
नगर जिल्ह्याचे दुग्ध व्यवसायात (Dairy) महत्त्वाचे स्थान आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे सोळा लाखांपेक्षा अधिक पशुधन (Livestock) (गाय व म्हैस मिळून) या जिल्ह्यात आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. दिवसाला एकूण चाळीस लाख लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन (Milk Production) होते. राहाता, राहुरी, संगमनेर, नेवासा, अकोले, श्रीरामपूर, पारनेर, श्रीगोंदा, नगर या तालुक्यांत जनावरांची संख्या आणि दूध उत्पादन अधिक आहे. जिल्ह्यात दर वर्षाला ९५ लाख टन चारा लागतो. यंदा तो ८० लाख टनांच्या जवळपास
उपलब्ध झाला. तरीही चाराटंचाई झाली नाही. त्याचे कारण असे, की अलीकडील आठ ते दहा वर्षांपासून चाराटंचाईवर मात करण्यासाठी मुरघास तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.
मुरघास तंत्रज्ञान
मुरघास तंत्रज्ञानात (Silage Technology) सुधारित व यांत्रिकीकरण आले आहे. यात कापणी केलेल्या चाऱ्यातील आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांवर आणण्यासाठी वैरण सावलीत वाळविली जाते. चाऱ्याची यंत्राद्वारे कुट्टी केली जाते. त्यानंतर सायलो पीटमध्ये (चारा साठवून ठेवण्याची जागा) दोन फुटांपर्यंत भरणी होते. मळी अथवा गुळाच्या पाण्याची (वजनाच्या एक टक्का) प्रक्रिया होते. अलीकडील काळात यीस्ट कल्चरचाही वापर होत आहे. त्यानंतर भरलेल्या चाऱ्यावर ट्रॅक्टर, रोलर किंवा जड वस्तूद्वारे दाब दिला जातो. कोंडा वापरूनही मुरघासाची प्रत वाढवता येते. त्यानंतर प्लॅस्टिकचा वापर करून मुरघास हवाबंद केला जातो. त्यावर जड वस्तू ठेवण्यात येते. सायलो पीटसाठीची जागा उंचावर असावी लागते. जेणे करून पाणी साचणार नाही व भिंतीतून पाणी झिरपणार नाही याची काळजी घेतली जाते. जनावरे बांधण्याच्या जागेपासून हे ठिकाण सहा ते दहा फूट दूर असावे लागते. मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, गिनी गवत आदींचा वापर करताना त्यातील प्रथिने, शुष्क पदार्थ यांचे प्रमाण तपासावे लागते. गवत व्दिदल असल्यास ३५ किलो व एकदल असल्यास १८ किलो प्रति टन उसाची मळी कुट्टीत वापरल्यास प्रत सुधारून उत्तम परिणाम साधता येतो.
मुरघास करण्याच्या पद्धती
-एक मिमी. जाडीचे प्लॅस्टिक जमिनीवर अंथरून कुट्टी केलेल्या चाऱ्याचे थर रचतात. त्यावर दाब देऊन प्लॅस्टिक हवाबंद करण्याची साधी पद्धत वापरली जाते.
-बंकर सायलो पद्धतीत जमिनीच्या वर अर्धा व त्याखाली अर्धा भाग बांधण्यात येतो. तीनही बाजूंच्या भिंती लाकडी किंवा कॉँक्रीटच्या असतात. ही खर्चिक पद्धत असली तरी सुरक्षित असून, अनेक शेतकरी त्याचा वापर करतात.
-खड्डा, नाली पद्धतीत आतील बाजूला कॉँक्रीटीकरण केले जाते. कुट्टी भरल्यावर वरचा भाग प्रथम वाळलेला चारा व त्यावर प्लॅस्टिक किंवा उपलब्ध वस्तूचा वापर करून हवाबंद केला जातो. मात्र या पद्धतीत पावसाळ्याचे पाणी शिरण्याचा धोका असतो.
