Biodiversity
BiodiversityAgrowon

जैवविविधता नोंदणी पत्रकासाठी माहिती संकलन

मागील लेखांमधून आपण जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकांचे जैवविविधता नोंदणी पत्रकासाठी (पीबीआर) प्रत्यक्ष माहिती संकलनाची पूर्वतयारी आणि त्याचा तपशीलही आपण यापूर्वी पाहिलेला आहे. आजच्या लेखामध्ये प्रत्यक्ष माहितीचे संकलन कसे करावे याबद्दल माहिती घेत आहोत.

माहिती संकलनाचे, विश्‍लेषणाचे कोणतेही काम एखाद्या गटामार्फत होते. त्या गटामध्ये जे सदस्य असतील त्यांना त्याचे संपूर्ण ज्ञान असेल तसेच त्याच श्रेयदेखील मिळायला हवे. गोळा झालेल्या माहितीमध्ये काही त्रुटी चुका नाहीत ना? याचीही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. प्रत्यक्ष माहिती संकलन करताना अभ्यास क्षेत्र, टीम, कालावधी, नकाशा या बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे. माहिती संकलन करणाऱ्यांच्या काय काय भूमिका होत्या? ही माहिती सुरुवातीचा नोंदवली गेली पाहिजे.

गटाची मजबुती ः

१) मागील लेखामध्ये आपण जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पीबीआरची प्रत्यक्ष माहिती संकलन तयार करण्यासाठी टीम तयार करावी असे सांगितले आहे. गटामध्ये, व्यवस्थापन समितीने सदस्य म्हणून कोणाला घ्यावे याची मुभा आहे; तथापि त्याचे योगदान मिळणे गरजेचे राहील. सदस्य म्हणून, स्थानिक विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, उत्साही जाणकार नागरिक, शास्त्रज्ञ इत्यादी हे सर्व असू शकतात. या सर्वांचे नाव व पत्ता, लिंग, फोटो हे डेटाबेसमध्ये असावे.

२) प्रत्येकाने कोणते कोणते काम केले ते योगदान पण त्याच्यामध्ये असावे. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याने रानात पाहणी करून मोहाच्या झाडाची किंवा सरपणाच्या उपलब्धतेचा अंदाज बांधला तर त्याच्या समोर आले पाहिजे, एखादा मासेमारी बद्दलचा जाणकार असेल आणि त्याने त्या क्षेत्रात असलेल्या जलस्रोतात उपलब्ध माशांच्या प्रजातीबद्दल त्याला ज्ञान आहे, तर त्याची नोंद तिथे व्हायला हवी. तसेच एखादा वैदू असेल आणि प्राण्यांवर उपचार करत असताना कोणते घटक वापरतो त्याचीही नोंद होणे गरजेचे आहे.

३) सर्व संसाधनांची नोंद एकत्र झाल्यानंतर त्यांची शास्त्रीय नावे नोंद करण्यासाठी एखादी व्यक्ती असेल, तर त्याच्या समोर त्याच्या कामाची नोंद होणे गरजेचे आहे. थोडक्यात, ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी काम केले त्याची नोंद असणे गरजेचे आहे. जर टीममधील सदस्य बदलला तर नवीन येणाऱ्या सदस्याला पूर्वीची माहिती असणे गरजेचे आहे.

नकाशाचे घटक ः

१) पीबीआरच्या कामाची सुरुवात करताना अभ्यास क्षेत्राचा नकाशा बनवून करण्यापासून सुरुवात करता येऊ शकेल. नकाशाचे एकक सर्वसाधारणपणे स्वतःच्या परिसरातील आपल्या गरजा पुरवायला जरूर असणारे संसाधन ज्या क्षेत्रातून गोळा करतात ते क्षेत्र.

२) माहिती गोळा करताना गट बाहेर निघेल त्या वेळेस त्यांच्या समोर लोकवस्ती आणि त्या वस्तीतील व्यक्ती नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत आणि ती नैसर्गिक संसाधने जिथून गोळा केला जाते तो परिसर, असे समीकरण मांडायला हरकत नाही. तथापि, ग्रामपंचायत हद्दीतील अथवा वस्ती, पाडा हा घटक म्हणून काम सुरू करावे. अगदी कच्चा नकाशा केला तरी चालतो. म्हणजे PRA करताना जशी रांगोळी काढून गाव नकाशा करतो त्यानुसार केला तरी चालेल.

३) वनाधिकार कायद्यानुसार लोकांच्या सामूहिक वनसंपत्तीचे मर्यादा ठरवणे जरुरीचे आहे, या मर्यादेत राखीव जंगले, राखीव जंगले, राष्ट्रीय उद्यानाच भागदेखील सुद्धा समाविष्ट असू शकतो.

४) एक क्षेत्र एकाहून अधिक जास्त गावांच्या येऊ शकेल तेव्हा सहभागी नकाशा बनवावा लागेल. या बाबत सर्वांशी चर्चा करून चर्चा करून साध्या रेखाटने व लोकांमध्ये असलेल्या स्थळ नावे वापरून सुरुवात करता येऊ शकेल.

