Vegetable Production : बारमाही भाजीपाला उत्पादनातून उंचावले अर्थकारण

आलेगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील मोरे कुटुंबीयांनी पारंपरिक शेतीला बारमाही भाजीपाला आणि फळ शेतीची जोड दिली आहे. त्यातून नियमित उत्पन्न सुरू झाले आहे. यातून येणाऱ्या फायद्यातून त्यांनी गोदाम उभारणी, पशुपालन सुरू केले. तर कृषी निविष्ठा विक्री व्यवसायाला आवश्यक खेळते भांडवल उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रमांतून आपले अर्थकारण उंचावले आहे.
Vegetable Production
Vegetable ProductionAgrowon

नांदेड शहरापासून सुमारे ३५ किलोमीटरवरील आलेगाव (ता. कंधार) हे भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी (Vegetable Production) प्रसिद्ध आहे. गावातील अनेक लहान, मध्यम शेतकरी विविध प्रकारची भाजीपाला पिके (Vegetable Crop) घेतात. येथील कृषी पदवीधर असलेल्या प्रशांत शंकरराव मोरे यांनी नोकरीऐवजी कुटुंबाच्या आठ शेतीमध्ये प्रगती साधतानाच कृषी निविष्ठा (Agriculture Inputs) विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

एकत्र कुटुंबाचे प्रमुख वडील शंकरराव मोरे आणि आई सुंदरबाई आहेत. प्रशांत यांच्यासह तिरुपती व शहाजी अशी मुले असून, सर्व जण शेतात राबतात. गरजेनुसार बारमाही मजूर तैनात केले जात असले तरी घरच्याचे लक्ष अत्यंत महत्त्वाचे असते.

आठ एकर शेतीपैकी निम्मी काळ्या मातीची भारी जमीन असून, तिथे सिंचनासाठी कुपनलिका (बोअर) आहे. यात खरीप, रब्बी हंगामात पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला पिके घेत प्रशांत मोरे यांनी जम बसविला आहे. शिवाय शेतात गोदामाची उभारणी केली असून, पशुपालनही सुरू केले आहे.

Vegetable Production
Vegetables Farming : भाजीपाला शेती फायद्यात

फायद्याची टोमॅटो लागवड

मागील वर्षी (एक जानेवारी २०२२) बोअरच्या पाण्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या एक एकरमध्ये मल्चिंगवर टोमॅटो लागवड केली. गेल्या वर्षी मार्चमध्ये तोडणी सुरू झाली. प्रति कॅरेट १२० ते २०० रुपये दर मिळाला.

(एका कॅरेटमध्ये २५ किलो टोमॅटो बसतात.) १५ एप्रिलनंतर चारशे ते पाचशे रुपये, १० मेनंतर १२०० ते १४०० रुपये प्रति कॅरेट असा दर मिळाला. हा बाजार १५ जूनपर्यंत चालला. या हंगामात अडीच हजार कॅरेट म्हणजेच ६२५ क्विंटल उत्पादन झाले.

याला सरासरी दोन हजार दोनशे रुपये दर मिळाला. यापासून १३ लाख ७५ हजार रु. उत्पन्न झाले. यातून उत्पादन खर्च अडीच ते साडेतीन लाख वजा केले तरी निव्वळ नफा दहा लाख रुपये राहिला. दोडक्यालाही प्रति किलो ५० ते ६० रुपयेपर्यंत दर मिळाल्याचे प्रशांत यांनी सांगितले.

Vegetable Production
Vegetable Production : दुर्गम भागात कुपोषणमुक्‍तीसाठी भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन

स्वच्छता, प्रतवारी व विक्री

फळे व भाज्यांची काढणी केल्यानंतर शेतातच प्रतवारी केली जाते. स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन साफ केल्यानंतर तागाच्या पिशव्या किंवा कॅरेटमध्ये त्याचे पॅकिंग केले जाते. त्यामुळे भाजीपाल्याचा दर्जा उत्तम टिकून, सुरक्षित वाहतूक शक्य होते. परिणामी, बाजारपेठेत चांगले दर मिळतात.

दीड वर्षापूर्वीपर्यंत नांदेड येथील भाजीपाला बाजारात दररोज सकाळी स्वतः प्रशांत विक्री करत. तेव्हा दररोज दोन ते तीन हजार रुपयांचे ताजे उत्पन्न हाती येई. पुढे माल वाढत चालल्याने थेट विक्री करणे अवघड झाले. तसेच शेतीकडेही थोडेफार दूर्लक्ष होऊ लागले. नंतर नांदेड येथील भाजीपाला बाजारपेठ फळे- भाजीपाला मार्केटमध्ये माल देऊ लागले.

