स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक जाहले दाटेगाव

दाटेगाव (ता. जि. हिंगोली) गावातील ग्रामस्थांनी सुधारणा घडवण्याची इच्छाशक्ती, लोकसहभागातून विविध उपक्रम यशस्वी राबवले. वनराईच्या संवर्धनातून गाव हिरवाईने नटले. आज पर्यावरण संतुलित, स्वच्छ सुंदर, स्मार्ट गावाची संकल्पना गाटेगावात प्रत्यक्षात अवतरली आहे.
स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक जाहले दाटेगाव
Eco Friendly DategaonAgrowon

हिंगोली जिल्हा ठिकाण शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवर असलेल्या दाटेगावात पूर्वी अनेक समस्या होत्या. तत्कालीन गट विकास अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी भेट दिली. त्या वेळी गावपरिसरात अस्वच्छता दिसून आली. गावाने स्वच्छताविषयक उपक्रम राबवून बदल घडवून आणावा. त्यानंतर ग्रामस्थांकडून सत्कार स्वीकारू अशी अट त्यांनी घातली. या आवाहनाला ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त ग्राम समितीचे पदाधिकारी, युवक, महिला यांनी प्रतिसाद देत लोकसहभागातून गावाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला.

...आणि गावाने बदलायचे ठरवले

ग्रामसभेचे आयोजन झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गांव पाटोदा येथे आयोजित अभ्यास सहलीत १६५ ग्रामस्थ स्वखर्चाने सहभागी झाले. पाटोदाचे सरपंच भास्करारव पेरे पाटील यांचा मार्गदर्शन कार्यक्रम गावात आयोजित करण्यात आला. तब्बल १९ लाख रुपये वर्गणी संकलित झाली. दोन वर्षांपूर्वी जेमतेम १० ते १५ टक्के कुटुंबांकडे स्वच्छतागृहे होती. ग्रामसभेतील निर्णयाला प्रतिसाद देत सर्व कुटुंबांनी स्वच्छतागृहांची बांधकामे केली. गाव आता हगणदारीमुक्त झाले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. ग्रामविकास, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य त्यासाठी मिळते. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता होते. गावाने अशा रीतीने केलेल्या सुधारणांनंतर वर्षभराने धनवंतकुमार माळी पुन्हा दाटेगावला आले आणि त्यांनी ग्रामस्थांकडून सत्कार स्वीकारला.

लोकसंख्येच्या पाचपट वृक्ष लागवड

गावाची लोकसंख्या एकहजार ५७३ पर्यंत आहे. लोकसंख्येच्या पाच पट म्हणजेच ९ हजार ५०३ वृक्षांची लागवड लग्न, वाढदिवस, अंत्यविधी प्रसंगी केली आहे. गावात प्रवेश करणारे रस्ते, घरांसमोर, ग्रामपंचायत कार्यालय, शाळेच्या परिसरात शोभीवंत, औषधी, फळझाडे आदींची लागवड झाली. झाडांना ठिबक सिंचन केले आहे. झाडांना पाणी देण्यासह देखभालीसाठी गावातील गरजू कुटुंबातील १८ मजूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (बिहार पॅटर्न) रोजंदारीवर तैनात केले आहेत.

ठळक बाबी

१) ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. ग्रामस्थांनी दूरचित्रवाणी संच, फर्निचर व अन्य साहित्य भेट दिले आहे. विविध १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. कार्यालयातून त्यावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. सर्व प्रकारचे दाखले देण्यासाठी आपले सरकार केंद्राची सुविधा आहे.

२) घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांचा भरणा ग्रामस्थ ऑनलाइन पद्धतीने करतात. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात क्यूआर कोड लावला आहे. नियमित भरणा असल्याने देखभाल दुरुस्तीची कामांसाठी निधी

उपलब्ध होतो.

३) सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या घराबाहेर नांदेड पॅटर्ननुसार शोषखड्डे घेतले आहेत. त्यामुळे गाव गटारमुक्त होऊन डास व आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. प्लॅस्टिक बंदी आहे. घंटागाडी ग्रामस्थांनी भेट दिली आहेत. दररोज सकाळी त्यामार्फत ओला व सुका कचरा वेगळा करून गावाबाहेर कंपोष्ट खत तयार केले जाते. त्यामुळे गाव उकिरडामुक्त झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे.

४) ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंद रजिस्टर (नमुना क्र. आठ) मध्ये घरांच्या मालकीचा हक्क पुरुषांसोबत महिला सदस्यांनाही देण्यात आला आहे. घराच्या दर्शनी भागावर पुरुष, स्त्रीचे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण गावातील घरांना एक गाव -एक रंग या उपक्रमांतर्गत पिवळा रंग दिला आहे.

