Dairy Business : योग्य नियोजनातून दुग्ध व्यवसायात सातत्य

बाभूळवाडे (ता. पारनेर, जि. नगर) येथील कोमल रजनीकांत जगदाळे यांनी पशुपालनामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. हंगामानुसार विविध पिकांची लागवड त्याचबरोबरीने जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन, मुक्तसंचार गोठा आणि काटेकोर व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

श्रद्धा चमके

Milk Production : बाभूळवाडे (ता. पारनेर, जि. नगर) येथील कोमल रजनीकांत जगदाळे यांनी पशुपालनामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

हंगामानुसार विविध पिकांची लागवड त्याचबरोबरीने जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन, मुक्तसंचार गोठा आणि काटेकोर व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पारनेर तालुक्यापासून (जि. नगर) २७ किमी अंतरावरील बाभूळवाडे हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. येथील बहुतांश शेतकरी पूरक उद्योग म्हणून पशुपालनाकडे वळले आहेत. यापैकीच एक आहेत रजनीकांत बाळासाहेब जगदाळे.

परंपरागत चार एकर शेती आणि पशुपालन हाच जगदाळे कुटुंबीयांचा मुख्य आर्थिक स्रोत. २०१७ मध्ये रजनीकांत यांचे लग्न मुंबईतील कोमल जयराम गगे यांच्याशी ठरले. कोमल यांचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील नळवणे.

परंतु वडिलांच्या नोकरीमुळे त्या मुंबईत वास्तव्यास होत्या. मुंबईतील पदवीधर मुलगी शेती आणि पशुपालनात रमेल का, अशी शंका रजनीकांत यांच्या मनात होती.

परंतु त्यांच्या मामांनी कोमल यांना शेती, गोपालनाची आवड असल्याचे सांगितले. त्या शेती आणि गाईंचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करतील, असे सांगितल्याने लग्न जमले.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पाहा

लग्नानंतर कोमल यांनी कुटुंबाच्या गोठ्यात असलेल्या गाईंच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतले. काही महिन्यांमध्येच चार दुधाळ होल्स्टिन फ्रिजियन गायींची संख्या आठवर नेली.

गोठा स्वच्छता, गाईंना चारा कुट्टी देण्यापासून दूध काढण्यापर्यंत सर्व दैनंदिन कामे कोमलताई करतात. यामध्ये त्यांना सासूबाई नर्मदा यांची चांगली मदत होते.


रजनीकांत आणि कोमल यांनी स्वतःच्या चार एकर शेतीबरोबर आणखी दोन एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे.

दैनंदिन शेती नियोजनात सहभाग, गाईंसाठी चारा लागवड आदी कामांच्या बरोबरीने त्यांनी काटेकोरपणे दुग्ध व्यवसायाचे नियोजन केले आहे.

घरच्या शेतीमध्ये पुरेशा प्रमाणात चारा लागवड असल्याने खर्चात चांगली बचत होते. गाईंचे व्यवस्थापन दोघे जण बघत असल्याने मजुरांची गरज भासत नाही.

एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाई असल्यामुळे दरवर्षी ३० टन मुरघास तयार केला जातो. यामुळे गाईंना वर्षभर सकस चारा उपलब्ध होतो.

Dairy Business
Dairy Business :दुग्ध व्यवसायाला शाश्‍वत स्थिरता देणारा प्रकल्प घडावा

जमीन सुपीकतेवर भर ः
कुटुंबाची चार एकर आणि भाडेतत्त्वावर दोन एकरामध्ये पीक नियोजन असते. दरवर्षी तीन एकरांत कांदा लागवड, अडीच एकरांत हंगामी चारा, सुपर नेपियर गवताची लागवड केली जाते. एक एकरात हंगामानुसार ज्वारी, वाल, मूग, मका, गाजर लागवड असते.

