शन मिळते.
नागपूर येथील ‘माफसू’ विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी लाड यांच्या पशुधनाची प्रत्यक्ष भेटीतून पाहणी केली आहे.
‘ॲग्रोवन’मधील यशकथेतून प्रतिसाद
सन २०१८ मध्ये माळसोन्ना गावाची यशकथा ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यातील पशुपालक पशुधन अभ्यासण्यासह नैसर्गिक रेतनासाठी गावात गायी घेऊन येतात. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी लाड यांच्याकडून लाल कंधारी गाय आणि गोऱ्हा खरेदी केला आहे.
संपर्क - अनंत लाड, ९७६४९९०४४९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.