एकाच शेतात घेतले टरबुजाचे दुबार पीक

४० गुंठ्यांत १३० दिवसांत साडेचार लाखांचे उत्पन्न
Watermelon
WatermelonAgrowon

खामखेडा, ता. देवळा : येथील टरबूज उत्पादक शेतकऱ्याने (Watermelon Grower Farmer) टरबुजाच्या दुबार पिकातून (Double Crop) चांगले उत्पादन (Watermelon Crop) घेतले आहे. या प्रयोगाचे कौतुक होत आहे. महिन्याभरापूर्वी टरबूज मातीमोल भावात विक्री झाले असले तरी आताच्या पिकातून त्यांना चांगला फायदा होत आहे. त्यांना ४० गुंठ्यांत १३० दिवसांत साडेचार लाखांचे उत्पन्न झाले.

देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी नंदू बच्छाव यांनी पहिल्यांदा टरबूज काढलेल्या जागेवरच दुसऱ्यांदा टरबूज लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे. सुरुवातीला १० जानेवारीला ४० गुंठ्यांवर टरबुजाची लागवड केली होती. या क्षेत्रासाठी सुरुवातीला त्यांना शेणखत, मशागत, पेपर मल्चिंग, लागवड, रासायनिक खतांसाठी ४५ ते ५० हजार रुपये खर्च आला. लागवडीनंतर हे पीक ७० दिवसांत काढणीला आले. मार्च महिन्यात टरबूज पिकाला चांगला भाव राहिला. त्यांच्या ४० गुंठ्यांतील क्षेत्रावर ३५ टन उत्पादन घेतले. साडेअकरा रुपये दराने व्यापाऱ्याने बांधावर खरेदी केली. त्यांना खर्च वजा जाता पावणेतीन लाखांचे उत्पन्न झाले.

पीक काढल्यानंतर लगेचच त्यांनी पहिल्या पिकाचे वेल, तण काढून या ठिकाणी दुबार टरबुजाचीच लागवड केली. त्यासाठी तयार रोपांपेक्षा दुसऱ्यांदा ४ एप्रिलला थेट बियाणे लागवड केली. या पिकाची चांगली निगा राखत त्यांनी टरबुजाचे यशस्वी उत्पादन काढून दाखविले.

दुबार पिकासाठी त्यांना फक्त बियाणे व रासायनिक खतांसाठी २० हजार रुपये खर्च आला. यातून त्यांनी २० टन उत्पादन घेतले. याला ८ रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांना वडील नामदेव बच्छाव यांचे मार्गदर्शन, भाऊ दत्तात्रय बच्छाव, पुतण्या लकी बच्छाव, कुलदीप शिरोळे यांचे सहकार्य लाभले.

खर्चाची बचत

दुबार उत्पादन घेताना दुसऱ्यांदा पिकांच्या अंतर्गत मशागतीचा खर्च निम्म्याहून कमी झाला. रोपे तयार करण्यासाठीचा खर्च, लागवडीचा खर्च, खतांचा खर्च दुबार पीक घेताना वाचला.

नंदू बच्छाव, शेतकरी, खामखेडा (ता. देवळा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com