मधमाशीपालनात तयार केला ब्रॅण्ड...

Honey Bee-नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय असावा या उद्देशातून मार्कंडा (ता. दर्यापूर, अमरावती) येथील योगिता प्रभाकर इंगळे यांनी मधमाशीपालनाची निवड केली. आज या व्यवसायात त्यांनी स्वतंत्र ओळख तयार केली आहे. सध्या त्यांच्याकडे १२० वसाहती आहेत. मधाच्या विक्रीसाठी त्यांनी ‘गॉर्जेस' हा ब्रॅण्ड विकसित केला आहे.
मधमाशीपालनात तयार केला ब्रॅण्ड...
Yogita Ingale With Honey BeeAgrowon

योगिता इंगळे यांचे वडील प्रभाकर हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांची मार्कंडा गावाजवळील शिंगणापूर शिवारात तीन एकर शेती आहे. सिंचनाची सोय नसल्याने कोरडवाहू पीकपद्धतीवर त्यांची भिस्त होती. योगिता यांचा भाऊ योगेश हा सध्या शेतीचे व्यवस्थापन करतो.

घरच्या शेतीसोबतच दरवर्षी सात एकर करारावर शेती करण्यावरही त्याने भर दिला आहे. शेतीमध्ये सोयाबीन, तूर, हरभरा लागवड असते. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बळावर वर्षभरात लागणाऱ्या पैशाची सोय करणे शक्‍य होते.

प्रशिक्षणातून मिळाले बळ

नोकरीच्या मागे न लागता योगिता इंगळे यांनी कृषी उद्योजक होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी मधमाशीपालनाकडे जाण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता पूरक माहिती कोठे मिळते याचा शोध सुरू केला. खादी ग्रामोद्योग मंडळातून मधमाशीपालनाची माहिती मिळाली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

२०१८ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने नागपूर येथे मधमाशीपालनाबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये योगिता यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर २०२० मध्ये महाबळेश्‍वर येथे वीसदिवसीय प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या व्यवसायाशी निगडित बारकाव्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी मधमाशीपालनात उतरण्याचा निर्णय घेतला.

मधमाशीपालनाला सुरुवात

योगिता इंगळे यांनी सुरवातीला २० वसाहतींपासून सुरुवात केली. २५ टक्‍के अनुदानावर त्यांना मधमाशीच्या वसाहती मिळाल्या. त्या वेळी मधाची उत्पादकता जेमतेम होती. इतक्‍या कमी वसाहतीचे स्थलांतरण शक्‍य नसल्याने स्थानिकस्तरावर मधमाश्‍यांना मध मिळत नव्हते. परिणामी त्यांनी वसाहतींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.

दीड वर्षात त्यांनी वसाहतींची संख्या वीसवरून ७७ पर्यंत नेली. त्यानंतर पुन्हा ५० वसाहतींची भर पडली. अशाप्रकारे त्यांनी मधपेट्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला. पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये वसाहतींचे स्थलांतरण केले जाते. सध्या त्यांच्याकडे १२० वसाहती आहेत. हिमाचलमधील ऊना जिल्ह्यातील कढीपत्त्याच्या फुलांवरील मध संकलन करण्यासाठी १२० पेट्या ठेवलेल्या आहेत.

मधपाळाची घेतली मदत

मधमाशीपालनाच्या बरोबरीने त्यांनी अमरावती येथे ब्युटीपार्लरही उघडले. त्यामुळे दोन्ही व्यवसाय सांभाळताना त्यांना काहीशा मर्यादा आल्या. परिणामी मधपालन व्यवसायात मदत मिळावी याकरिता त्यांनी मधमापाळांचा शोध सुरू केला. कारण हंगामात मधमाश्‍यांच्या वसाहसातींचे स्थलांतर करावे लागते. उमरखेड (नागपूर) परिसरात विद्याधर अहिरे हे जळगाव जिल्ह्यातील मधपाळ वसाहती घेऊन आल्याचे त्यांना कळाले. त्या वेळी त्यांनी त्यांची भेट घेत आपल्या वसाहतींचे व्यवस्थापन करण्याची विनंती केली. त्यानंतर देशभरात अहिरे यांच्याद्वारे योगिता इंगळे यांच्या मालकीच्या मधमाशींच्या वसाहतींचे स्थलांतर केले जाते. त्यापोटी काही शुल्कही ते आकारतात.