५) वनाधिकार कायद्याच्या नियमात सामूहिक वनसंपत्ती ठरवण्याचे अधिकारात वेगळे निकष वापरले त्याचा विचार करता येऊ शकेल, उदाहरणार्थ निस्तार हक्क, सरपण, पालापाचोळा, कंदमुळे इत्यादी क्षेत्र, पवित्र वनस्पती, देवराई, दफनभूमी इत्यादी असलेले क्षेत्र निर्धारित करता येईल. नागरी वस्तीच्या माहिती संकलनाचे घटक म्हणून शहरांमध्ये मोहल्ला किंवा अधिकृत सीमाही अशीही त्याची व्याख्या करता येऊ शकेल.

६) मानवी वस्ती आणि सभ्यता स्थिरावण्यास पशू आणि वनस्पतीचा महत्त्वाची भूमिका आहे. मागील हजारो वर्षांच्या इतिहासात पिके, शेती आणि पशुधनाना मानवी उपयोगासाठी पाळीव करण्यात आणि सभ्यता स्थिरावण्यास मदत झाली. प्रागैतिहासिक आणि मध्ययुगीन कालखंडात, प्राणी आणि पिके यामध्ये काहीसे अंतर वाढले.

७) औद्योगिक आणि उद्योगोत्तर कालावधीत देखील मानवाचे आणि निसर्गाचे अंतर वाढल्याचे दिसते. तथापि, या कालावधीमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि थोडेसे नैसर्गिक संसाधनेपासून काही व्यक्ती कुटुंब समाज दूर झाले. आजही अनेक कुटुंबे आहेत ज्यांची उपजीविका नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहे. त्यांनी आपल्या निसर्ग सान्निध्यामुळे आणि नोंदी आणि निरीक्षणाच्या स्वभावामुळे ज्या काही नोंदी ठेवल्या आहेत ते परंपरेने पिढ्या दरपिढ्या झिरपत आले आहे. तथापि, सध्याची स्थिती आणि या पुढील पिढीमध्ये हे लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून यांचे योग्य दस्तऐवजीकरण करणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

८) नैसर्गिक संसाधनांच्या उपयुक्तता आणि उपयोगाच्या बाबतीमध्ये अनेक व्यक्ती समाजामध्ये उपलब्ध आहेत ज्यांना याबाबतचे तांत्रिक ज्ञान आहे आणि याचा उपयोग करून ते प्राण्यांवर, माणसांवर उपचार करतात याचीही नोंद होणे गरजेचे आहे.

प्रत्यक्ष माहिती संकलन :

१) पीबीआरमध्ये एकूण पाच अनुसूची तीन विभाग आणि ३१ विविध पत्रके आहे. जैवविविधता नोंदणी पत्रकामधील भाग एक आणि भाग दोन यामध्ये माहिती संकलन करावयाची आहे. भाग तीन हा मार्गदर्शक सूचनांसाठी आहे.

२) ग्रामपंचायत माहिती ः प्रत्येक क्षेत्राची स्वतःची अशी एक ओळख असते. स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते. हे त्या गावात ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण माहितीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, त्या ग्रामपंचायतीचा तालुका जिल्हा अभ्यास क्षेत्र इ. त्याचप्रमाणे त्याची समुद्रसपाटीपासून उंची, अक्षांश, रेखांश, त्याचे क्षेत्र, चतु:सीमा, हवामान, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता इत्यादी पर्यावरण विषयी नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

३) सामाजिक आणि आर्थिक बाबी विषयी माहिती : अभ्यास क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक माहितीच्या मुळे तेथील व्यक्तींची, समाजाची, नैसर्गिक संसाधनांवर उपयुक्तता किंवा अवलंबित्व आपल्या लक्षात येईल. म्हणजे ते संसाधने स्वतःसाठी वापरत असतील किंवा सामाजिक कामासाठी वापरत असतील अथवा त्याचा व्यावसायिक उपयोग होत असेल या सगळ्यांची नोंद होणे गरजेचे आहे.

४) भौगोलिक क्षेत्राची माहिती घेत असताना तेथे संरक्षित वनक्षेत्र, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, काही संरक्षित क्षेत्र, गायरान वनराई इ याचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये येणे गरजेचे आहे. याचा तपशील ग्रामपंचायत माहितीच्या प्रपत्रात आहे.

जैवविविधता व्यवस्थापन समितीसाठी अनुसूची ः

अनुसूची १ :
- जैवविविधता व्यवस्थापन समिती तपशील या प्रपत्रात आहे. या तपशिलात जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सहा सदस्यांची विस्ताराने माहिती द्यावयाची आहे. यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, लिंग, वय, तसेच ते कोणत्या विषयाचे जाणकार आहेत याचाही उल्लेख असावा.

