Khilar Cow : खिलार जनावरे संगोपनातून आर्थिक स्थैर्यता

कुंभारी (ता. जत, जि. सांगली) येथील शिवाजी पाटील यांनी आर्थिक परिस्थितीशी दोन हात करीत शेतीतून आपले कुटुंब सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून घरी सुरू असलेला खिलार जनावरे संगोपनाचा वारसा कायम ठेवला. दूध, तूप विक्रीसह शर्यतीसाठी खोंड आणि शेतीच्या कामांसाठी बैलांची विक्री करून त्यांनी शेतीत व कौटुंबिक दृष्ट्या आर्थिक स्थिरता आणली आहे.
Khilar Animal
Khilar Animal Agrowon

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याची दुष्काळी ओळख अद्याप पुसलेली नाही. प्रतिकूल स्थिती असल्यानेच की काय तालुक्यातील शेतकरी हीच संधी मानून शेतीत धडपड करीत असतो.
कष्ट आणि संशोधनवृत्तीतून प्रयोगशीलता दाखवत असतो. तालुक्यातील जत-कऱ्हाड मार्गावर पाच हजार लोकसंख्येचे कुंभारी गाव वसले आहे.

Khilar Animal
Day With Farmer : दुर्गम भिंगारा येथे रस्ता, वीज, नेटवर्कची अडचण

गाव परिसरात सुमारे पस्तीस वर्षापूर्वी हळद-केळी पिकवली जायची. गूळ उत्पादनासाठीही गाव जिल्ह्यात अग्रेसर होतं. आठ- नऊ वर्षापूर्वी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कृष्णा नदीचं पाणी दुष्काळी पश्चिम भागात खळाळले. सुमारे ३० ते ३५ गावांत पाणी आल्यानं कोरडवाहू असलेल्या शेतीत हिरवाई फुलली आहे. ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी अशी नगदी पिकं शेतकऱ्यांच्या घराची समृद्धी वाढवत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.

पाटील यांची शेती

गावातील शिवाजी ईश्वरा पाटील हे तसे साध्या स्वभावाचे शेतकरी. त्यांची २५ एकर शेती आहे. पाण्याची सुविधा झाल्याने १० एकर शेती बागायती झाली. अजून पंधरा एकर शेती जिरायती होती. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पाण्याअभावी शेतीत मर्यादा होत्या. राब राब राबायचं आणि त्यातूम पोटा-पाण्याची व्यवस्था करायची हाच पारंपारिक शिरस्ता अंगवळणी पडलेला. कुटुंब लहान असल्यानं घरच्या प्रत्येकानं जबाबदारी घेतली होती.

त्यामुळे शिवाजी यांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेता आलं नाही. शेती आणि जनावरं हीच नोकरी मानली होती. वडील ईश्वरा, आई साखराबाई, पत्नी शालन, मुलगा रमेश, स्वप्नील आणि मुलगी प्रियांका असं शिवाजी यांचं कुटुंब आहे. पाण्याची शाश्वतता आल्यानंतर उपलब्ध पाण्यात शिवाजी उसासह अन्य पिकांची लागवड करण्यासाठी पुढे आले.

खिलार जनावरांचा छंद

आजोबा-पणजोबांच्या काळापासून काही खिलार जनावरं दावणीला होती. त्यांचा लळा लागला होता. दहा बारा वर्षांपूर्वी पाटील कुटुंब विभक्त झालं. त्यावेळी वाट्याला चार- पाच देशी गायी आल्या. त्यांच्या संगोपनाचा वारसा पुढे कायम ठेवला. यातून खिलार जित्राबं जोपासण्याचा छंदही वाढला.

Khilar Animal
Goat Farming : शेळीपालनात शास्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा

आज त्यामुळेच लहान मोठ्या मिळून ३५ गायी, खोंडे आणि कालवडी पाटील यांच्या दारात डौलात उभे असलेले दिसतात. कालवड झाली ती सांभाळ करायचा आणि खोंडे झाली की विक्री करायची अशी पध्दत ठेवली. जित्राबं म्हणजे आपली पोरंच आहेत असे शिवाजी समजतात. त्याप्रमाणेच त्यांचा सांभाळ केला जातो. पहाटे पाचपासून दिनचर्या सुरू होते. गोठ्यातली कामे झाली की नऊ-दहाच्या सुमारास मोकळ्या रानात गायी हिंडवण्यासाठी शिवाजी घेऊन जातात. सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा जनावरे घरी येतात. दोन ते तीन दिवसांतून एका तळ्यात त्यांना पोहायलाही नेलं जातं. अशा वातावरणामुळे जनावरांचे आरोग्य तंदुरुस्त राहते.

विक्री व्यवस्था

खिलार जनावरांच्या बरोबर तीन संकरित गायी आणि दोन म्हशीही
दावणीला आहेत. सध्या दोन गायी दुधाळ आहेत. प्रति लिटर ४० रुपयांप्रमाणे गायीच्या दुधाची विक्री होते. म्हशींचे दूध घरच्या उपयोगासाठी ठेऊन उर्वरित रतीबाला दिले जाते. त्याचा दर प्रति लिटर ६० रुपये आहे. वर्षातून देशी गायीच्या तुपाचे ७ ते ८ किलोपर्यंत उत्पादन होते. प्रति किलो तीन हजार रुपयांप्रमाणे विक्री होते.

खोंडांची विक्री

खिलार जनावर म्हटलं की आटपाडी आणि जत हे तालुके आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यामुळे जातिवंत खोंड, बैल हवा असले तर इच्छुक इथल्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येतातच. सोलापूर, पुणे, सातारा, कर्नाटक या ठिकाणाहून शर्यतीचे शौकीन देखील इथपर्यंत येतात आणि खरेदी करून जातात.

सर्वसाधारणपणे दोन ते तीन महिने झाल्यानंतर खोंड शर्यतीचा आहे की शेती मशागतीसाठी आहे याची चपापणी होते. शर्यतीसाठीचा खोंड शरीराने आणि तोंडाने लांबीला अन्य बैलांपेक्षा जास्त असतो. टवटवीत दिसतो. या खोंडाचा खुराक वेगळा ठेवला जातो. प्रामुख्याने शेंग पेंड, भरडा आणि गव्हाच्या पिठाच्या कणकेचे गोळे दिले जातात. त्याची निगाही तितक्या अदबीने ठेवली जाते.

Khilar Animal
Khilar Cow : खिलार संगोपनातून कुटुंबाला आधार

पाच ते सहा महिने झाले की त्यांची विक्री होते. वर्षातून अशी पाच ते सहा खोंडे विकण्यात येतात.
त्यास ६० ते ७० हजार रुपये दर मिळतो. शेतीकामासाठी वर्षातून दोन बैलांची विक्री होते. दोन वर्षाच्या बैलास ८० हजार रुपये मिळतात.

शिवाजी पाटील- ९५२७८५२०१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com