
Silk Farming Update : पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथील शशिकांत पाटील यांच्यासोबत आशाबाईंचे लग्न झाले. सासरी संयुक्त कुटुंबाची ५० एकर शेती. मात्र विभक्त झाल्यानंतर २५ एकर शेती वाट्याला आली. पती शशिकांत यांनी औषधनिर्माण शाखेत पदविका घेतली. पण शेतीत रमले. केळी, कापूस व हंगामी पिकांची लागवड केली.
सर्व काही सुरळीत चालू असतानाच २००३ मध्ये शशिकांत यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे शेतीची संपूर्ण जबाबदारी आशाबाईंच्या खांद्यावर आली. केळी बागेसह हंगामी पिकांची शशिकांत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन केले.
एकट्याने लिंबाच्या शेतात एका दिवसात ५० गोण्या लिंबू तोडायच्या. वेळप्रसंगी पोती उचलण्यासह इतर श्रमाची कामेही केली. उतार वयातही त्यांनी शेतीतून निवृत्ती घेतली नाही. उलट रेशीमशेतीचा नवा आधार शेतीला दिला आहे.
पतीवर आघात, पण सावरल्या...
शशिकांत यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी पूर्णवेळ आराम व काळजी घेण्याचा सल्ला दिला. याचा कुटुंबावर मोठा आघात झाला. मुलगा जयंत व मुलगी प्रणाली यांच्यावर कमी वयात शेतीची जबाबदारी टाकणे शक्य नव्हते.
अशातच शेतीची संपूर्ण जबाबदारी आशाबाईंनी खांद्यावर घेत समर्थपणे पेलली. केळी पीक व्यवस्थापनात त्या काळात बदलाचे वारे होते. ठिबक, नवे वाण यांचा स्वीकार केला.
कुटुंबाचा आधार बनल्या
केळी बागेतून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत २१ पर्यंतची केळीची रास कायम टिकवून ठेवली. शशिकांत यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. शेतावर येऊन ते शेतीकामांमध्ये मार्गदर्शन करू लागले.
मुलगा जयंत कृषी शाखेत पदवी घेऊन राष्ट्रीयीकृत बँकेत रुजू झाले. मुलगी प्रणाली हिने विज्ञान शाखेतून पदवी घेतली. आशाबाई यांनी आपल्या कुटुंबाला आकार देत शेतीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
उत्पन्नाचे गणितही पक्के
रेशीम शेतीतून महिन्याला ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो आहे. मागील दोन वर्षे केळीला सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. केळीखालील कमाल क्षेत्र उतिसंवर्धित रोपांखाली आणले आहे. शेतीसाठी एक ट्रॅक्टर, एक बैलजोडी आहे. आवश्यकतेनुसार अवजड कामांसह मशागत, वाहतूक व इतर शेती कामांसाठी मजुरांची मदत घेतात.
तरुणांना लाजवेल असा उत्साह...
आशाबाई यांचे वय आता ६५ वर्षे एवढे आहे. पण तरुण-तरुणींना लाजवेल, अशी कामे त्या शेतात आजही करतात. पहाटे साडेचारला त्यांचा दिवस सुरू होतो. अलीकडेच शेतीला रेशीम शेतीची जोड दिली आहे. त्यासाठी ७२ फूट बाय ३६ फूट आकाराचे रेशीम संगोपनगृह उभारले आहे.
त्यातून १ क्विंटलपर्यंत रेशीम उत्पादन मिळते. रेशीम शेतीसंबंधी त्यांनी जामनेर, जळगाव व इतर भागांत शेतकऱ्यांसोबत संपर्कात असतात. रेशीम शेतीत आशाबाईंनी स्वतःला गुंतवून घेतले आहे. रेशीम कीटकांना तुतीचा दर्जेदार पाला व इतर व्यवस्थापनाची कामे नियमित करतात.
संपर्क - आशाबाई पाटील ७५८८१९३४१७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.