बांधावरील फळझाडांमुळे फायदा

प्रशांत मोरे यांनी शेताच्या बांधावर विविध प्रकारची फळझाडे लावली आहेत. त्यात त्यामध्ये नारळाची ८० झाडे, लिंबू १२० झाडे, रामफळ २०, सीताफळ २००, करवंद ५० झाडे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र उन्हापासून भाजीपाला पिकाचा बचाव होतो. या झाडावर येणाऱ्या पक्ष्यांमुळे कीडीचा फडशा पाडला जातो. झाडांमुळे शेतातील सूक्ष्म वातावरण सुधारते. इतक्या फायद्यानंतर मिळणारे फळांचे उत्पादन हे बोनस ठरते.

भांडवली गुंतवणूक

आलेल्या उत्पन्नातून शेतीमाल साठवणुकीसाठी शेतात सहा लाख रुपये खर्चून गोदाम बांधले आहे. सुमारे एक लाख रुपये खर्चून जनावरांसाठी गोठा बांधला. प्रशांत मोरे यांचे गावातच कृषी निविष्ठा विक्री केंद्र आहे. त्यातील खेळत्या भांडवलासाठीही शेतीचे उत्पन्न उपयुक्त ठरते.

प्रशांत मोरे यांच्या मागील वर्षीचा शेती उत्पादनाचा लेखाजोखा

पीक क्षेत्र उत्पादन दर उत्पादन खर्च निव्वळ नफा

सोयाबीन दोन एकर १८ क्विंटल ६००० ४०,००० ६८,०००

ऊस दिड एकर ५४ टन २२५० ५५,००० ७१,५००

हळद दोन एकर ५५ क्विंटल ६५०० १,१०,००० २,४७,५००

टोमॅटो एक एकर ५५० क्विंटल २४०० ३,२५,००० ९,९५,०००

दोडका एक एकर २८ क्विंटल ५००० ५०,००० ९०,०००

५,८०,००० १४,७२,०००

कुटुंबाची आर्थिक तरतूद

पुढील वर्षाच्या शेतीसाठी भांडवल चार लाख रु.

गोदाम बांधकाम सहा लाख रु.

जनावरांचा गोठा एक लाख रु.

घर खर्च दोन लाख रु.

मुलांचे शिक्षण एक लाख रु.

भाजीपाला पिकावर भर

घरची शेती गावापासून जवळच असली तरी तिथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात भाजीपाल्याच्या वाहतुकीमध्ये खूप अडचणी येतात. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रशांत हे गावापासून एक कि.मी. अंतरावरील चार एकर शेतात भाजीपाला व फळपिकांची लागवड करतात.

भाजीपाला उत्पादन ते विक्रीचा या दीड ते दोन वर्षांचा अनुभव आहे. वर्षभर विविध सण, समारंभ व ऋतू यानुसार कोणत्या शेतीमालाला किती मागणी असू शकेल, याचा ते अंदाज घेतात. उदा. उन्हाळ्यातील अधिक लग्न समारंभामुळे टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, मिरची यांना मागणी वाढलेली असली तरी आवक कमी असल्याने दरात तेजी असते.

त्यादृष्टीने टोमॅटो, दोडका, काकडी, कोथिंबीर, फ्लॉवर, वाटाणा अशा पिकांचे ते हंगामनिहाय दहा ते वीस गुंठे क्षेत्रावर नियोजन करतात. खरिपात टोमॅटो, काकडी, वाटाणा, तर रब्बीमध्ये फ्लॉवर, टरबूज, काकडी, कोथिंबीर यांची लागवड केली जाते. गुढीपाडव्याच्या दरम्यान दोडका, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी, टरबूज या पिकाची लागवड होते. या वर्षी या पिकांबरोबर टरबूज, नारळ अशा पिकाची एक एकरावर लागवड केली आहे.

दोडक्याचा प्लॉट सुरू झाल्यानंतर तो तीन महिने सुरू असतो. तर टोमॅटो सुमारे पाच ते सहा महिने शेतात असते. वेलवर्गीय पिकांसाठी बांबू आणि तारांचा आधार देऊन मांडव तयार करण्यात येतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे, तर रसशोषक किडींचा नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे वापरले जातात.

- प्रशांत मोरे, ८६६९१३३६९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com