Mango Farming : संत्रा पट्ट्यात आंबा, बांबूची व्यावसायिक शेती

अमरावती जिल्ह्यात संत्रा (Orange) पिकासाठी प्रसिद्ध वरूड तालुक्यातील रवाळा येथील फुटाणे कुटुंबाने आंबा (Mango) पीक व साडेचार एकरांत त्यांच्या विविध वाणांची यशस्वी शेती केली आहे. थेट विक्रीतून बाजारपेठही मिळवली आहे. सुमारे साडेसात एकरांत बांबूवन (Bamboo Farming) विकसित करून विविध उद्देशाच्या विक्रीतूनही उत्पन्नस्त्रोत तयार केला आहे.
Mango
MangoAgrowon

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका म्हणजे राज्यातील प्रसिद्ध संत्रा पट्टा (Orange Belt) मानला जातो. तालुक्यातील रवाळा येथील वसंतराव फुटाणे यांची सुमारे ३७ एकर शेती आहे. वसंतरावांचे बीएस्सी (कृषी) पर्यंत शिक्षण झाले आहे. विनय (बीएस्सी ॲग्री) व चिन्मय ही दोन मुले शेतीची जबाबदारी सांभाळतात.

Mango
Bamboo : बांबू कोंबांपासून लोणचे, बिस्कीट

व्यावसायिक पीक पद्धती

दूरदृष्टीतून फुटाणे यांनी व्यावसायिक शेती व त्यातही फळपिकांवर (Fruit Crop) अधिक भर देत ३७ एकर शेतीचा विकास (Development Of Agriculture) साधला. त्यांच्याकडे संत्र्याची (Orange Tree) पाचशे झाडे आहेत. वरूड व मोर्शी हे दोन तालुके नागपुरी संत्रा लागवडीत आघाडीवर आहेत. राज्याच्या दीड लाख हेक्टरपैकी ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र याच भागात आहे. असे असताना आंब्यासारखे पीक (Mango Crop) या भागात यशस्वी करण्याचा प्रयत्न फुटाणे यांनी केला. वरूड भागात पाण्याचा अधिक उपसा होत असल्याने हा भाग ‘ड्राय झोन’मध्ये परावर्तित होईल अशी भीती वसंतरावांना वाटत होती. (सध्या नवे बोअर घेण्यावर बंदी आहे). त्यातूनच त्यांनी अन्य फळपिकांचा विचार सुरू केला. आंबा लागवडीचा पर्याय सुरक्षित वाटला. सन १९९५ पासून टप्प्याटप्प्याने लागवड वाढविली. कोयी तसेच कलमांपासून वृद्धी केली. आज सुमारे ३०० पर्यंत झाडे तर साडेचार एकरांपर्यंत आंबा लागवड आहे. त्यात २० वर्षांपासून ते २५ वर्षे वयाची झाडे आहेत. केसर, रत्ना, राजापुरी, दशहरी, सरदार, बेगमपल्ली, हापूस व लक्ष्मण आदी विविध वाणांची विविधता जपली आहे. निवड पद्धतीने रायवळ आंब्याची झाडे विकसित केली आहेत. त्याचेच सुमारे २० प्रकार आहेत.

Mango
आंबा, काजू बागायतदारांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा

उत्पादन व थेट विक्री

आंब्याचे एकूण मिळून दर हंगामात ७ ते ८ टनांपर्यंत उत्पादन मिळते. सुमारे १५ वर्षांपासून आंब्याची थेट विक्री करण्यावर भर दिला आहे. चिन्मय यांच्या आई करुणा यांनी त्यासाठी अधिक प्रयत्न केले. आज दोन तृतीयांश आंब्याची घरूनच विक्री (जातीनिहाय १२० ते १७० रुपये प्रति किलो दर) होते. उर्वरित घरपोच डिलिव्हरी होते. आजच्या स्मार्ट फोनच्या युगात व्हॉट्‌सॲप ग्रुप, फेसबुक याद्वारे विपणन केले जाते. अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा तसेच पुणे, नाशिक, मुंबईतील ग्राहकांनाही एसटी पार्सलद्वारे पोहोच करण्याचे प्रयत्न झाले. बॉक्समधील एक- दोन आंबे खराब झाल्यास ते बदलून देण्याचीही तयारी असते. अनेक वर्षांपासून ग्राहकांशी बांधिलकी जपल्याचे चांगले फळ फुटाणे यांना आज मिळत आहे. यंदा सुमारे दोन लाख रुपयांच्या आंब्याचा घरपोच पुरवठा झाला. गेल्या वर्षी एकूण साडेसहा लाख रुपयांची विक्री झाली.

लोणचे व साखरांब्याचेही पैसे

आंब्यावर प्रक्रिया करूनही त्यापासून नफा वाढवला आहे. राजापुरी जातीच्या आंब्यापासून लोणचे तयार केले जाते. त्याची २०० रुपये प्रति किलो दराने मागील वर्षी विक्री केली. यंदा पाच क्विंटलपर्यंत लोणचे तयार केले आहे. सरदार जातीच्या आंब्यांपासून साखरांबा तयार केला जातो. २०० रुपये प्रति किलो दराने त्याचीही यशस्वी विक्री झाली आहे.

बांबूचे बन

व्यावसायिक दृष्टिकोन जपताना बांबूचे पीकही फुटाणे यांना महत्त्वाचे वाटले. सुमारे अडीच एकरांत २५ ते ३० वर्षे वयाची झाडे असून, मानवेल हा प्रकार आहे. घरबांधणीसाठी प्रति फूट पाच रुपये, संत्रा बागेत शिडीसाठी म्हणून २०० रुपये प्रति जोडी, बुरूड कामांसाठी चार रुपये, तर शेतीकामांसाठी साडेतीन रुपये प्रति फूट या दराने विदर्भात बांबूची विक्री होते. सुमारे साडेपाच एकरांत बांबूच्या विविध वाणांची (बालकुवा, टुल्डा) मागील वर्षी नवी लागवड केली आहे. त्यामुळे संत्रा, आंबा यांच्या बरोबरीने या पिकातूनही चांगला उत्पन्नस्रोत निर्माण झाला आहे.

अन्य पिके

हंगामी अर्धा ते एक एकरावर भात, तूर, मूग अशीही पिके असतात. भाताचे तणस आंबा पॅकिंगमध्ये उपयोगास येते. तुरीची डाळ तयार करून विक्री केली जाते. सुमारे अडीच एकरांत फळबाग असून जांभूळ, पेरू, करवंद, चिकू, रामफळ, सीताफळ अशी विविधता जपली आहे.

शेतातच घर

दोन्ही मुलांचे कुटुंब शेतातच घर करून राहते आहे. त्यामुळे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे शक्य होते. सुमारे ३५ देशी गायी आहेत. अनेक वर्षांपासून कुटुंबाने बायोगॅस प्रकल्प नेटाने चालविला आहे. कुटुंबाची दैनंदिन स्वयंपाकाची गरज त्यातून भागत असून सिलिंडरवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबर खर्चात बचत झाली आहे.

चिन्मय फुटाणे, ९९२३२३११४९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com