-मजबूत पॉलिप्रॉपिलीनच्या व आतील बाजूला १ मिमी. जाडीच्या प्लॅस्टिक बॅगेचाही बऱ्यापैकी वापर होत आहे. त्यात ५०० ते एक हजार किलोपर्यंत मुरघास भरला जातो. बांबू, लाकूड, लोखंडाचा वापर करून जाळीदार सायलोचा वापर करता येतो. मात्र ही पद्धत फारशी टिकाऊ नाही. कारण मुरघास चांगल्या प्रकारे दाबला जात नाही. हवा राहिल्याने खराब होण्याची शक्यता असते.
-अधिक प्रमाणात मुरघास तयार करण्यासाठी टॉवर सायलोचा वापर करण्याची पद्धत आहे. जमिनीच्यावर गोल किंवा चौकोनी
आकाराचे बांधकाम करून त्यात कुट्टी भरली जाते. मात्र ही पद्धत खर्चिक आहे.
-अलीकडच्या काळात सायलेज बेलर यंत्राचा (गाठीनिर्मिती) वापर करून मुरघास तयार करण्याची पद्धत रुजत आहे. प्रति बॅगेची क्षमता ९० ते १०० किलोपर्यंत आहे.
दुष्काळात मोठा आधार
नगर जिल्ह्यात दहा वर्षांत तीन ते चार वेळा तीव्र दुष्काळ पडला. पाणी आणि चाराटंचाईमुळे पशुधन धोक्यात आले. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागल्या. अशा काळातही मुरघास तंत्रज्ञान वापरामुळे असंख्य शेतकऱ्यांना दुष्काळात चाऱ्याचा आधार मिळाला. तीन लाखांपेक्षा अधिक दुभती जनावरे वाचली. दुग्ध व्यवसाय टिकवता आला. तीन वर्षांपूर्वी उसाच्या वाढ्यापासून मुरघास तयार करण्याचा प्रयोगही जिल्ह्यात झाला होता.
तरुणांना रोजगार
जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजयकुमार कुमकर म्हणाले, की जिल्ह्यातील सुमारे दहा तालुक्यांत मुरघास तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जात आहे. त्याचा होत असलेला फायदा पाहता सात वर्षांत तंत्रज्ञानाचा वापर ५० ते ६० टक्क्यांनी वाढला आहे. निश्चित आकडेवारी नसली तरी अभ्यासकांच्या मते राज्यात सर्वाधिक म्हणजे वर्षभरात दोन ते अडीच लाख टन मुरघास एकट्या नगर जिल्ह्यात तयार केला जात असावा. अनेक तरुणांनी त्यासाठीची आधुनिक यंत्रे घेतली आहेत. तरुणांसाठी ते रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.
आधुनिक बेलर यंत्राची सेवा
दुधेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे (निमगाव जाळी, ता. संगमनेर) अध्यक्ष किरण अडगडे म्हणाले, की आमच्या कंपनीने ट्रॅक्टरचलित सायलेज बेलर यंत्र घेतले आहे. सुमारे साडेचौदा लाख रुपये त्याची किंमत आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदानही मिळाले आहे. आमचे सभासद व अन्य शेतकरी असे मिळून सुमारे दोनशे जणांना या तंत्राची सेवा देत आहोत. शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोंगणी करण्यापासून चाऱ्याची कुट्टी करणे, गाठी तयार करणे व प्लॅस्टिकच्या पिशवीत भरणे अशी सगळी कामे केली जातात. त्यासाठी सुमारे १५ मजुरांची मदत आम्ही घेतो. दिवसाला ६०० पर्यंत गाठी तयार करण्याची यंत्राची क्षमता आहे. प्रति किलो एक रुपये असे शुल्क त्यासाठी घेतले जाते.
यामध्ये वापरली जाणारी प्लॅस्टिक बॅग ‘यूव्ही स्टॅबिलाइज्ड’ असल्याने बाहेरील वातावरणाचा त्यावर परिणाम होत नाही. आमच्या अनुभवात सुमारे दोन वर्षे तरी मुरघास या तंत्राने चांगल्या प्रकारे टिकून राहिल्याचे आढळले आहे. प्रचलित प्लॅस्टिक बॅगेत चारा खराब होण्याचे प्रमाण १० टक्के असू शकते. ते या तंत्रात होत नाही.
संपर्क ः किरण अडगडे, ९९२१२५५५५१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.