Pomegranate : डाळिंबाची सातत्यपूर्ण गुणवत्ता अन् उच्चांकी दरही

माथणी (ता. जि. नगर) या दुष्काळी भागात इक्बाल अमीर सय्यद व बंधू शेखलाल यांनी डाळिंब, सीताफळाची यशस्वी शेती करून उल्लेखनीय आर्थिक व कौटुंबिक प्रगती साधली आहे. डाळिंबाचे सर्वोत्कृष्ट उत्पादन व उच्चांकी दर मिळवताना या पिकातील ‘मास्टर’ शेतकरी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

नगर तालुक्यातील पूर्व भागातील माथणी व अन्य गावांना शाश्‍वत पाणी नाही. त्यामुळे सातत्याने दुष्काळाच्या (Drought) झळा सोसाव्या लागतात. तरीही उपलब्ध पाण्याचे व शेतीचे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन (Agriculture Management) माथणी येथील इक्बाल अमीर सय्यद व बंधू शेखलाल या बंधूंनी केले. त्यातून प्रशंसनीय प्रगती साधली आहे. त्यांची ३५ एकर जमीन आहे. त्यात सात एकर बागायत व २८ एकर जिरायती शेती आहे. पंधरा वर्षांपासूनचा त्यांचा फळबागांचा (Orchard Plating) अनुभव तयार झाला आहे.

Pomegranate
Pomegranate Rate: सोलापुरात डाळिंबाला उठाव, दरही तेजीतच

फळबागांचा विकास

इक्बाल यांना १९९८ मध्ये लष्करात भरती होण्याची संधी आली. मात्र घर व शेतीची जबाबदारी असल्याने ही संधी घेता आली नाही. जिरायती शेतीत ते ज्वारी, बाजरी आदी पिके घेत. सन २००३-२००४ मध्ये दु्ष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या. या काळात इक्बाल यांनी गावोगावी जाऊन कुल्फी विक्रीचे काम केले.

पुढे फळबागांच्या विकासाकडे लक्ष दिले. नगर, नाशिक व अन्य भागांतील अनुभवी शेतकऱ्यांच्या बागांना भेटी दिल्या. सन २००७ मध्ये ३५ गुंठ्यांत भगवा डाळिंब वाणाची, तर एक एकरात सीताफळाची लागवड केली. अभ्यास, प्रयोगशील शेतकरी व अभ्यासकांचे मार्गदर्शन यातून प्रगतीकडे वाटचाल केली. जुन्या २४० झाडांमध्ये आता २०१८ मध्ये डाळिंबाच्या ४०० झाडांची नव्याने भर घातली आहे. सीताफळाची २०० झाडे आहेत.

Pomegranate
Pomegranate Rate : डाळिंबाच्या दरात वाढ झाल्याने गोडी वाढली

डाळिंब व्यवस्थापन- ठळक बाबी

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या काळात विक्री करता यावी यासाठी मार्चमधील बहर नियोजन. आंबे बहरावर प्राधान्य. (याच सणासुदीच्या काळात सीताफळेही बाजारात आणण्याचे नियोजन.) बहर धरण्याआधी विश्रांतीच्या काळात दरवर्षी प्रति झाड ५० ते ७० किलो शेणखत, एक किलो बोनमील, एक किलो गांडूळ खत, एक किलो निंबोळी खत, एकरी दहा किलो सल्फर.

सेंद्रिय व रासायनिक निविष्ठांचा एकात्मिक मेळ.

तेलकट डाग रोगाला रोखण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर. फळतोडणीनंतर विश्रांतीच्या काळात पानगळ करून बोर्डोची एक आठवडा ते पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी. त्यात प्रतिजैविकाचाही वापर.

बहरानंतर तीन महिन्यांनी जिवामृत स्लरी, ठिबकमधून जिवाणू खत. पाचव्या महिन्यानंतर जैविक स्लरी. प्रति दोनशे लिटर पाण्यात पंधरा किलो सरकी पेंड, एक किलो गूळ, एक लिटर ‘केएमबी’ आदींपासून ही स्लरीनिर्मिती. बहर धरल्यानंतर तीन महिन्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने एकरी दोनशे लिटर वापर.

दरवर्षी माती परीक्षण. त्यानुसार विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर.

जैविक व सेंद्रिय घटकांच्या अधिकाधिक वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब एक टक्क्यावर पोहोचल्याचे इक्बाल सांगतात. फळांचा आकार तीनशे ग्रॅमपासून ते सहाशे ग्रॅमपर्यंत. चकाकी उत्तम. झाडांच्या मुळांजवळ दर पंधरा दिवसाला ह्युमिक ॲसिडचा वापर. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ.

पिठ्या ढेकणाला रोखण्यासाठी कीटकनाशक द्रावणाने खोड धुणे प्रक्रिया, अन्य किडींच्या नियंत्रणासाठी एकरी एक याप्रमाणे सौर सापळ्याचा वापर. छाटणी, तोडणी व बागेतील सर्व कामे कुटुंबातील व्यक्तीच करतात. मजूरटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न.

दराचा उच्चांक

एकरी १२ टनांच्या पुढे डाळिंबाचे उत्पादन मिळते. पुणे येथील बाजारपेठेतच किलोला ९०, १०० रुपयांपासून ते १५० ते १७५ रुपयांपर्यंत दर घेतल्याचे इक्बाल सांगतात. यंदा किलोला ३९० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला. गुणवत्ता व उच्चांकी दर यासाठी पुण्यातील खरेदीदारांकडून त्यांचा वेळोवेळी सत्कार करण्यात आला आहे.

मास्टर शेतकरी अशी ओळख

सीताफळाची विक्रीही पुणे बाजारपेठेतच होते. किलोला ५० ते कमाल १०० व १६५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. १८ बाय पाच इंच अंतर ठेवून खरीप बाजरीचे उत्पादन एकरी १३ ते १४ क्विंटलपर्यंत घेतले आहे. गव्हाची नऊ बाय चार इंच अंतराने एकरी पेरणी केली. एकरी १५ क्विंटलपर्यंत त्याचे तर यंदा टोकन पद्धतीने घेतलेल्या सोयाबीनचे एकरी १८ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. सरी लागवड पद्धत व उंची दीड फूट असल्याने जास्तीचा पाऊस असूनही पाण्याचा निचरा झाला. इक्बाल हे डाळिंबातील मास्टर शेतकरी म्हणून या भागात परिचित आहेत. दरवर्षी सुमारे ५० शेतकरी त्यांच्या बागेला भेट देतात. शेतकऱ्यांना ते मोफत मार्गदर्शनही करतात.

स्वप्न केले साकार

अथक परिश्रमातून सय्यद बंधूंनी आर्थिक व कौटुंबिक प्रगती साधली आहे. १३ एकर शेती टप्प्याटप्प्याने खरेदी करून २८ एकरांत भर घातली आहे. टुमदार बंगला व मोठी ‘फोर व्हिलर’ घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुलांना उच्च शिक्षण देण्याची धडपड आहे.

इक्बाल सय्यद ९६५७८६१०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com