शिंदेंच्या सुना बनल्या भाजीपाला बीजोत्पादनाचा कणा

भराडखेडा (ता. बदनापूर, जि. जालना) येथील शिंदे कुटुंब सुमारे १४ वर्षांपासून शेडनेटमधील शेतीमध्ये रमले आहे. शेडनेटमध्ये मिरची, कारली, टोमॅटो, काकडी बीजोत्पादन सातत्य ठेवण्यासाठी सौ. दुर्गा प्रकाश शिंदे आणि सौ. अंजली बालाजी शिंदे या दोन सुनांनी पुढाकार घेतला आहे. परपरागीकरणासारख्या तांत्रिक कामामध्ये प्रावीण्य मिळवीत बीजोत्पादनातून कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
Vegetable Seed Production
Vegetable Seed ProductionAgrowon

भराडखेडा (ता. बदनापूर, जि. जालना) या गावातील साहेबराव शिंदे यांच्या कुटुंबात पत्नी सौ. पार्वतीबाईसह प्रकाश, बालाजी ही दोन मुले, सूनबाई सौ. दुर्गा, सौ.अंजली आणि नातवंडे असं एकत्र कुटुंब. शिंदे कुटुंबाकडे ११ एकर शेती आहे. यामध्ये पाच एकर मोसंबी (Sweet Orange), दोन एकर सीताफळ (Custard Apple) आणि एक एकरावर केसर आंबा (Kesar Mango) आणि एक एकरावर बीजोत्पादनासाठी चार शेडनेट आहेत. तत्पूर्वी पारंपरिक पिकातून (Traditional Crop) अर्थकारण सुधारत नसल्याने साहेबरावांचा मोठा मुलगा प्रकाश यांना प्रसंगी शेत मजुरी तसेच कंपनीत कामाला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु टप्याटप्याने पीक पद्धतीमध्ये (Crop Diversification) स्वीकारलेला बदल शिंदे कुटुंबीयांसाठी फायद्याचा ठरला.

सासूरवाडीतून मिळाला वारसा

तपोवन (जि. जालना) हे गाव प्रकाश शिंदे यांची सासुरवाडी. प्रकाश शिंदे यांच्या सासूरवाडीमध्ये शेडनेटमध्ये भाजीपाला बीजोत्पादनाचा (Vegetable Seed Production) कार्यक्रम राबविला जात होता. प्रकाशरावांची पत्नी सौ. दुर्गा यांना माहेरच्या संरक्षित शेतीतील बीजोत्पादनाची (Seed Production) बाराखडी अवगत होती. त्यामुळे २००८ मध्ये प्रकाशरावांनी नातेवाईक शेतकरी आणि बियाणे कंपनीच्या (Seed Company) सल्ल्याने शेडनेटमधील बीजोत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने बीजोत्पादनामध्ये त्यांनी हातखंडा मिळविला. वर्षभरातील नऊ महिने कुटुंबातील सहा जण आणि किमान ६ ते १० मजुरांना शाश्‍वत रोजगार (Employment) उपलब्ध झाला आहे.

Vegetable Seed Production
Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

पहिल्यावेळी शिंदे कुटुंबाने बियाणे कंपनीकडून मिळालेल्या कारले बीजोत्पादन कार्यक्रमात १० गुंठे शेडनेटमधून १ क्‍विंटल ८८ किलो बियाणे उत्पादित केले. सौ. दुर्गा आणि शिंदे कुटुंबाचे कष्ट लक्षात घेऊन कंपनीने भराडखेड्यात त्यांच्याकडे एकमेव शेडनेटमधील बीजोत्पादन कार्यक्रम सुरू ठेवला. पहिल्या टप्प्यात शिंदे कुटुंबीयांनी लाकडी ढाच्यावर कंपनीने दिलेले शेडनेट वापरून ९ वर्षे बीजोत्पादन घेतले. दरवर्षी शेडनेट उभे करायचे आणि बीजोत्पादन घेतले की मोडायचे अशा पद्धतीने नियोजन होते. पहिल्या तीन वर्षांत त्यांनी कंपनीच्या शेडनेटची रक्‍कम तीन टप्प्यांत भरली. गेल्या ५ वर्षांपासून जीआय पाइपच्या साह्याने प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावरील चार शेडनेटमधून ते बीजोत्पादन कार्यक्रम राबवीत आहेत.

