Organic Mango : सेंद्रिय हापूस उत्पादनातून मिळवली ओळख

गुहागर तालुक्यातील मोडकाआगार येथील शेखर शिवाजीराव विचारे यांनी सेंद्रिय हापूस उत्पादनामध्ये ओळख मिळवली आहे. सोबतच भात, नाचणी, सुरण ही पिकेही सेंद्रिय पद्धतीने घेतात. आंबा बाग कराराने देण्याऐवजी सेंद्रिय प्रमाणीकरण केलेल्या उत्पादनाची स्वतः ‘हॉर्टीकॉन’ ब्रॅण्ड अंतर्गत विक्री करतात.
Mango
Mango Agrowon

१९७८ कृषी पदवी घेतली त्यानंतर १९९३ पर्यंत खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर शेखर विचारे यांनी आपल्या आंबा बागायतीकडे (Mango Farming) लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे १५ एकर शेती असून, त्यापैकी ८ एकर आंबा (Mango), २ एकर काजू फळबाग (Cashew Orchard) आहे. पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली ही बाग पूर्वी ते कराराने देत. मात्र आपल्याला त्या व्यावसायिकाच्या तुलनेमध्ये फारच कमी फायदा हाती येत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे स्वतःच आंबा विक्री व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. २०१४ -१५ राष्ट्रीय फळबाग मिशन अंतर्गत प्रथम पॅकहाउस उभारणी केली. त्यानंतर अपेडाकडे बागेची नोंदणी केली. गॅप सर्टिफेशनसाठी व्यवस्थापन २०१५-१६ पासून सुरू केले. यात फक्त उत्पादन प्रमाणित होते. मात्र सेंद्रिय प्रमाणिकणामध्ये संपूर्ण शेती प्रमाणित होते. त्यामुळे २०१८ पासून सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी प्रयत्न सुरू केली. या वर्षी २०२२ मध्ये संपूर्ण शेती प्रमाणित झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. कोरोनापूर्वीच हापूस निर्यातीच्या दृष्टीनेही पावले उचलली. मात्र कोरोनोमुळे अडचणी आल्या. मे २०२२ मध्ये अमेरिकेला २४०० किलो आंबा विमानाद्वारे निर्यात केला

Mango
आंबा कलमांचे पावसाळी हंगामातील व्यवस्थापन

बागेचे व्यवस्थापन

जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर बागेची साफसफाई केली जाते. बागेतील सुका पालापाचोळा, नारळाच्या झावळ्याचा बारीक चुरा करून त्यावर जिवाणू खतांचा वापर केला जातो. त्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक सूक्ष्मजिवाणूंचे मिश्रण (Microbial consortium) मिसळून १५ दिवस ठेवले जाते. त्यानंतर हे मिश्रण प्रति झाड १५ किलोप्रमाणे दिले जाते. त्यात शेणखतही मिसळले जाते. माती हलवून घेतात.

-सूर्यप्रकाश झाडाच्या खोडांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक विरळणी केली जाते.

-हंगामात ऑक्टोबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत असा तीन वेळा हापूसला मोहोर येतो. दरवर्षी तुडतुडे आणि फुलकीडे यांचा सर्वाधिक प्रादुर्भाव होतो. पहिला मोहोर संरक्षित करण्यासाठी जुलैपासूनच उपाययोजना सुरू केल्या जातात.

- सागरी शेवाळावर आधारित घटकांची फवारणी केली जाते.

-दर महिन्यात एकदा (फेब्रुवारीपर्यंत) प्रत्येक झाडाला जिवामृत दिले जाते. त्यामुळे झाडांची सशक्तता वाढते.

Mango
आंबा, काजू बागायतदारांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा

आंबा काढणीपश्‍चात तंत्रज्ञान ः

आंबा निर्यातीसह स्थानिक बाजारासाठी उष्णजल प्रक्रियेचा अवलंब केला जातो. काढणीनंतर एक दिवसांनी ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यामध्ये आंबे ५ मिनिटे ठेवले जातात. त्यासाठी एकावेळी सर्वसाधारण तीन क्रेट राहतील अशी टाकी ठेवली आहे. त्यानंतर तो रायपनिंग चेंबरमध्ये ४८ ते ७३ तास ठेवला जातो. त्यांच्याकडे पाच टन क्षमतेचे रायपनिंग चेंबर आहे. तिथे ८० ते १०० पीपीएम इथिलीनचा डोस दिला जातो. रायपनिंग चेंबरमध्ये योग्य पक्वता आल्यानंतर आंबा पॅकिंग करून विक्रीला पाठवला जातो.

