Vegetable Farming : वेलवर्गीय भाज्यांना दिली ऊस, मोगऱ्याने साथ

येळवी (ता. जत, जि. सांगली) येथील सूरज पवार आणि बंधू गेल्या नऊ वर्षांपासून दोडका, कारले अशी वेलवर्गीय पिके घेत आहेत. त्याला मोगरा, ऊस अशा पिकांची जोड दिल्याने आर्थिक बाजूही सक्षम झाली आहे. काटेकोर व्यवस्थापनातून खर्चात बचत आणि निव्वळ नफ्यात वाढ मिळवली आहे.
Vegetable
Vegetable Agrowon

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे नाव घेतले की दुष्काळ (Drought) आणि पाण्याची कमतरतेचे चित्र उभे राहते. मात्र येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी द्राक्ष (Grape), डाळिंबाच्या फळबागा (Pomegranate Orchard) उभ्या करत उन्नतीचा मार्ग शोधला. तुलनेने येथे भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation) अत्यंत कमी. गेल्या दोन वर्षांत उपसा सिंचन योजनेचे (Irrigation Scheme) पाणी पोहोचल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळू लागले आहेत. जत शहरापासून पंधरा कि.मी. अंतरावरील येळवी गावाची शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती आता कुठे थांबली आहे.

Vegetable
Vegetable Rate : सोलापुरात कोथिंबीर, मेथीसह हिरव्या मिरचीला उठाव

त्याला कारण ठरले तरी २०१८ मध्ये गावात आलेले म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी. या पाण्यामुळे शिवार हिरवे दिसू लागले. याच गावातील सूरज पवार यांच्या कुटुंबाची येळवी गावशिवारात सत्तेचाळीस एकर शेती. पूर्वी या माळरानावर केवळ पावसावर आधारित कोरडवाहू शेती करत. सूरज यांचे वडील वसंत हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी शेती विकासामध्ये लक्ष दिले. त्यांचे बंधू रामचंद्र पवार हे वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सांगोला (जि. सोलापूर) येथे कार्यरत आहेत.

मात्र त्यांनीच कुटुंब एकत्र ठेवण्याचे महत्त्व आणि शिक्षणाचे सर्वांना पटवून दिले. त्यांच्या एकत्रित कुटुंबातील सदस्यांची संख्या १४ आहे. घरातील युवा पिढी सुशिक्षित झाली. रविकिरण हे बी.एस्सी. (उद्यानविद्या), विक्रांत हे एम. एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री), सूरज पवार हे बीए आणि ओंकार पवार हे इंजिनिअर आहेत.

शेती झाली बागायती ः

कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले. दोन विहिरी घेत पुरेशा पाण्याची उपलब्धता केली. मग हळूहळू पवार बंधूंनी पीक बदलास सुरुवात केली. त्याविषयी माहिती देताना सूरज पवार म्हणाले, ‘‘थोडी पाण्याची उपलब्धता झाल्यावर आजूबाजूंच्या प्रमाणे द्राक्ष शेतीला सुरुवात केली.

मात्र उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता यामुळे द्राक्ष शेतीला अनेक मर्यादा पडत असल्याचे दिसून आले. २०१२-१३ मध्ये दुष्काळामध्ये द्राक्ष बाग काढावी लागली. पर्यायी पिकांची निवड करत असताना कमी कालावधी, मर्यादित खर्च आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा आम्ही विचार केला. मोगरा क्षेत्र वाढवले आणि वेलवर्गीय भाजीपाल्याकडे वळलो. शाश्‍वत पाण्यासाठी पावणेदोन कोटी लिटर क्षमतेचे एक शेततळे घेतले आहे.’’

Vegetable
Vegetable Cultivation : शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल

मोगऱ्याने कुटुंबात दरवळला सुगंध

सन २०१० च्या दरम्यान आमच्या परिसरात तशा नवीनच मोगरा पिकाची एक एकरावर लागवड केली. फुलांची मुंबई बाजारपेठेमध्ये विक्री होऊन चांगला दर मिळू लागल्याने उत्साह वाढला. हळूहळू क्षेत्र वाढवत २.५ एकरांवर नेले. मुंबईसह सांगलीतील मिरज मार्केटमध्येही आमचे नाव झाले. मात्र २०२० च्या कोविड महामारीमध्ये मार्केटच जवळपास दोन वर्षे बंद राहिले. तरीही या पिकाला कमी पाणी लागते. तुलनेने खर्चही कमी आहे. ताजा पैसा येत राहतो. त्यामुळे त्याची निगा राखली. आता येत्या आठ दिवसांत पुन्हा दीड एकरावर नव्या लागवडीचे नियोजन केले आहे. शेताची मशागत करून रोपेही आणलेली आहेत.