५) लोकवर्गणीतून गावातील संपूर्ण ४० विद्युत खांबांवर एलईडी पथदिवे लावले आहेत. त्यातून विजेची बचत होत आहे. संपूर्ण कुटुंबांकडे नळ जोडणी केली आहे. जिल्हा परिषदेची पाचव्या इयत्तेपर्यंत शाळा आहे. शाळेभोवती संरक्षण भिंत व वृक्ष लागवड आहे. गावाच्या पाणीपुरवठा योजनेची टाकी शाळेच्या परिसरात आहे. अवकाश निरीक्षणासाठी दुर्बीण ग्रामस्थांनी भेट दिली आहे. मैदानावर खुली व्यायामशाळा तयार केली आहे. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त युवक मंडळातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन होते. संपूर्ण गावाचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.

५) स्मशानभूमीचा स्वच्छ, सुंदर परिसर

गावात दोन स्मशानभूमी शेजारी आहेत. स्वच्छ सुंदर स्मशानभूमीची संकल्पना साकारली आहे. स्मशानभूमीभोवती संरक्षण भिंती, पाण्याची टाकी, अंत्यविधीसाठी निवारे, बाकांची व्यवस्था आहे. परिसरात शोभिवंत झाडे, सीताफळ, आंबा, आवळा, जांभूळ, पेरू, संत्रा, केळी, चंदन, बेल, करवंद आदींची नियोजनबद्ध लागवड व संवर्धन होत आहे. फळझाडांतील मोकळ्या जागेत विविध भाजीपाला लागवड केली आहे.

शेती व पूरक व्यवसाय

 • -गावशिवारात हलकी ते मध्यम जमीन. तीन वर्षांपूर्वी माती परीक्षण झाले.

 • -हळद हे गावचे पारंपारिक पीक. गादी वाफा, ठिबक सिंचन व सुधारित पद्धतीने अनेक शेतकरी एकरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात.

 • -संत्रा उत्पादक गाव म्हणूनही दाटेगाव प्रसिद्ध. ३२ हेक्टरवर लागवड.

 • -डाळिंब, चिकू, आंबाही आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून अस्तरीकरण असलेली १४ व अन्य १० अशी एकूण २४ शेततळी.

 • -दसरा दिवाळी सणांची मागणी लक्षात घेऊन दरवर्षी ३० ते ४० एकरांत झेंडू.

 • -अनेक शेतकऱ्यांकडे सौर पंप. यांत्रिकीकरणावर भर. त्यामुळे अलीकडील वर्षांत गावातील ट्रॅक्टर संख्या वाढली आहे. हळदीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे. पोकलेन यंत्रे आहेत. भाडेतत्त्वावर अवजारे देण्याचे व्यवसाय केले जातात.

 • -म्हशींची संख्या १०० च्या आसपास. एका डेअरीचे दूध संकलन केंद्र.

 • -निविष्ठा व कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी गावाचा कृषी विकास आराखडा तयार केला आहे.

दृष्टिक्षेपात दाटेगाव

 • एकूण घरे...२३८

 • शाळा- इयत्ता १ ते ५ (जिल्हा परिषद)

 • लागवडीयोग्य क्षेत्र...३७८.३३ हेक्टर

 • जिरायती क्षेत्र- ३००.१३ हे. ओलीत- ७८ हे.

 • -शेततळी- २४

 • टॅक्टर्स- २६

 • दुचाकी...१४७

 • घंटा गाडी...१

 • मंदिर संख्या...२

 • पाणीपुरवठा योजना...१

 • नळजोडण्या...१६२

 • सार्वजनिक विहिरी...२

 • हातपंप..२

 • कृषी केंद्र सेवा केंद्रे...२

पुरस्कार...

महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार... २०११

संत गाडगेबाबा स्वच्छग्राम जिल्हा पुरस्कार.. २०२०-२१

जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार...२०२०-२१

व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रमात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होतात. गावाजवळील माळरानावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
सीताराम माने, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, दाटेगाव ९९७०७०६०२३
दाटेगावने लोकाभिमुख उपक्रम राबवित अन्य गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांचा पुढाकार आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयातून हे शक्य झाले आहे.
विष्णू भोजे विस्तार अधिकारी, पंचायत समिती, हिंगोली
गावात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची चळवळ रुजली. येत्या काळात पावसाच्या पाण्याचे फेरभरण करण्यावर भर आहे.
यू. टी.आडे, ग्रामसेवक ८९८३४००९९९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.