उत्पादन आणि मार्केटिंग ः

-हंगामात हापूस आंब्यांचे सुमारे ९ टन उत्पादन मिळते. (३५० झाडे)

-एक डझनचे बॉक्स करून ‘हॉर्टीकॉन’ या ब्रॅण्ड नावाने विक्री.

- राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक या बाजारपेठेसह पंजाब, दिल्ली, बंगलोर, गुजरात येथील बाजारपेठेमध्ये आंबा पाठवला जातो.

- आतापर्यंत अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबई या बाजारपेठेमध्ये सुमारे अडीच टन आंबा निर्यात केला. यंदा त्यांनी २४०० किलो केसर आंबा अमेरिकेला निर्यात केला. या वर्षी त्यांना प्रति डझन ८५० ते ९०० रुपये एवढा दर मिळाला. सेंद्रिय आंब्याला ३५ टक्क्यांपर्यंत अधिक दर मिळतो.

-दोन टन आंब्यावर अन्य प्रक्रिया उद्योजकाकडून प्रक्रिया करून घेतात. या सेंद्रिय आंबा पल्पचीही विक्री केली जाते.

भात पिकातही सेंद्रियचा अवलंब

एक एकर क्षेत्रावर रत्नागिरी ७, लालभात या जातींची लागवड असते. भात लागवडीसाठी मे महिन्यात नांगरणी करून ठेवली जाते. ३ फूट रुंदीचे गादी वाफे तयार करून भाताची रोपवाटिका बनवली जाते. त्यात कंपोस्ट खते एकरी ५०० किलो प्रमाणे मिसळली जातात. २१ दिवसांनी भात रोपांची एसआरटी पद्धतीने पुनर्लागवड करतात. लागवडीनंतर १५ दिवसांनी बॅक्टेरिया कन्सोंर्शियम मिश्रणाची फवारणी करतात. जमिनीत फॉस्फरस कमी असल्याने त्याच्या पूर्ततेसाठी ओवा, मोहरी, करंज, एरंडी पेंड अशा एकत्रित मिश्रणाचा वापर करतात. सर्वसाधारणपणे एकरी साडेतीन हजार किलो भात मिळते. या तांदळाला सुमारे ६० ते ७५ रुपये प्रति किलो दर मिळतो. तसेच दरवर्षी अडीच एकर नाचणी आहे.

गजेंद्र सुरणाची लागवड

गजेंद्र सुरणाची लागवड करून त्याचे बेणे पुरवण्याचा परवाना शेखर विचारे यांना मिळाला आहे. आत्मा योजनेतून हे बेणे शेतकऱ्यांना दिले जाते. सुमारे १ एकर क्षेत्रामध्ये ७५ सेंमी बाय ७५ सेंमी अंतरावर सरी वरंबा पद्धतीने ४०० ग्रॅमचा एक गड्डा या प्रमाणे लागवड केली जाते. १५ दिवसांनंतर त्याला सेंद्रिय खताची मात्रा दिली जाते. एकरी सुमारे साडेसात टन उत्पादन मिळते. त्याला बेण्यासाठी सुमारे ७० रुपये किलो प्रमाणे दर मिळतो.

-सुरणाबरोबरच मिरची, वांगी, ढोबळी मिरची, हळद, आले, झेंडू यांची रोपवाटिका करतात. प्रत्येकी दहा हजार रोपांची विक्री दरवर्षी करण्याचे नियोजन असते.

- शेतीमधील त्यांच्या कामाची दखल राज्य शासनाने घेतली असून, २०१८-१९ चा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ ही त्यांना मिळाला आहे.

-२०२१ मध्ये शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून जिल्हाधिकाऱ्यामार्फत नियुक्ती केली आहे.

कीड, रोग आल्यानंतर व्यवस्थापनाचे नियोजन करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक व्यवस्थापनावर माझा भर असतो. गेल्या काही वर्षांत याच तत्त्वामुळे दर्जेदार हापूस आंबा उत्पादन घेत आहे. त्यांचा प्रादुर्भाव रोखणे हाच सेंद्रिय शेतीचा गाभा आहे. झाडे, रोपे सशक्त ठेवल्यास रोगांसाठी प्रतिकारशक्ती मिळते. पुढील नियोजनामध्ये आंबा व कोकणातील फळांच्या प्रक्रियेवर भर देणार आहे.
शेखर विचारे, ९८२२०५६७९९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com