Poultry Farming : काथ्या, कुक्कुटपालनातून साधली प्रगती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आसोली (ता. वेंगुर्ला) येथील अर्चना अच्युत आसोलकर यांनी मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर काथ्या, कुक्कटपालनासह विविध उद्योगांची उभारणी करत कुटुंबाची आर्थिक घडी बसविली आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

वेंगुर्ल्यापासून १० किमी अंतरावर आसोली हे गाव. गावातील शेतकरी भात पिकासह आंबा (Mango), काजू, नारळ, सुपारी यांसारख्या विविध फळपिकांचे उत्पादन (Fruit Crop Production) घेतात. याच गावात अर्चना ओसालकर त्यांच्या २ एकर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने शेती (Traditional Agriculture) करत. परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे शाश्‍वत उत्पन्नाच्या मदतीने कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली करावी, असे अर्चना यांना सतत वाटायचे. त्यांनी छोट्या दुकानापासून सुरू केलेला व्यवसाय आज काथ्या, कुक्कुटपालनापर्यंत (Poultry Farming) पोहोचला आहे.

Poultry Farming
Poultry Farming : कुक्कुट पालनातील अडचणी सोडविण्यासाठी समन्वय समिती

स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाला प्रारंभ

आसोली गावात २००४ च्या सुमारास जास्त दुकाने नव्हती. त्यातूनच अर्चना यांना छोटेसे दुकान सुरू करण्याची संधी दिसली. परंतु दुकान सुरू करण्यासाठी रस्त्याकडेच्या जागेची गरज होती. गावातील एका व्यक्तीकडून भाडेतत्त्वावर जमीन घेतली. त्या जागेवर लाकडी फळ्या ठोकून अत्यंत कमी खर्चात छोटा स्टॉल उभा केला. स्टॉलमध्ये कांदा, बटाटा, साखर, चहा पावडर इत्यादी जीवनावश्यक वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. दैनंदिन गरजेच्या वस्तू गावामध्येच मिळू लागल्याने चांगला प्रतिसाद मिळू लागला. वर्षभरात त्यांना व्यवसायाचा चांगला अनुभव येऊन आत्मविश्‍वास वाढला.

मात्र याच काळात त्यांच्या स्टॉलसमोर एक मोठे दुकान सुरू झाले. त्यामुळे स्टॉलवर येणारे ग्राहक मोठ्या दुकानाकडे वळले. परिणामी, दिवसभरात ५०, १०० रुपयांची विक्रीदेखील होत नव्हती. तरीदेखील अर्चनाताई खचल्या नाहीत. त्यांनी गावातील शाळेसमोर दुसरा स्टॉल उभारला. विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू स्टॉलमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Poultry Farming
Poultry : पोल्ट्री उद्योगातून घडवली प्रगतीची वाट

या कालावधीत जिल्ह्यात बचत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यांनी ‘उन्नती बचत गट’ स्थापन केला. अनेक महिलांना बचत गटात रस नव्हता. परंतु अर्चनाताईंनी पुढाकार घेऊन बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी व्यवसाय सुरू करावा असा अधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्यातूनच गटाच्या माध्यमातून कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु अनेक दिवस कपडे पडून राहिल्याने तो व्यवसाय अंगलट आला.

स्वमालकीची जागा, इमारत

अर्चनाताईंच्या डोक्यात सतत उद्योगचक्र सुरू असायचे. हंगामी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने खाद्यपदार्थ निर्मिती उद्योगाची सुरुवात केली. मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. रस्त्याकडेला स्वमालकीची जमीन घेऊन उद्योगाची उभारणी करावी असे त्यांना वाटत होते. याच काळात गावात रस्त्याकडेला जमीन विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाली. मात्र, जमीन खरेदी करण्याइतकी मोठी रक्कम त्यांच्याकडे नव्हती. शेवटी जमीन खरेदी करण्यासाठी बॅंकेत दागिने गहाण ठेवून कर्ज काढले. आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण केला.

