Cotton Processing Business : कापूस प्रक्रिया व्यवसाय झाला हायटेक

विदर्भातील अकोला, यवतमाळ हे जिल्हे ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळखले जातात. याच भागात कापसावरील प्रक्रिया उद्योगही भरभराटीस येत असून, त्यात आधुनिक संयंत्रांचा वापर वाढला आहे.
Cotton Processing Business
Cotton Processing BusinessAgrowon

Cotton Market : राज्यातील कापसाखाली ४३ लाख हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापैकी सुमारे १८ लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. गेल्या चार-पाच वर्षात ‘टेक्‍स्टाइल पार्क’च्या (Textile Park) माध्यमातून कापड उद्योगालाही (Textile industry) चालना मिळाली.

मात्र त्यासाठी प्रक्रिया केलेल्या कापसाचा पुरवठा करणारे हे बहुतांश अन्य जिल्हा किंवा राज्यातील असल्याचे एकमेकांचे दूरचे नातेवाईक असलेले अनिकेत कोकाटे व मंगेश इंगोले यांच्या लक्षात आले. ही संधी आपणच का घेऊ नये, असा विचार त्यांच्या मनात आला.

सुनील राणा यांच्या सहकार्याने २०२१ भातकुली औद्योगिक क्षेत्रात प्लॉट विकत घेतला. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये प्रत्यक्ष व्यवसायाला शुभारंभ केला. ३६ डीआर (रेचे) इतकी क्षमता असलेल्या या व्यवसायातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे २५० व्यक्‍तींना रोजगार मिळाला आहे.

...अशी आहे यंत्रणा

उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, सर्व यंत्रणा संगणकीकृत बसवली आहे. कापसातील कचरा वेगळा काढण्यासाठी सेन्सरबेस यंत्रणा आहे. उच्च दर्जाच्या प्रेसिंग मशिनचा वापर केला आहे.

प्रति दिन १५०० ते २००० क्‍विंटल कापसाची खरेदी व त्यावर प्रक्रिया केली जाते. सुमारे २०० ते २५० पर्यंत गाठीचे उत्पादन होते. या गाठींना अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातून मागणी आहे.

प्रक्रियेनंतर वेगळ्या केलेल्या सरकीला पशुखाद्यात चांगली मागणी आहे. विशेषतः कोरडवाहू पट्ट्यातील कापसामधील सरकीमध्ये तेलाचे प्रमाण अधिक राहते.

Cotton Processing Business
Cotton Market : कापूस उत्पादकांची दरवाढीची अपेक्षा अजूनही अपूर्णच

...असा आहे प्रकल्प

-प्रकल्पाचे क्षेत्र पाच एकर आहे.

-मूल्यवर्धित व कच्चा मालाचे वजन करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक वजनकाट्याची सोय.

-कापसाच्या साठवणुकीसाठी १५० बाय २०० फूट (तीन लाख चौरस फुटांचे) प्लॅटफार्म. त्यावर टीनशेड टाकल्याने कापसातील आर्द्रता कायम राहते.

-लोडर ट्रॅक्‍टरद्वारे कापूस उचलून हॉटबॉक्‍समध्ये टाकला जातो.

-हॉटबॉक्‍समध्ये बेल्टद्वारे हा कापूस ऑटोमॅटिक फीडिंग ट्रॉलीमध्ये जातो.

-एक ट्रॉली १८ रेच्यांना कापूस पुरवठा करते, तर दुसरी ट्रॉली १८ रेच्यांना पुरविते. सुरुवातीच्या काळात ही ट्रॉली पद्धती नसल्याने हे सारे काम मजूरांद्वारे केले जाई. आता स्वयंचलित यंत्रणेमुळे कामाचा वेग वाढला आहे.

-एक रेच्याद्वारे दर दिवशी (१६ तासांत) ५५ क्‍विंटल कापसावर प्रक्रिया होते. व्हॅक्‍युमद्वारे कापूस प्रेसकडे खेचला जातो. प्रेसच्या आधी फिल्टर लावले असून, त्यातून कापसातील काडीकचरा बाजूला काढला जातो.

-या फिल्टर किंवा रेच्यामध्ये कोठेही वीज किंवा अन्य कारणांमुळे आगीसारखी घटना घडू नये, यासाठी सेन्सर बसवलेले आहेत. त्याद्वारे आग लागलेला कापूस तत्काळ ओळखत व्हॅक्‍यूम यंत्रणेद्वारे जिनिंग प्रेसिंगच्या बाहेर काढला जातो.

