Dairy Business : संघर्षातून सांभाळली शेती, दूध व्यवसाय

करंजी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील द्वारकाबाई बाबासाहेब अकोलकर यांनी पती निधनानंतर खचून न जाता शेती, पशुपालन व्यवसाय चांगल्या पद्धतीने सांभाळला. दोन म्हशींपासून सुरू झालेले पशुपालन आज अठरा म्हशींपर्यंत विस्तारले आहे. कष्टाने जिरायती शेती बागायती केली. प्रतिकूल परिस्थितीत संसार आणि शेती सावरणाऱ्या द्वारकाबाईंचा संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

नगर जिल्ह्यातील पाथर्डी हा दुष्काळी (Drought) तालुका. एखाद्या भागाचा अपवाद वगळता बहुतांश गावांत शाश्‍वत पाणीपुरवठा (Water Supply) नसल्याने शेती जिरायती. त्यामुळे अनेक शेतकरी पूरक उद्योग (Agri Based Business) म्हणून दूध व्यवसाय (Dairy Business) करतात. यापैकीच एक आहे करंजी (ता. पाथर्डी) येथील द्वारकाबाई बाबासाहेब अकोलकर यांचे कुटुंब. त्यांना सुभाष आणि राजेंद्र ही मुले. त्यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे.

साधारण तीस वर्षांपूर्वी उमेदीच्या काळात पती बाबासाहेब यांचे निधन झाले. त्या वेळी मोठा मुलगा सुभाष नऊ वर्षांचा आणि राजेंद्र अवघ्या दहा महिन्यांचा होता. पतीच्या अचानक जाण्याने द्वारकाबाईंवर संकट कोसळले. मुलांसह शेती सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर पडली. मात्र द्वारकाबाई खचून गेल्या नाही. त्यांनी पशुपालन आणि शेती सांभाळत संघर्षातून वाटचाल सुरू ठेवली.

दोन म्हशींपासून सुरुवात

अकोलकर कुटुंब तसे पूर्वीपासून दूध व्यवसायात होते, मात्र एक किंवा दोन म्हशी असायच्या. त्या वेळी कधीतरी द्वारकाबाईंकडे म्हशीचे दूध काढण्याची वेळ यायची. मात्र पती निधनानंतर द्वारकाबाईंनी कष्टपूर्वक दीड वर्ष दोन म्हशींचे चांगले पोषण केले. दररोज स्वतः गावात जाऊन थेट ग्राहकांना दूध विक्री सुरू ठेवली. यातून आर्थिक प्रगतीचा मार्ग दिसल्याने त्यांनी दूध व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला.

टप्प्याटप्प्याने म्हशीच्या संख्येत वाढ केली. साधारण पंचवीस वर्षे द्वारकाबाईंनी दूध व्यवसाय सांभाळला. म्हशींचे दूध काढण्यापासून ते दररोज थेट ग्राहकांना विक्रीपर्यंतचे काम त्या न थकता करत होत्या.पती निधनानंतर द्वारकाबाई यांना संघर्षाच्या काळात सासू स्व. शहाबाई यांचे चांगले पाठबळ मिळाले. त्या वयस्क असूनही एक आधार म्हणून म्हशींकडे लक्ष द्यायच्या.

गुणवत्तापूर्ण दुधाची खात्री

द्वारकाबाईंच्या संघर्षातून आज दूध व्यवसाय विस्तारला आहे. सध्या त्यांच्याकडे १८ मुऱ्हा म्हशी आणि दोन एचएफ गाई आहेत. पशुपालनाबाबत डॉ. सुभाष कासार हे त्यांना मार्गदर्शन करतात. सध्या दूध व्यवसायाची जबाबदारी मुले, सुनांकडे असली तरी वयाची साठी पार केलेल्या द्वारकाबाई आजही गरजेच्यावेळी दूध काढण्यापासून ते गोठा स्वच्छतेची सर्व कामे करण्यासाठी पुढे असतात.

Dairy Business
Dairy, Poultry : दूध, पोल्ट्री हे शेतीपूरक व्यवसायच झाले सुबत्तेचे कारण

द्वारकाबाईंचा संघर्ष अनेकांनी पाहिलाय. तीस वर्षांपासून व्यवसाय करताना त्यांनी दुधाचा दर्जा कायम टिकवून ठेवला आहे. तीस वर्षापूर्वी दोन म्हशीपासून दहा लिटर दूध उत्पादन व्हायचे. दररोज ग्राहकांना न चुकता त्यांनी दुधाचे रतीब सुरू ठेवले. आता दररोज १०० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. त्यातील ४० लिटर दुधाची करंजी गावात थेट ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांना विक्री होते.

