
ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. केंद्रातर्फे चार वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकांत ‘बीबीएफ’ (BBF Technique) म्हणजेच रुंद वरंबा सरी (Broad Bed Furrow) पध्दतीच्या तंत्रज्ञानाचे प्रयोग वा प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. केव्हीके तर्फे खरिपात (Kharif Season) सुमारे १५ गावांत ५० हेक्टरवर हे तंत्र कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), मका (Maize), उडीद, मूग आदी पिकांत राबविले. भडगाव तालुक्यातील अंतुर्ली, भडगाव, पिचर्डे, सुसरी (ता.भुसावळ) करंज, ममुराबाद व चोपडा तालुक्यांचा त्यात समावेश राहिला.
केव्हीकेचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती यांच्या मार्गदर्शनात विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ (विस्तार) विशाल वैरागर, भडगाव येथील तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी त्याबाबत हिरिरीने कार्यवाही केली.
‘बीबीएफ’चे झाले असे फायदे
जिल्ह्यात काळी कसदार जमीन तापी, गिरणा नदीकाठी आहे. केव्हीकेचे प्रक्षेत्रही सुपीक, काळ्या कसदार जमिनीचे आहे. या जमिनीत पाणी साचले तर पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती असते. अति पावसात उत्पादन ६० ते ७० टक्के कमी येते. अनेकदा चाराही हाती येत नाही. या पार्श्वभूमीवर
‘बीबीएफ’ चे आढळलेले फायदे पुढीलप्रमाणे.
-ट्रॅक्टरचलित यंत्राचा अधिकाधिक वापर झाला.
-कापूस, कांदा, सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद, मूग, ज्वारी यांची पेरणी करता आली.
-सुरवातीला कमी पाऊस होता. पण ओळीच्या बाजूने सरी केल्याने पाणी मुरण्यास मदत झाली. ओलाव्याने पिकाची वाढ झाली. पाण्याचा ताण दिसला नाही.
-यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढील १५ दिवस सतत पाऊस होता. या वेळी अतिरिक्त झालेले पाणी रुंद वरंब्यातून सरीद्वारे शेतातून बाहेर निघून जाण्यास मदत झाली. पावसात अनेकदा मातीचा सुपीक थर वाहून जातो. तो वाचविणे शक्य झाले.
-मूलस्थानी जलसंधारणाचा फायदा मिळाला. माती भुसभुशीत राहिली. परतीच्या पावसाच्या पाण्याचे सरीत संवर्धन होईल.
-हवा खेळती राहिल्याने पिकांची चांगली वाढ झाली. सुधारित पद्धतीने लागवड केल्याने रोपांची संख्या योग्य राखता आली. उत्पादनात १५ ते ३० टक्के वाढ झाली.
बियाण्यात बचत, उत्पादन वाढ
सोयाबीन किंवा हरभऱ्यासाठी एकरी सुमारे ३० किलो बियाणे प्रचलित पेरणी पद्धतीत लागते. अनेकदा शेतकरी ३५ किलोपर्यंतही वापर करतात. मात्र ‘बीबीएफ’ यंत्रामुळे एकरी २० ते २२ किलोपर्यंतच बियाणे लागले. म्हणजेच एकरी आठ ते १० किलो बियाण्याची बचत व त्यावरील २५ टक्के खर्च वाचविता आला. गेली दोन वर्षे अति पाऊस असतानाही केवळ या तंत्राचे फायदे होऊन सोयाबीनचे एकरी सात क्विंटल उत्पादन साध्य करता आले.
शेतकरी अनुभव
कपाशी वाचली
ममुराबाद येथील मनोज चौधरी म्हणाले, की मागील पाच हंगाम कापसाची लागवड बीबीएफ तंत्राने करीत आहे. यंत्रात सुधारणा केली आहे. त्याद्वारे ठिबकच्या नळ्याही शेतात अंथरतो. मजुरीचा खर्च व वेळही वाचतो. मागील तीन वर्षे अतिवृष्टी झाली. तशातही कापसाचे पीक या तंत्राने वाचविले. अतिपावसात एकरी सात क्विंटल उत्पादन हाती आले. या तंत्राचा अवलंब केला नसता तर एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन आले असते. कारण जमीन काळी कसदार असून लवकर वाफसा येत नाही. मागील दोन वर्षे कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल दर जागेवर मिळाला. एकरी निव्वळ ४० हजार रुपये नफा हाती राहिला. उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ दिसत आहे. बियाणे व उत्पादन खर्चात २० ते २५ टक्के बचत झाली आहे.
मनोज चौधरी- ९९२२०५९४९४
सोयाबीन हाती लागले
अंतुर्ली (ता. भडगाव) येथील विनोद पाटील म्हणाले, की मागील दोन हंगाम सोयाबीन पीक ‘बीबीएफ’मुळे अतिपावसातून वाचवता आले. बियाणे व मजुरीवरील २० ते २५ टक्के खर्च कमी झाला आहे. ‘बीबीएफ’ तंत्राविना मागील दोन वर्षे एकरी फक्त दीड क्विंटल सोयाबीन हाती आले असता. परंतु ‘बीबीएफ’मुळे एकरी चार क्विंटल उत्पादन साध्य झाले. मागील दोन हंगाम सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. दरवर्षी मका, मूग यांची देखील प्रत्येकी दीड एकरांत या तंत्राद्वारे पेरणी करतो. त्यातून उत्पादन २० ते २८ टक्के वाढल्याचे आढळले. कमी खर्च, कमी वेळेत पेरणी, आंतरमशागत सोपी झाली आहे. माझ्या प्रयोगांची प्रेरणा घेत इतरांनीही या तंत्राचा वापर सुरू केला आहे. आम्ही शिवछत्रपती शेतकरी गटाच्या माध्यमातून बीबीएफ यंत्र आणले आहे. ते शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करतो. यंदा अतिवृष्टीतही या तंत्राद्वारे पेरणी केलेली पिके जोमात आहेत.
विनोद पाटील ः ९४२२१८६६७४
ट्रॅक्टरचलित बीबीएफ टोकण यंत्राविषयी...
-हैदराबाद येथील मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्थेकडून यंत्र विकसित.
-कापूस, कांदा, सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांत वापर करता येतो.
-बियाणे व खत पेटी, मुख्य सांगाडा, पीकनिहाय बियाणे तबकड्या, नळ्या, दाते, गती देणारी यंत्रणा, चाके आदी भाग. छोट्या व मोठ्या ट्रॅक्टरसाठी विविध आकार.
-दोन ओळींतील अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते.
-पारंपरिक पद्धतीपेक्षा या यंत्राच्या साह्याने पेरणी खर्चात ३० ते ४० टक्के बचत. यंत्राची कार्यक्षमता ०.३३ ते ०.३६ हेक्टर प्रति तास.
संपर्क ः वैभव सूर्यवंशी
विषय विशेषज्ञ, केव्हीके, ममुराबाद
९७३०६९६५५४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.