अनुसूची २ :
- प्रत्येक गावांमध्ये, परीक्षेत्रांमध्ये किंवा अभ्यास क्षेत्रांमध्ये कोणीतरी वैदू/हकीम असल्यास तो संसाधनाचा वापर करून माणसावर आणि पशुधनावर उपचार करतात अशांची यादी तयार करणे गरजेचे आहे. त्यांचे नाव, वय, लिंग, पत्ता आणि त्यांची व्यक्तिगत क्षमता काय आहेत, याची नोंद घ्यावी. व्यवसायासाठी म्हणून काम करण्यासाठी वनस्पतींची कोणत्या वनस्पती आणतात याबाबतची माहिती देखील त्यांच्याकडून घ्यावी. त्याशिवाय त्यांच्याकडून सद्यःस्थितीबाबत उपलब्ध संशोधनाबाबत देखील माहिती घ्यावी आणि त्याची नोंद ठेवावी. उदाहरणार्थ, वनस्पतींची नावे, त्यांचे औषधी उपयोग, इत्यादी

अनुसूची ३ :
- गावांमध्ये राहत असलेल्या काही व्यक्ती ज्यांच्याकडे परंपरेने आलेले विशिष्ट तांत्रिक ज्ञान उपलब्ध आहे आणि ते जैवविविधतेची संलग्न आहे; उदाहरणार्थ कृषी, काही मत्स्यपालन करणाऱ्यांना पारंपरिक व्यवसाय करणारे असतात, त्यांच्याकडे विशिष्ट माहिती असते. काही व्यक्तींना पशुधन, वनांबद्दल, पक्षांबद्दल विस्ताराने माहिती असते. अशा व्यक्तींची नावे आणि त्यांचा संपूर्ण तपशील यामध्ये नोंदवणे गरजेचे आहे.

या ठिकाणी आपण राहीबाई पोपरेंचे नाव निश्‍चितपणे सांगू शकतो, की ज्यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक  आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने २०२० मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांनी स्थानिक जातींची पूर्ण माहिती ठेवून त्यांचे वर्गीकरण करून ते समाजाला उपलब्ध कसे होईल याबाबत खूप मोठे काम केले आहे. राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईंकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे वालाचे वीस प्रकार उपलब्ध आहेत.

संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाण्यांचे संकलन करत बियाण्यांची बँक तयार केली. लहानपणापासूनच बियाणे गोळा करण्याचा छंद जडलेल्या राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणांच्या बियाण्यांचे पारंपरिक पद्धतीनं सवर्धन केलं. विशेष म्हणजे प्रत्येक बियाण्याविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. बियाणे औषधी आहे का, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती हे सगळे त्या सांगतात. त्यामुळे त्यांना बियाण्यांचा चालताबोलता ज्ञानकोश असेही म्हणता येईल.

देशी बियाणे गोळा करून महाराष्ट्रात शेती संवर्धानाचे मोठे काम उभे करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी संकटांवर मात करून ही ‘बीज बँक‘ उभारली आहे. आता या कामाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. हरितक्रांतीनंतर देशात संकरित बियाण्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ लागला. भरमसाट उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाण्यांकडे वळले आणि पारंपरिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडे दुर्लक्ष झाले. अशा पारंपरिक आणि गावरान वाणांचे जतन “सीडमदर” राहीबाई करत आहेत. राहीबाईंप्रमाणे अनेक व्यक्ती काम करत असतात भलेही त्यांचे क्षेत्र मर्यादित असेल त्यांच्याकडे माहिती असतेही माहिती संकलन करणे गरजेचे आहे.

अनुसूची चार :
- या अनुसूचीमध्ये परिसरातील शाळा, महाविद्यालय, विविध विभाग, विद्यापीठ, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांची माहिती संकलित करावयाची आहे. त्यांची विस्ताराने माहिती संकलित करून नाव पत्ता फोन नंबर दूरध्वनी क्रमांक ई-मेल या सर्वांची नोंद त्यामध्ये करणे गरजेचे आहे.

अनुसूची ५:

- या अनुसूचीमध्ये जैवविविधता संसाधनांच्या बाबतीमध्ये काही नोंदी ठेवलेल्या असतील आणि लोकांना पाहण्यासाठी आणि काही वनोपज गोळा करण्यासाठी परवानगी इत्यादी दिले असेल. त्याबाबतची माहिती असावी. त्यांनी गोळा केलेली फी इत्यादींबाबत माहिती या अनुसूचीमध्ये संकलित करण्यात यावी.

सदरची माहिती कशी गोळा करावी याबाबत विस्ताराने सांगण्याची गरज यासाठी आहे, की स्थानिक विविधता, माहीतगार व्यक्ती या आपल्या देशाचा वारसा आहेत त्यांचे नोंदी आणि जतन होणे आणि पुढील पिढीला ते उपलब्ध होणे गरजेचे आहे. विस्ताराने प्राप्त झालेली माहिती अचूक असल्यास आपल्याला त्याचे व्यवस्थापन जतन आणि उपजीविकेसाठी वापर करता येऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com