त्यानंतर उद्योग उभारणीसाठी इमारत बांधणीचा प्रश्‍न उभा राहिला. त्यासाठी पुन्हा बँकेचे दरवाजे ठोठावले. परंतु बँकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरीदेखील त्या खचल्या नाहीत. छोटीशी इमारत बांधून व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढील वर्षभरात बँकेने त्यांना कर्ज मंजूर केले आणि चांगल्या नवीन इमारतीची उभारणी केली.

उद्योगांची कास

अर्चनाताईंच्या कुटुंबाचा दुग्ध व्यवसाय होता. त्यातूनच पुढे गांडूळ खत प्रकल्प आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. कुक्कुटपालनात लेअर, ब्रॉयलर आणि देशी कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. मांस विक्रीसाठी दुकान सुरू केले. थेट विक्रीमुळे नफ्यामध्ये वाढ होत गेली. गावामध्येच चिकन, अंडी मिळू लागल्याने ग्राहकांकडून मागणीदेखील वाढली.

कुटुंबाची साथ

विविध उद्योगांच्या माध्यमातून अर्चनाताईंनी कुटुंबाची आर्थिक घडी बसविली आहे. या व्यवसायात पती अच्युत आसोलकर, मुलगा अक्षय आणि मुली अंकिता, ऐश्‍वर्या यांची मोलाची मदत मिळते. या व्यवसायांच्या जोरावरच त्यांनी तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले आहे.

काथ्या उद्योगाची पायाभरणी

गावामध्ये कॉयर बोर्डाद्वारे काथ्या उद्योगाबाबत २०१६ ला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये बचत गटाच्या प्रतिनिधी म्हणून अर्चनाताई उपस्थित होत्या. प्रशिक्षणामध्ये काथ्या उद्योगातील फायदे-तोटे समजून घेतले. व्यवसायातील आर्थिक गणित समजल्यानंतर सिंधुदुर्ग येथील कॉयर बोर्डात जाऊन उद्योग उभारणीसाठीच्या विविध योजनांची माहिती घेत अभ्यास केला. उद्योगासाठी आवश्यक यंत्रे, त्यांच्या किमती आणि कुठे मिळतील याची माहिती घेतली.

त्यासाठी मुलगा अक्षय याची मदत त्यांना मिळाली. काथ्या उद्योग उभारणीसाठी कॉयर बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला. नंतर बँकेकडे उद्योगासाठी कर्ज प्रस्ताव दिला. मात्र त्यात अनेक त्रुटी निघाल्या. त्यामुळे कर्ज मंजूर होण्यास विलंब झाला. कर्ज मंजूर झाल्यानंतर केरळ येथून काथ्या उद्योगातील आधुनिक यंत्रसामग्री आणि ओडिशा येथून कच्चा माल खरेदी केला. त्यापासून दोरी, पायपुसणी, कोकोपीट इत्यादी उत्पादने तयार केली. त्यांची विक्री स्थानिक बाजारपेठेत तसेच व्यापाऱ्यांना केली जाते.

वार्षिक उलाढाल

कुक्कटपालनातून सुमारे

५ लाख ५० हजार रुपये.

काथ्या उद्योगातून ६ लाख.

गांडूळ खतातून १५ हजार रुपये.

खाद्यपदार्थ विक्रीतून १ लाख रुपये.

स्थानिक महिलांच्या हाती रोजगार

एकेकाळी रोजगारासाठी धडपडणाऱ्या अर्चनाताईंनी आता गावातील १५ महिलांच्या हाती रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हंगामानुसार त्यात वाढ केली जाते. व्यवसायातील कामांसाठी महिला कामगार असल्यातरी दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत त्या विविध कामांमध्ये व्यस्त असतात.

- अर्चना आसोलकर, ९४०३१९६५१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com