दरवर्षी गोठ्यामध्ये पंधरा ट्रॉली शेणखताची उपलब्धता होते. त्यामुळे शेतीमध्ये दरवर्षी पुरेशा प्रमाणात शेणखताचा वापर केल्याने सुपीकता टिकून आहे. त्याचा पीक गुणवत्ता वाढीसाठी फायदा होतो. त्यामुळे रासायनिक खतांचा फारसा वापर करावा लागत नाही.

गोठ्यामध्ये जमा केलेल्या गोमूत्राची ठराविक कालावधीमध्ये कांदा आणि चारा पिकावर फवारणी केली जाते. स्वतःच्या शेतीत वापरानंतर उर्वरित शेणखताची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते. यातूनही दरवर्षी वीस हजारांची मिळकत होते.

गाईंचे व्यवस्थापन ः
गोठ्यामध्ये सध्या आठ होल्स्टिन फ्रिजियन गाई आहेत. यातील एका गाईच्या खरेदीसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे (नॉर्थ) आणि अपना घर फाउंडेशनच्या यांच्यावतीने तीस हजार रुपये मदत मिळाली होती.


१) कार्यशाळा, प्रशिक्षणात कोमलताईंचा सातत्याने सहभाग. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गाईंचे व्यवस्थापन.
२) गाईंसाठी एक बांधीव गोठा, गाभण गायींसाठी स्वतंत्र गोठा. याचबरोबरीने ६० फूट रुंद, १२० फूट लांब आकारमानाचा मुक्त संचार गोठा.


३) सकाळी सात वाजता गायींच्या धारा काढल्यानंतर पुरेसा चारा, पाणी दिले जाते. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत मुक्त संचार गोठ्यात गाई असतात. पुरेसा व्यायाम, विश्रांती मिळाल्याने जास्त वेळ गाई रवंथ करतात. संध्याकाळी सात वाजता गाईंची धार काढली जाते.
४) प्रति दिन २२ ते २८ लिटर दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाईंचे


संगोपन. गाईला दररोज ३५ ते ४० किलो चारा कुट्टी. उन्हाळ्यात मुरघासाचा जास्तीत जास्त वापर. शिफारशीनुसार दररोज आहारात पेंड, भरडा, खनिज मिश्रणांचा वापर. योग्य आहार व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात सातत्य.

५) गोठ्यामध्ये सायफन पद्धतीने पाणी व्यवस्थापन यंत्रणा. गाईंना गरजेनुसार स्वच्छ, थंड पाण्याची उपलब्धता.
६) उन्हाळ्यात गोठ्यातील तापमान थंड राहाण्यासाठी फॉगर्सचा वापर.


७) दररोज गोठ्याची स्वच्छता, महिन्यातून एकदा गोठ्यातील मॅट काढून चुना लावला जातो.
८) गोठ्याजवळ गोमूत्र संकलनाची सोय.


९) पशू तज्ज्ञांकडून गाईंची आरोग्य तपासणी, वेळापत्रकानुसार लसीकरण.
१०) योग्य व्यवस्थापन असल्याने गाईंचे लम्पी स्कीन आजारापासून संरक्षण.

दुग्धोत्पादनात सातत्य ः
१) दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर.
२) दररोज १५० लिटर दूध संकलन.
३) खासगी डेअरीमध्ये दुधाची विक्री. फॅटनुसार प्रति लिटर ३७ ते ३८ रुपये दर.

गाभण गाईंचे स्वतंत्र व्यवस्थापन ः
गाभण गाईंच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गोठा तयार केला आहे. या ठिकाणी पुरेसा आहार आणि आरोग्य व्यवस्थापनावर काटेकोर लक्ष देणे सोपे जाते. गोठ्यामध्ये जंतुनाशकाची फवारणी करून स्वच्छता ठेवली जाते. कृत्रिम रेतनाचा वापरकरून गोठ्यात तीन जातिवंत दुधाळ गाईंची पैदास झाली आहे. यामुळे दूध उत्पादनात सातत्य ठेवणे शक्य झाले आहे.

संपर्क ः कोमल जगदाळे, ८०८०१२२८७०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com