तो जिनिंगच्या बाहेर खास बनवलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पडत असल्याने आगीचा धोका राहत नाही. आग नियंत्रणासाठीची अशी यंत्रणा राज्यात प्रथमच बसवल्याचा त्यांचा दावा आहे.

-फिल्टर झालेली रुई बेल्टद्वारे प्रेसिंगकडे, तर सरकी ही कन्हेअर बेल्टद्वारे स्टोअररूमला जाते.

- प्रेसिंग मशिनमध्ये दर दिवशी (१६ तासांत) हजार गाठी तयार होतात.

- पूर्वी प्रेसिंगनंतर या गाठींना मजुरांद्वारे कापड लावले जाई. मात्र आता ते कामही यंत्राद्वारे केले जाते.

- त्याच मशिनद्वारे गाठींचे वजन व दर्जा तपासला जातो. कापसातील आर्द्रता व अन्य निकषांवर तपासणी करण्यासाठी खास सॉफ्टवेअर प्रणाली आहे. स्वयंचलित प्रणालीमुळे रुईची गुणवत्ता वाढते. वेळ व मजुरांची बचत होत असल्याचे अनिकेत सांगतात.

- उत्तम दर्जाची रुई लोडिंगसाठी तयार होते.

वार्षिक उलाढाल वाढतीच...

अनिकेत कोकाटे यांनी उभारलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच मूल्यवर्धनाची सुविधा निर्माण झाली आहे. परिणामी, या भागात कापसाची पेरणी वाढली आहे. हंगामात प्रति दिन दोन ते अडीच कोटी रुपयांचा कापूस प्रक्रियेसाठी खरेदी केला जातो.

सरासरी सहा महिन्यांच्या हंगामामध्ये कापूस गाठीमधून ६० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून बाकीची उत्पादने उदा. सरकी यातून ६० कोटींची उलाढाल होत असल्याचे अनिकेत यांनी सांगितले.

-वर्षाला सर्व खर्च वजा जाता १० ते १२ कोटी रुपयांचा नफा होतो.

-कापूस गाठी व इतर प्रक्रियाजन्य शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांची सातत्याने ये-जा सुरू झाल्यामुळे येथे हॉटेलिंग व लॉजिंग व्यवसायही वाढला आहे. अन्य काही उद्योगाना चालना मिळाली आहे. त्यातून रोजगाराची उपलब्धता झाली आहे.

Cotton Processing Business
Cotton Seed Rate : ‘बीजी-२’ कापूस बियाणे पाकीट ८५३ रुपयांना

कट्टीला लागला ब्रेक

अमरावतीसारख्या बाजारपेठेत अर्धा किलोची कट्टी आकारली जाते. तशी कोणतीही पद्धत येथे नसल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा वजनाइतक्या रकमेचा चुकारा त्याच दिवशी केला जातो. शेतकऱ्यांच्या बैठकीसह चहापानाची सोयही केलेली आहे. पुढील टप्प्यामध्ये शेतकऱ्यांसाठी निःशुल्क जेवणाची सोय करण्याचा मानस असल्याचे मंगेश इंगोले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मिळते प्रशिक्षण

भातकुली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनजीक हा प्रकल्प असल्यामुळे ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व प्रशिक्षणासाठी येथे आणले जाते.

एक क्‍विंटल कापसापासून मिळणारे घटक

- ३५ ते ४० किलो रुई

- १० टक्‍के वेस्ट

- उर्वरित ५० टक्‍के सरकी

रोजगाराची गावातच उपलब्धता...

या प्रकल्पामुळे भातकुली गावातील १०-१२ जणांना रोजगार मिळाला आहे. जिनिंगशी संबंधित अन्य कामांसाठी २२५ ते २५० व्यक्‍तींना रोजगार मिळाला आहे. यापूर्वी गावात अशा प्रकारची संधी उपलब्ध नव्हती. पूर्वी स्वतः मी मुंबईत रोजगारासाठी स्थलांतरित झालो होतो.

मात्र कोरोना काळात अडचणींमुळे गावी यावे लागले. आता कंपनीशी संबंधीत आर्थिक व्यवहार सांभाळतो. माझ्यासोबतच अमर झासकर, राहुल सौदागर हेही कंपनीत कार्यरत आहेत. गावातच रोजगार मिळाल्याने समाधान वाटत असल्याचे व्यवस्थापक गोपाल काळे यांनी सांगितले.

मंगेश इंगोले, ९३०९५२५६६१, अनिकेत कोकाटे, ७२१८०१२१४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com