Processing Industry : प्रक्रिया उद्योगाकडूनही जांभळाला मागणी

जांभळाचे आयुर्वेदिक व आहारातील महत्त्व वाढले आहे. ग्राहकांबरोबरच प्रक्रिया उद्योगाकडूनही त्यास मोठी मागणी आहे. एप्रिल ते जुलै काळात हंगाम असलेल्या जांभळासाठी पुणे बाजार समिती प्रसिद्ध बाजारपेठ आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून मुख्य आवक व्हायची. आता गुजरात राज्याने मुख्य पकड बसविली असून, कर्नाटक राज्यानेही काही हिस्सा काबीज केला आहे.
Fruit Market
Fruit MarketAgrowon

जांभूळ (Java Pulm) हे फळ म्हणजे तशी वनसंपदा असली तरी व्यावसायिक पीक (Commercial Crop) म्हणून ते आता पुढे येऊ लागले आहे. त्यातील विविध औषधी गुणधर्म (Medicinal Properties) पुढे येऊ लागल्याने ग्राहकांकडून त्यास मागणीही (Demand For Java Pulm) वाढू लागली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील मोठ्या बाजार समित्यांपैकी आहे. साहजिकच तेथे जांभळाची आवकही (Java Pulm Arrival) मोठ्या प्रमाणात होत असते. या समितीत जांभळाचा हंगाम एप्रिल ते जुलै अखेर असा असतो. अवकाळी पाऊस, मॉन्सूनच्या आगमानावर तो अवलंबून असल्याने एक-दीड महिना तो कमी अधिक प्रमाणात राहतो.

कोकणातील आवकेने आरंभ

पुणे बाजार समितीतील जांभळाचे प्रमुख अडतदार अजय घुले म्हणाले, की दरवर्षी कोकणासह गोव्यातील विविध भागांमधून एप्रिलमध्ये जांभळाची आवक (देठासहित) सुरू होते. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली परिसराचा समावेश होतो. सुरवातीला तुरळक आवक असल्याने दर तेजीत म्हणजे १०० ते १५० रुपये प्रति किलो प्रमाणे असतात. कोकणातील आवकेनंतर गुजरात राज्यातून प्रामुख्याने सुरत परिसरातील आणंद आणि भोरसर या गावांच्या १०० किलोमीटर परिघातील विविध गावांमधून जांभळे या बाजारात येतात. त्यांना ८० ते १०० रुपये दर मिळतो. कर्नाटकातील करनाळ आणि होसूर या गावांमधूनही येथे जांभळे येतात. त्यांना ६० ते ८० रुपये सरासरी दर मिळतो. जूनमध्ये पुणे आणि नगर जिल्ह्यांतून गावरान जांभळांची आवक होते. त्यांचा दर ९० ते १०० रुपये असतो.

Fruit Market
Food Processing : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

गुजराती आणि बहाडोली जांभूळ

गुजरातमधून ‘पारस’ आणि ‘गिलवरी’नामक वाणांची आवक होते. पारस जांभळाला गर जास्त आणि बी आकाराने लहान असल्याने मागणी आणि दर गिलवरीपेक्षा जास्त असतो. गिलवरी जांभळाची बी मोठी आणि गर कमी असतो. पारसला १०० ते १२० दर मिळत असेल तर गिलवरीला तो ७० ते ८० रुपये मिळतो. महाराष्ट्रातील विविध भागांमधून (कोकण, पुणे, नगर) बहाडोली जांभूळही बाजारात येत असते. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, बारामती, निरा तर नगर जिल्ह्यात शिर्डी, राहुरी परिसरात जांभळाची व्यावसायिक शेती होते. प्रति किलो ८० ते १२० रुपये दर त्यास मिळतो.

Fruit Market
Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

यंदाची स्थिती

या वर्षी पुणे जिल्ह्यात वळीवाचा पाऊस न झाल्याने आणि मॉन्सूनचा पाऊस उशिरा आल्याने जूनअखेर पर्यंत होणारी आवक १५ जुलै पर्यत सुरू राहिली. सध्याही ती सुरू आहे मात्र हंगाम संपण्याच्या टप्प्यावर आहे. फुलोरा आणि फळधारणेच्या अवस्थेत कोकणातही अवकाळी पाऊस झाला.

