संकटात कुटुंबाचा आधार झाल्या गायी

औरंगाबाद स्थित सीताराम बुनगे ज्या कंपनीत नोकरी करायचे ती बंद पडली. पण खचून न जाता त्यांनी किराणा दुकान व छोटेखानी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज तीन देशी गायींपासून दररोज २५ ते ३० लिटर दूध संकलन व थेट दूध व तूप विक्रीतून त्यांनी कुटुंबासाठी आर्थिक आधार तयार केला आहे.
Cow Rearing
Cow RearingAgrowon

रामगव्हाण (ता. घनसावंगी, जि. जालना) हे मूळ गाव असलेले सीताराम लक्ष्मणराव बुनगे यांनी ‘आयटीआय’मधून इलेक्ट्रिक विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर औरंगाबाद येथील एका खासगी कंपनीत त्यांना नोकरी लागली. सुमारे ३४ वर्षे नोकरीचा अनुभव झाला असताना कंपनी काही कारणाने बंद पडली. पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे.

कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्‍न तयार झाला. पण निराश न होता त्यांनी औरंगाबाद येथील म्हाडा कॉलनीतील घरात छोटेखानी किराणा दुकान सुरू केले. त्याला जोडून जिद्दीने लहान स्वरूपात दुग्ध व्यवसायही सुरू केला. आज हाच व्यवसाय त्यांना संकटात आर्थिक आधार देत आहे.

नोकरी करीत असतानाच सीताराम यांना सासरवाडीकडून एक कालवड मिळाली होती. कंपनीची १० ते १५ एकर मोकळी जागा होती. कंपनीत कामावर जाताना ते त्या कालवडीला सोबत घेऊन जात. त्या जागेत दिवसभर तिला चराईसाठी सोडत. कामावरून परतताना तिला सोबत घेऊन येत. या गायीपासून पुढे आणखी दोन गीर गायी त्यांनी तयार केल्या. गायींना बंदिस्त न ठेवता पहिल्या कालवडीप्रमाणेच अन्य गायींनाही दिवसभर चरायला सोडून सायंकाळी चारा व उसाच्या कुट्‌टीवर संगोपनाचे तंत्र सीताराम यांनी अवलंबिले आहे. घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत छोटा गोठा बांधला आहे. चराईसाठी चिकलठाणा एमआयडीसी व म्हाडा कॉलनीला लागून असलेल्या जागांची निवड केली आहे. त्याच ठिकाणी पाण्याचीही सोय आहे. सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास गायींना या ठिकाणी सोडण्यात येते. सायंकाळी पुन्हा त्यांना घरी आणले जाते.

विक्री व्यवस्था

साधारण: २०१५ पासून दुग्ध व्यवसायात सातत्य आहे. आजमितीला एकूण तीन गायी आहेत. एक गाय दिवसाला सुमारे १६ लिटर दूध देते. उर्वरित गायी प्रत्येकी चार लिटर दूध देतात. दररोज सुमारे २५ ते ३० लिटर दूध संकलित होते. जवळपास २० ग्राहक कायमस्वरूपी जोडले गेले आहेत. साठ रुपये प्रति लिटर दराने दुधाची विक्री होते. या व्यतिरिक्त तीन वर्षांपासून गीर गायीच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने तूप तयार केले जाते. या कामाची मुख्य जबाबदारी सीताराम यांच्या पत्नी सौ. शशिकला करतात. सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांत म्हणजे लॉकडाउनच्या काळातच जवळपास ७० किलो तुपाची विक्री २५०० रुपये प्रति किलो दराने करण्यात बुनगे दांपत्याला यश मिळाले. यंदा आतापर्यंत सुमारे १० किलो तूप तयार केले आहे. त्यापैकी जवळपास ६ ते ७ किलो तूप ३००० रुपये दराने विकले आहे. मागील वर्षी गीर गाईचा एक वर्षाचा गोऱ्हा १८ हजार रुपयांना विकला आहे.

गायींची भेट

आजवर एक गीर गाय गावी मोठ्या भावाला, एक आप्तेष्टांकडे आणि एक कांचनवाडी (ता. जि. औरंगाबाद ) येथील गोशाळेला त्यांनी दिली आहे. गोपी नामक गायीपासून झालेल्या गोऱ्ह्याचे नामकरण ‘राजा’ असे केले आहे. किराणा व्यवसाय घरखर्च भागविला असून, दुग्ध व्यवसायातील उत्पन्नातून मुलांना अभियांत्रिकी विषयातील शिक्षण देणे शक्य झाल्याचे सीताराम सांगतात. गावी संयुक्त कुटुंबाची तीन एकर शेती आहे. सर्वांनी मिळून मोठी विहीरही खोदली आहे. गीर गायी जवळपास दीड वर्षात एकदा वितात असा बुनगे यांचा अनुभव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com