परागीकरणासाठी पेट्या भाडेतत्त्वावर

योगिता इंगळे या परागीकरणासाठी पेट्या भाडेतत्त्वावर देतात. त्याकरिता महिन्याला सरासरी एक हजार रुपयांचा दर आकारला जातो. एका हंगामात २० ते २५ पेट्या भाडेतत्त्वावर दिल्या जातात. जानेवारी ते मार्च या कालावधीत कलिंगड उत्पादकांकडून परागीकरणासाठी वसाहतींची मागणी राहते. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत कांदा बीजोत्पादकाकडून देखील मागणी असते. त्यामुळे येत्या काळात वसाहतींना भाडेतत्त्वावर घेण्याच्या मागणीत वाढ होईल यातून अतिरिक्‍त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाल्याचे योगिता यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात शेवगा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. शेवगा लागवड असणाऱ्या शेतकऱ्यांकडून देखील परागीकरणासाठी मधमाशांच्या पेट्यांची मागणी आहे. परागीकरणाच्या माध्यमातून कांदा पिकात ७० टक्‍के उत्पादन वाढ आणि बाकी पिकात २५ ते ३५ टक्‍के वाढ होते, असे योगिता सांगतात.

यामुळे फूलगळ थांबून फळ सेट होण्यासही मदत होते. डाळिंब उत्पादकपट्ट्यात देखील पाळीव मधमाश्‍याना मागणी वाढली आहे. वृक्षतोड, चुकीच्या पद्धतीने मध काढण्याच्या प्रक्रियेमुळे जंगलातील मधमाश्‍यांच्या वसाहतीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. परागीकरणाच्या टप्प्यातील हा महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम होतो. परिणामी, आता पाळीव मधमाशीपालकांकडील वसाहतींना मागणी वाढती आहे.

मोहरी, ओवा, कढीपत्ता, सूर्यफूल या पिकातून एक वसाहतीच्या माध्यमातून ३० ते ४० किलो मध उत्पादन होऊ शकते. त्याकरिता सुनियोजित व्यवस्थापन करावे लागते. मधमाशी पेट्यांचे स्थलांतर योग्य पद्धतीने करणे, फुलोऱ्याचा शोध घेणे अशा बाबींचा समावेश राहतो. पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू या भागांत वसाहती स्थलांतरित केल्या जातात. वर्षाला सहा राज्यांत मधपेट्यांचे स्थलांतरण करावे लागते.

विविध प्रकारचे मध उत्पादनासाठी हे स्थलांतरण गरजेचे राहते. वसाहतीच्या वाहतुकीवर वर्षभरात एक ते दीड लाख रुपयांचा खर्च होतो. वसाहतीच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या कुशल मजुराला १२ हजार रुपये लागतात, तर उर्वरित अकुशल मजुरांना सहा हजार रुपये दिले जातात. अकुशल मजुरांची संख्या तीनपर्यंत राहते. जेवण आणि राहण्याचा खर्च मधपाळाकडूनच होते.

मधाचा‘गॉर्जेस हनी’ ब्रॅण्ड

योगिता यांनी मध विक्रीसाठी ‘गॉर्जेस हनी’ या नावाने ब्रॅण्ड विकसित केला आहे. दर महिन्याला ५० किलोची विक्री या माध्यमातून होते. अर्धा आणि एक किलोच्या बाटलीमध्ये मधाची विक्री होते. ५०० रुपये मोहरी, ६०० रुपये ओवा, वाइल्ड फॉरेस्ट ७०० रुपये, तुळशी मध ७०० रुपये आणि जांभूळ मध १००० रुपये किलो या दराने विकला जातो. निर्यातदार किंवा काही खासगी कंपन्यांना घाऊक दराने शिल्लक मधाची विक्री होते. वर्षाला चारशे किलो मधाची विक्री होते.

मेणालाही मागणी

मधमाशीपालनादरम्यान पेटीत तयार होणाऱ्या मेणाला देखील चांगली मागणी आहे. हे मेण १७० ते २०० रुपये किलो या दराने विकले जाते. काही मधपाळ मेणापासून मेणपत्रे तयार करून घेतात. ३५० ते ४०० रुपये किलो प्रमाणे ते बनवून मिळतात. यासाठी शुद्ध मेण दिले जाते. मेणपत्र्यावरच मधमाश्‍या सहजपणे आपली वसाहत तयार करतात. तीन ते चार वर्षांत मेण काळे पडते, त्यानंतर वसाहतीमधील हे मेणपत्रे बदलावे लागतात, असे योगिता सांगतात.

संपर्क ः योगिता इंगळे, ९७६६२३३३६५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com