साहजिकच तेथील जांभळाचे मोठे नुकसान झाले. यामुळे दरवर्षी कोकणातील आवकेने होणारी हंगामाची सुरुवात यंदा कर्नाटकातील जांभळांपासून झाली. त्यामुळे दरवर्षी त्यांना मिळणारा ६० ते ८० रुपयांचा दर ९० ते ११० रुपयांपर्यंत राहिला.

प्रक्रिया उद्योगांमुळे चांगले दर

विविध लग्न समारंभ, केटरिंग व्यवसायांमध्ये विविध पेये देण्याची प्रथा सुरू झाली आहे. यात जांभळावर आधारित सरबत, आइस्क्रीम, जामून शॉट आदींचा वापर वाढतो आहे. जेली, चॉकलेटसह जम्बासव, आयुर्वेदातील आणि विशेषतः मधुमेहींसाठी विविध औषधी उत्पादनांसाठीही जांभळाला मोठी मागणी आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांकडून सुमारे ४० ते ६० टक्के खरेदी होत असून किलोला ५० ते ८० रुपये दराने खरेदी होत आहे. ‘पल्प फ्रोझन’लाही त्यामुळे चालना मिळाली आहे.

गुजराती जांभळाचे वर्चस्व

अडतदार घुले सांगतात, की सुमारे चार वर्षांपूर्वी गुजरात येथील व्यापारी युनूसभाई जांभळाचे काही बॉक्स रेल्वेने घेऊन बाजार समितीत संध्याकाळी चारच्या सुमारास आले. मात्र बाजार बंद झाल्याने त्यांनी विचारणा करत पहाटे माझ्याकडे ते विक्रीसाठी पाठविले. त्यांचा स्वाद चांगला आणि दरही कमी असल्याने ग्राहकांकडून मागणी राहिली. हळूहळू आवक वाढत गेली. आता जांभळाची सर्वाधिक बाजारपेठ गुजरातच्या जांभळाने व्यापली असून, ५० टक्के माल त्याच राज्याचा असतो. तर प्रत्येकी २५ टक्के महाराष्ट्र आणि कर्नाटकचा असतो.

संपर्क

अजय घुले, ९५११११५४४५ (अडतदार)

‘केटरिंग’ आणि आइस्क्रीम उद्योगासाठी जांभळाच्या पल्पला मागणी वाढत आहे. आम्ही बाजारभाव आणि मालाच्या उपलब्धतेनुसार खरेदी करतो. दरवर्षी साधारण ५० टन पल्प तयार करून ठेवतो. पुणे बाजार समितीतून किलोला ६० ते १०० रुपये दराने खरेदी करतो.
ज्ञानेश्‍वर पाटील, प्रक्रिया उद्योजक श्रीकृष्ण ॲग्रो कोल्ड फूड, सासवड, जि. पुणे ९८५००२७३१४
माझी स्वतःची १५० झाडे आहेत. मी परिसरातील शेतकऱ्यांकडील सुमारे एक हजार झाडांच्या जांभळांचे संकलन करून पुणे आणि मुंबईत पाठवतो. मागील वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कोकणातील जांभळाला मोहोरच आला नाही. यामुळे यंदा केवळ १० टक्केच उत्पादन मिळाले. अवकाळी पावसामुळे नुकसान सोसावे लागत आहे.
अनिरुद्ध करंदीकर मिरुखे कडाळव, ता. कुडाळ ९४२३५१११५०
आमची पाच एकरांत बहाडोली वाणाची सुमारे २५० झाडे आहेत. यावर्षी एकूण १६ टन उत्पादन मिळाले. आकारानुसार किलोला ७० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळाले. पहिल्या टप्प्यात पाऊस सुरू होण्याच्या आधी दर चांगले होते. सलग झालेल्या पावसामुळे मात्र आर्थिक नुकसान झाले.
ऋषिकेश दंडवते, राहाता, जि. नगर ९९६०७६८५५५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com