Indigenous Cow Rearing : पुरंदरच्या फडतरे बंधुंचा देशी गोवंश पालनाचा यशस्वी प्रयोग

‘पुरंदर नॅचरल शेती गटा’ च्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला पुढे नेताना पुणे जिल्ह्यातील बोपगांव( ता. पुरंदर) येथील ज्ञानेश्‍वर फडतरे यांनी देशी गोवंश पालनाला चालना दिली आहे. सध्या त्यांच्याकडे नऊ गीर गायींचे पालन होत असून दररोज उपलब्ध होणाऱ्या दुधाला रतीबाद्वारे थेट विक्री व्यवस्था तयार केली आहे.
Dise Go Palan
Dise Go PalanAgrowon

Success Story : पुणे जिल्ह्यातील बोपगाव (ता. पुरदंर) येथील ज्ञानेश्‍वर आणि विठ्ठल या फडतरे या बंधूंची नऊ एकर शेती आहे. त्यामध्ये सीताफळ, विविध फुले, वाटाणा, कडधान्ये, गहू, हरभरा आणि भाजीपाला अशी पिके (Vegetable Crop) घेतली जातात.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी गीर गाय संगोपनाला २०१७ मध्ये सुरवात केली. पूर्वी रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे शेतीचा पोत कमी होत चालला होता. उत्पादन खर्च वाढत होता. शेतमालाला समाधानकारक दर मात्र मिळत नव्हते.

त्यामुळेच सेंद्रिय शेतीकडे फडतरे यांचा कल होता. त्यातूनच त्यांनी पुरंदर नॅचरल शेतकरी गटाची स्थापना केली. त्या माध्यमातून २२ शेतकऱ्यांचे संघटन केले. गटाद्वारे प्रत्येकी एक गाय खरेदी करून उपलब्ध होणारे शेणखत आणि गोमूत्र यांचा शेतात वापर करण्याचे नियोजन केले.

पहिल्या टप्‍प्यात गायींची खरेदी करून भांडवल गुंतवण्यापेक्षा गटातील शेतकऱ्यांकडून पैसे उभारून १३ लहान वासरे खरेदी करण्यात आली. आज टप्प्याटप्यातून २८ गायींपर्यंत विस्तार झाला आहे. गटातील सदस्यांकडे त्यांचे संगोपन केले जात आहे.

Dise Go Palan
Go Shala : कणेरीत देशभरातील गो-वंशांचा मेळा

फडतरे यांचे गोपालन

दोन्ही फडतरे बंधू, आई असे घरातील सदस्य गोठा व्यवस्थापन पाहतात. शिवाय एक कुटुंबही तैनात केले आहे. सकाळी आणि सांयकाळी सहाच्या दरम्यान दूध काढले जाते. गायींना माळरानावर चारण्यासाठी नेले जाते.

हिरवा चारा अखंड मिळावा यासाठी हत्ती गवत आणि उसाची लागवड गटातील एका सदस्याच्या शेतात तीन एकरांवर केली आहे. गरजेनुसार मुरघास तयार केला जातो.

देशी गोवंशाला दूध तुलनेने कमी असते. पण सातत्य राखण्यासाठी नियमित वैद्यकीय उपचार,लसीकरणासह मिनरल मिक्चर, गाभण काळातील आहार यांची काटेकोर काळजी घेतली जाते.

दूध संकलन व विक्री

सध्या फडतरे यांच्याकडे नऊ गीर गायी आहेत. प्रति गाय दोन्ही वेळचे मिळून सुमारे तीन ते पाच लिटरपर्यंत दूध देते.

वर्षभराची सरासरी लक्षात घेता दिवसाला १५ लिटर व कमाल ३० लिटर पर्यंत दूधसंकलन होते. सासवड परिसरात थेट ग्राहकांना रतीब घातले जाते. सुमारे ११ ते १२ ग्राहक आहेत. प्रति लिटर ८० रुपये दर ठेवला आहे.

Dise Go Palan
Go Shala : कणेरीत देशभरातील गो-वंशांचा मेळा

पूरक उत्पन्न

महिन्याला सुमारे सात ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. घरच्या शेतीत वापर करून उर्वरित खताची विक्री ५००० रुपये प्रति ट्रॉली दराने कली जाते. शेणखताच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्याबरोबर उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

गटातील काही शेतकरी शेण व गोमूत्रापासून गोअर्क, दंतमंजन, साबण आदी उत्पादने तयार करतात. फडतरे देखील यातील काही घटक तयार करतात. काही दुकानांमधून तसेच थेट या पद्धतीने विक्री होते. त्यातून महिन्याला पाचहजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

भविष्यात गटातील सदस्यांकडील गायींचे दूध संकलन करून प्रक्रिया आणि डेअरी सुरू करण्याचे नियोजन आहे. गटातील सदस्यांची मिळून सुमारे ६० एकर शेती सेंद्रिय पद्धतीखाली येत आहे. पीजीएस प्रमाणपत्र मिळाल्याचे ज्ञानेश्‍वर सांगतात.

सन २०१७-१८ या वर्षी राज्य शासनाचा उत्कृष्ट शेतकरी गट आणि २०१८-१९ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट गट पुरस्कार मिळाला आहे.

गटाने ८० बाय ३० फूट आकाराच्या सामुहिक गोठ्याची संकल्पना राबविली. मात्र चारा टंचाईमुळे गायी माळरानावर चरण्यासाठी नेण्यासाठी अंतर जास्त होते. आता प्रत्येक सदस्यांकडे गायी दिल्या आहेत.

संपर्क - पुणे - ज्ञानेश्‍वर फडतरे, ७२१८७३६९३९, (बोपगांव, ता.पुरंदर) - देशी गोवंश पालन यशोगाथा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com