उर्वरित दूध नगर येथे प्रक्रिया उद्योगांना दिले जाते. दर्जा टिकून असल्याने दुधाला चांगली मागणी आहे. घरच्या शेतीतून पुरेशा प्रमाणात वर्षभर चारा उपलब्धता आणि घरचे मनुष्यबळ यामुळे व्यवस्थापनाचा खर्च मर्यादित आहे. पशुपालनासाठी मजुरांची गरज भासत नाही. सध्या गावामध्ये ५५ रुपये आणि नगरमध्ये ६२ रुपये प्रति लिटर दराने दुधाची थेट विक्री होते. दूध आणि शेणखत विक्रीचा हिशेब पाहता महिन्याला सरासरी तीस हजारांची उलाढाल होते.

Dairy Business
Dairy Product : मलईरहित दही, ताक आरोग्यासाठी चांगले

जमीन केली बागायती

करंजी शिवारात कायम पाणीटंचाई. त्यामुळे द्वारकाबाई यांची सहा एकर जमीनही कोरडवाहू. पतीच्या निधनानंतर दूध व्यवसाय सांभाळताना शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पाण्याचा स्रोत असलेल्या भागात १९९७ मध्ये त्यांनी दोन गुंठे जमीन खरेदी करून विहीर खोदली. मजुरांसोबत त्यांनीही विहीर खोदाईमध्ये काम केले.

या विहिरीच्या पाण्यावर टप्प्याटप्प्याने तीन एकर बागायती झाली. पुढे दहा वर्षांनंतर परत दुसऱ्या तीन एकर क्षेत्रात विहीर पाडून जमीन बागायत केली. या काळात मुलगा सुभाष याची शेती तसेच दूध व्यवसायातील कामांना मदत होऊ लागली आणि हळूहळू संसार स्थिरस्थावर झाला. आता शेती आणि दूध व्यवसाय दोन्ही मुले पाहतात. दूध व्यवसायाच्या जोरावर राजेंद्र यांचे शिक्षण झाले. नातवंडेदेखील चांगल्या शाळेत शिकत आहेत.

Dairy Business
Dairy : पत्नीच्या खंबीर साथीमुळेच प्रगतिशील झाले कुटुंब

चारा पिकांवर भर ः

करंजी गावशिवारात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा, मोसंबी, सीताफळाची लागवड आहे. त्यामुळे फळबागांचे गाव म्हणूनच या परिसराची ओळख आहे. द्वारकाबाईंकडे त्याकाळी शेतीत कसायला मनुष्यबळ नसल्याने फळबागांचे उत्पादन घेणे शक्य नव्हते. तीस वर्षांपूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलाने केली जायची.

करंजी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर द्वारकाबाई यांचे माहेर. त्यामुळे त्यांचे बंधू आणि अन्य नातेवाईक शेतीमधील मशागतीला मदत करत. त्यामुळे आधार मिळे. त्या काळात कांदा, तूर लागवडीवर त्यांचा भर होता. पुढे विहिरीमुळे पाणी उपलब्ध झाल्याने बागायती वाढू लागली. म्हशींची संख्या वाढल्याने त्यांनी संपूर्ण सहा एकरांवर चारा लागवड केली आहे. कुटुंबापुरती काही क्षेत्रावर गहू आणि बाजरी लागवड केली जाते.

शेणखत विक्रीतून वाढवला नफा ः

द्वारकाबाई यांनी विस्तारलेल्या पशुपालन व्यवसायाने अकोलकर कुटुंबाला आर्थिक सुबत्ता मिळाली. सध्या त्यांच्या गोठ्यातून दरवर्षी सुमारे ४० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील दहा ट्रॉली खत स्वतःच्या शेतीमध्ये वापरतात. उर्वरित तीस ट्रॉली शेणखत परिसरातील शेतकऱ्यांना साडेपाच हजार रुपये प्रति ट्रॉली या दराने विक्री करतात. यातूनही चांगली मिळत होते.

संपर्क ः सुभाष अकोलकर (द्वारकाबाईंचे चिरंजीव), ७४९८२०७१४१

आई आमची प्रेरणास्रोत... ‘‘लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. आईने संघर्ष करून शेती आणि दूध व्यवसाय टिकवूनच ठेवला नाही तर तो वाढवला. आम्हा मुलांना शिक्षण दिले. मी तीन वर्षे कंपनीत नोकरी केली, पण ती सोडून आता घरच्या दूध व्यवसायात आहे. आई आमच्यासाठीच नाही, तर संकटात सापडलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे.’’ -
राजेंद्र अकोलकर
‘‘उमेदीच्या काळात संकट ओढावले तर महिलेस अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. मी पतीच्या निधनानंतर खचून न जाता हिमतीने उभे राहिले. मुले लहान होती. याकाळात सासू आणि नातेवाइकांची मदत झाली. मात्र प्रतिकूल परिस्थितीतून दूध व्यवसाय, शेती सांभाळावी लागली. त्या वेळी हिमतीने उभी राहिल्यामुळे आता मुलांचा सुखी संसार पाहायला मिळत आहे.’’
द्वारकाबाई अकोलकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com