वेलवर्गीय भाजीपाला पिके ः

* वर्षातून दोन वेळा (मे आणि नोव्हेंबर महिन्यांत) दोडका व कारली लागवड.

* मांडव पद्धत, गादी वाफे व प्लॅस्टिक आच्छादनावर लागवड.

*दोन ओळींत सहा फूट, रोपांमध्ये दोन ते अडीच फूट अंतर. आंतरमशागत सोपी, आच्छादन व ठिबकमुळे पाणी बचत व गुणवत्तापूर्ण उत्पादन.

* गरजेनुसार कीडनाशकांची फवारणी. फळमाशी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर.

*लागवडीनंतर ४० दिवसांनी उत्पादनास सुरू. मेमधील लागवडीचे पीक डिसेंबरपर्यंत चालते. नोव्हेंबर लागवडीचे पीक एप्रिलपर्यंत चालते.

* चाळीस दिवसांनंतर पुढे एक दिवसाआड काढणी.

* बाजारपेठेनुसार पॅकिंग नियोजन. बॉक्स पॅकिंगला अधिक मागणी.

* दोडका पिकाचा एकरी उत्पादन खर्च दीड लाख रु., उत्पन्न चार ते पाच लाख रुपये राहते.

* कारली पिकाचा एकरी उत्पादन खर्च १.६० लाख रु., उत्पन्न चार ते पाच लाख रुपये होते.

ऊस पीकही महत्त्वाचे

भाजीपाला लागवडीतून अन्य पिकालाही तितका वेळ मिळत नाही. तसेच शाश्‍वत एक ठोक उत्पन्नाच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी नीरा ८६०३२ या ऊस वाणाची लागवड केली. सध्या नवी लागवड आणि खोडवा असे एकूण १७ एकरांवर ऊस पीक आहे. दरवर्षी पिकांची फेरपालट, उसामध्ये पट्टा पद्धत, पाचट व्यवस्थापन आणि दरवर्षी माती परीक्षण करूनच खताचे व्यवस्थापन अशा बाबी अभ्यास आणि अनुभवातून पवार बंधू शिकत गेले आहेत.

शेतकरी गटाचा होतोय फायदा

कृषी विभागातर्फे गटशेती प्रकल्पांतर्गत श्रीराज भाजीपाला आणि मोगरा उत्पादक गटाची स्थापना केली. त्यात गावातील २२ शेतकरी एकत्र आले. या गटशेतीमुळे भाजीपाला लागवड आणि विक्रीचा आत्मविश्‍वास वाढला. गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पॅकहाउस, सोलर पंप, विहीर आणि अवजारे बँक अशा योजनांचा लाभ मिळाला. कोरोना लॉकडाउनमध्ये कृषी आणि ‘आत्मा’ विभागाने ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी विक्री व्यवस्था उभी केली. गट असल्यामुळे त्या काळात भाजीपाला विक्री करणे शक्य झाले. गटाला उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी मार्गदर्शन केले असल्याचे सूरज पवार यांनी सांगितले.

पवार यांची शेती व उत्पादकता

पीक...क्षेत्र...सरासरी एकरी उत्पादकता...मिळणारा दर

दोडका...दोन एकर...२० टन...२० ते २५ रुपये प्रति किलो

कारले...दीड एकर...२० टन...२० ते २५ रुपये प्रति किलो

ऊस लागवड १० एकर...७० टन....२६०० ते २७०० रुपये प्रति टन

ऊस खोडवा...७ एकर...५० टन...२६०० ते २७०० रुपये प्रति टन

शेतीतून मिळणाऱ्या रकमेची खर्चनिहाय विभागणी

* शिक्षणासाठी ः १० टक्के

* आरोग्य आणि घर खर्चासाठी ः १५ टक्के

* पुढील हंगामातील पिकांसाठी ः २५ टक्के (शेतीतून मिळालेल्या रकमेतून)

* नवीन अवजारे आणि दुरुस्तीसाठी ः १० टक्के

* शेतातील अन्य कामे, मजुरी आणि खते ः ३० टक्के

* शेती विकासासाठी ः १० टक्के.

सूरज पवार, ९८३४२७७६८६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com