Vegetable Seed Production
Exotic Vegetable : परदेशी भाज्यांच्या शेतीत मिळवले नंबरी नाव

महिलांकडे बीजोत्पादनाची जबाबदारी

शिंदे कुटुंबातील सौ. दुर्गा आणि सौ. अंजली या दोन्ही सुनांकडे भाजीपाला बीजोत्पादनाची जबाबदारी आहे. उपलब्ध महिला मजुरांसह रोप लागवड, रोपांची बांधणी, रोपांची फूट काढणे, परपरागीकरण करणे, फळ तोडणी, बी काढणे, काढलेले बियाणे पाण्याने स्वच्छ करणे आणि शेवटी बियाण्यामधील अयोग्य बियाणे बाजूला काढून योग्य बियाणे विक्रीसाठी तयार करण्याचे काम केले जाते. सुरुवातीस सौ. दुर्गा यांनी सर्वात किचकट अशी परपरागीकरणाची प्रक्रिया कंपनीच्या तज्ज्ञांकडून आत्मसात केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांना परपरागीकरणाचे तंत्र शिकवले. नर आणि मादी बियाणे मिसळू न देणे, विना पोलनचे बियाणे मिसळू न देणे, पिकलेल्या फळांची वेळेवरती तोडणी, शेडनेट स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी दुर्गाताई आणि अंजलीताईंकडे आहे. पहिली दोन वर्षे बीजोत्पादनात अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत दर्जेदार बीजोत्पादनात शिंदे कुटुंबाने हातखंडा मिळविला आहे. टप्प्याटप्प्याने चार शेडनेट तयार करून वर्षभर एकापेक्षा अधिक पिकांचे बीजोत्पादन करण्याची क्षमता शिंदे कुटुंबीयांमध्ये तयार झाली आहे.

पिकांचे नियोजन ः

शिंदे कुटुंबीय शेडनेटमध्ये जूनमध्ये एका प्लॉटमध्ये मिरची आणि तीन प्लॉटमध्ये कारले बीजोत्पादन घेतात. हा कालावधी सप्टेंबरपर्यंत असतो. त्यानंतर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये दोन प्लॉटमध्ये टोमॅटो आणि दोन प्लॉटमध्ये झेंडू बीजोत्पादन घेतले जाते. बीजोत्पादनासाठी कंपनीशी करार केला जातो. दर निश्‍चिती तसेच गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादनामुळे दरवर्षी बिजोत्पादन कार्यक्रम यशस्वी होतो. प्रत्येकी १० गुंठ्यांच्या शेडनेटमध्ये मिरची प्लॉटसाठी ५० ते ६० हजार, कारले प्लॉटसाठी ३० ते ३५ हजार, टोमॅटो प्लॉटसाठी ४० ते ५० हजार आणि झेंडू प्लॉटसाठी किमान ३५ ते ४० हजार खर्च येतो. दरवर्षी कारल्याचे ३०० किलो, मिरचीचे १२५ किलो, टोमॅटोचे ५० किलो आणि झेंडूचे १० किलो बियाणे तयार होते. मिरचीचे बियाणे यंत्राद्वारे निवडले जाते. कारल्याचे बियाणे हाताने काढले जाते. टोमॅटोचे बियाणे यंत्रामधून काढल्यानंतर ते ड्रममध्ये ठेवले जाते. त्यानंतर विशिष्ट प्रक्रियाकरून सुकविले जाते. सुकविल्यानंतर त्यामधील चांगले बियाणे काढून कंपनीला पुरविले जाते. ही सर्व कामे दुर्गाताई, अंजलीताई महिला मजुरांच्या साह्याने करतात. बियाणे कंपनीला पाठविल्यानंतर उगवणशक्‍ती आणि तांत्रिक तपासणी केल्यानंतर करारामध्ये ठरल्यानुसार दर दिला जातो.

ग्रामविकासात सहभाग ः

प्रयोगशील संरक्षित शेतीबरोबरच भराडखेडा गावच्या समाजकारणात, राजकारणातही शिंदे कुटुंबीय सक्रिय आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबातील दुर्गाताईंना ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली. गेल्या अडीच वर्षांपासून त्या गावच्या उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत.

शेतीचे नियोजन ः

- प्रकाश, बालाजी या दोन्ही भावंडांचा शेती नियोजनात चांगला समन्वय.

- सिंचनासाठी विहीर, शेततळातील पाण्याचा काटेकोर वापर. सौरपंपाचा उपयोग.

- संपूर्ण शेती ठिबक सिंचनावर. त्यामुळे पाण्यात बचत, लागवड क्षेत्रामध्ये वाढ.

- कृषी विभागाच्या योजनांचा मिळाला आधार.

- बीजोत्पादन तंत्र महिलांनी अवगत केल्याने कुटुंबाच्या अर्थकारणात सुधारणा.

- शेडनेटमधील बीजोत्पादनातून वर्षाकाठी सात लाखांची उलाढाल.

संपर्क ः सौ. दुर्गा शिंदे, ८००७६५८२५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com